अशोक खरातवरील सिनेमावरून रुपाली चाकणकर भडकल्या, चित्रपटाविरोधात कायदेशीर कारवाईचा इशारा
नाशिकमधील अशोक खरात प्रकरणावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी आपल्यावर आणि आपल्या कुटुंबीयांवर गंभीर व बिनबुडाचे आरोप करण्यात आल्याचा दावा केला आहे. तसेच या प्रकरणावर आधारित ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ या चित्रपटाविरोधातही कायदेशीर कारवाई करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी रुपाली चाकणकर म्हणाल्या, “अशोक खरात प्रकरणात माझ्यावर आणि माझ्या कुटुंबीयांवर वाट्टेल तसे आरोप करण्यात आले. माझी मुलं शैक्षणिक क्षेत्रात असून त्यांनाही लक्ष्य करण्यात आलं. हे अत्यंत दुर्दैवी आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, आशा मिरगे यांनी आरोप केल्यानंतर त्यांना कायदेशीर नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. मात्र त्यांनी त्या स्वीकारल्या नाहीत, असा दावा त्यांनी केला.
या प्रकरणात आपण दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, रुपाली ठोंबरे, सुषमा अंधारे, अंजली दमानिया आणि आशा मिरगे यांना नोटिसा बजावण्यात आल्याचा दावा चाकणकर यांनी केला. “१० जुलै रोजी मी स्वतः दिल्ली उच्च न्यायालयात हजर राहणार आहे. काही यूट्यूब चॅनेल्सविरोधातही आम्ही न्यायालयीन कारवाई करत आहोत,” असे त्या म्हणाल्या.
अशोक खरात प्रकरणावर आधारित ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ या चित्रपटावरही रुपाली चाकणकर यांनी आक्षेप घेतला. त्यांच्या म्हणण्यानुसार, “हे प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. एखाद्या व्यक्तीवर आधारित पात्र साकारताना संबंधित व्यक्तीची परवानगी घेणे आवश्यक असते. माझी कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे चित्रपट निर्मात्यांविरोधातही योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल.”
दरम्यान, ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्यामध्ये अभिनेत्री दिपाली सय्यद या रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेत दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे चित्रपटात आणखी कोणत्या व्यक्तींची पात्रे असतील, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
नाशिकमधील अशोक खरात प्रकरण काही महिन्यांपूर्वी राज्यभर चर्चेत आले होते. महिलांना अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवून अत्याचार केल्याचे आरोप अशोक खरात यांच्यावर करण्यात आले होते. या प्रकरणानंतर विविध राजकीय व्यक्ती आणि इतर प्रतिष्ठित व्यक्तींची नावे चर्चेत आली होती.
याच पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांचे अशोक खरात यांच्याशी कथित आर्थिक संबंध असल्याचे आरोप सार्वजनिक चर्चेत झाले होते. या आरोपांनंतर त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. या आरोपांबाबत न्यायालयीन आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू असून, त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही.
‘राऊतांना उद्धव ठाकरेंनी इतकं झापलं की, फक्त मारायचं बाकी होतं’; बच्चू कडू यांचा खळबळजनक दावा






