राज्यभरात महानगरपालिकेच्या निवडणुकीचा रणसंग्राम पाहायला मिळत आहे. अशामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र निवडणूक लढवणार आहेत. राज्यात १५ जानेवारी २०२६ रोजी निवडणूक आयोजित असून अगदी दुसऱ्याच दिवशी निकाल आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रमुख राज ठाकरे, यांची संयुक्त सभा मुंबईच्या शिवतीर्थावर रविवारी घेण्यात आली आहे. या दरम्यान, राज ठाकरेंनी विरोधकांवर टिकास्त्र सोडले आहे.
राज ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात बाळासाहेब आणि शिवसेनेशी जोडलेल्या लहानपणीच्या आठवणींनी केली. त्यांनी बाळासाहेब तसेच त्यांचे संपूर्ण कुटुंब आज इथे उपस्थित असले पाहिजे होते अशी इच्छा व्यक्त केली. तब्बल २० वर्षांनी दोन भाऊ एकत्रित आल्यामुळे पक्षाशी काही एकनिष्ठ असणाऱ्या कार्यकर्त्यांना तिकिटाला मुकावे लागले त्यामुळे त्यांच्यामध्ये नाराजी तयार झाल्यामुळे राज ठाकरे यांनी दिलगिरी व्यक्त करत भाषणाला सुरुवात केली. राज ठाकरेंनी दोन्ही भाऊ एकत्र येण्यामागचे कारण स्पष्ट केले, त्यांच्यामते मुंबईवर आलेल्या संकटाला रोखण्यासाठी या दोन्ही भावांना एकत्रित यावे लागले आहे. त्यांनी सांगितले की आमच्यासाठी महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राचा मराठी माणूस कोणत्याही भांडणांपेक्षा कधीही मोठा आहे. राज ठाकरे यांनी दरम्यान गाजलेला हिंदी सक्तीचा विषय काढला. हिंदी सक्ती ही फक्त राज्य सरकारद्वारे चालवण्यात आलेली फक्त टेस्टिंग आहे. मराठी माणूस जागा आहे की नाही? हे तपासण्यासाठी राज्य सरकारने एक मुद्दा टाकून बघितला असल्याचे राज ठाकरेंनी सांगितले आहे. राज ठाकरे यांनी भाजपवर या भाषणादरम्यान घणाघाती टीका केल्या आहेत. संपूर्ण राज्यभरात पैशांचा खेळ सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. “पैसे फेकू आणि विकत घेऊ” असा विरोधकांचा आत्मविशास असल्याचे राज ठाकरे यांनी म्हंटले आहे. या राज्य सरकारने जनतेला गृहीत धरलं आहे.
भाजपवर टीका करताना राज ठाकरे यांनी जनतेला आरसा दाखवला आहे. राज्यात भाजपने MIM शी तसेच काँग्रेस सोबत केलेली युती याचा आवर्जून उल्लेख राज ठाकरे यांनी केला आहे. तसेच राज्यात महानगर पालिकेच्या निवडणुकीत भाजपाचे एकूण ६६ उमेदवार बिनविरोध निवडून येणार असल्याचे जनतेला सांगितले आहे. भाजपावर टिकास्त्र सोडताना त्यांनी भाजपच्या गुन्हेगारी क्षेत्रातील काही उमेदवारांचा उल्लेख केला आहे. त्यांनी सांगितले आहे की तुळजापूर येथे एका ड्रग्स रॅकेट प्रकरणात सापडलेल्या गेलेल्या आरोपीला भाजपने उमेदवारीचे तिकीट दिली आहे तसेच बलात्कराच्या आरोपाखाली पकडला गेलेला आरोपी तुषार आपटे भाजपचा नगरसेवक आहे. त्याचबरोबर परप्रांतीयांना मराठी माणसांच्या विरोधात भडकवणारी भाजप असा उल्लेख करत गुजरातमध्ये चक्क एका अशा नेत्याला उमेदवारी दिली आहे ज्यांनी गुजरातमध्ये बिहारी लोकांना हाकलण्याचे काम केले आहे, असे म्हंटले आहे. पण ती बातमी हिंदी वृत्त वाहिन्यांमध्ये दाखवल्या जाणार नाही असा आरोपही केला आहे. “भाजपने मुंबई, महाराष्ट्र, देश विकायला काढला!’ अशी घणाघाती टीका राज ठाकरे यांनी केली आहे.
‘यांच्या डोक्यात सत्ता गेलीये, मुंबई ताब्यात घेणे यांचा एकच उद्देश!,मराठी माणसांना फोडण्याचा भाजपचा डाव!’ अशा अनेक टीका राज ठाकरे यांनी भाजपवर केल्या. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छगन भुजबळ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आधी केलेल्या टीका आणि आता मांडीला मांडी लावून बसने असा उल्लेख करत जनतेला आरसा दाखवला आहे. राज ठाकरे यांचे म्हणणे आहे की कबुतरांचा मुद्दा, हिंदी सक्ती असे अनेक मुद्दे काढून राज्य सरकार मराठी माणसाला भडकवत आहे आणि ‘परप्रांतीय Vs मराठी’ हा मुद्दा तयार करून मराठी माणसाला एकटा पाडण्याचा संघर्ष भाजप करत आहे. पण मराठी माणूस एकटा असला तरी पुरेशा आहे असा विश्वास राज ठाकरे यांनी दाखवला आहे.
गौतम अदानी आणि त्याचे वाढते प्रकल्प
राज ठाकरे यांनी त्यांचा भाषणात केंद्र सरकार आणि त्यांचे गौतम अदानीवरचे विशेष प्रेम! याविषयीही फार मोठे भाष्य केले आहे. भाजपला मुंबई हातात घेऊन अदानीला जमिनी विकायच्या आहेत असा थेट आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. अदानी विषयी सांगताना त्यांनी २०२४ नंतर या सगळ्या प्रकरणाचा सुगावा लागल्याचे त्यांनी म्हंटले. या भाषणात त्यांनी ‘अदानी आणि केंद्र सरकारचे प्रेम’ यावर व्हिडीओच दाखवली.
नक्की काय होतं ‘लाव रे तो व्हिडीओ’मध्ये
व्हिडीओत नकाशा दाखवण्यात आला. नकाशात गौतम अदानीकडे २०१४ म्हणजेच मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी किती प्रकल्प होते आणि आताच्या घडीला किती प्रकल्प आहेत हे दाखवण्यात आले. देशाच्या नकाशात मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी देशभरात अदानीकडे फक्त १४ प्रकल्प होते. पण आताच्या घडीला त्यांच्याकडे देशभरातून शेकडो प्रकल्प असल्याचे त्या व्हिडिओत दाखवण्यात आले. विशेष म्हणजे अदानीच्या ताब्यात असलेले जास्त प्रकल्प हे उत्तर भारतातून विशेषतः पंजाब, उत्तर प्रदेश, दिल्ली, गुजरात आणि हरियाणा भागातील आहेत. महाराष्ट्राचा नकाशा जेव्हा दाखवण्यात आला तेव्हा २०१४ आधी राज्यात अदानीच्या ताब्यात फक्त १ प्रकल्प होता आणि आताच्या घडीला शतकांचा आकडा पार करण्याचं वेशीवर आहे. २०१४ आधी मुंबईत एकही प्रकल्प हाती नसणाऱ्या अदानीच्या हातात आताच्या घडीला एकूण २६ पेक्षा अधिक प्रकल्प असण्याचे सांगण्यात आले आहे. जो व्यक्ती कधी सिमेंट क्षेत्रात नव्हता तोच अदानी आज सिमेंट क्षेत्रात दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळही विकण्याची इच्छा?
नवी मुंबई येथे वसवण्यात आलेले नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे सर्व प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय विमानाच्या फेऱ्या वळवायच्या आणि मुंबईचा विमानतळ अदानीला विकायला काढायचे स्वप्न भाजप पाहत आहे असा टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे.






