
शिंदे गटात गेलेले सचिन अहिर सरकारी बंगल्यावरून नाराज? (Photo Credit- x)
शिंदे गटात सामील झाल्यानंतर सचिन अहिर यांना महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती पदाची मोठी घटनात्मक जबाबदारी देण्यात आली. मात्र, आता सचिन अहिर महायुती सरकारवर नाराज असल्याच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. त्यांना अधिकृत शासकीय बंगल्याऐवजी ‘फ्लॅट’ मंजूर करण्यात आल्याने त्यांनी तो स्वीकारण्यास नकार दिला असून, ते एकनाथ शिंदे यांच्यांवर नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सचिन अहिर यांची नाराजी शिवसेना या संघटनेबद्दल नसून ती एका विशिष्ट प्रशासकीय निर्णयामुळे निर्माण झाली आहे. उपसभापतीसारख्या उच्चपदस्थ घटनात्मक पदावर असूनही त्यांना अद्याप अधिकृत सरकारी बंगला देण्यात आलेला नाही.
उपसभापतींसाठी ‘रायगड’ हा बंगला मंजूर करण्यात आला होता. मात्र, हा बंगला सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या ताब्यात आहे. महायुती सरकारमध्ये ते सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना हा बंगला त्यांना मिळाला होता. सध्या ते मंत्रिमंडळात नसले तरी गेल्या दीड वर्षांपासून हा बंगला त्यांच्याकडेच आहे. प्रशासनाने अहिर यांना रायगड बंगल्याऐवजी फ्लॅटमध्ये शिफ्ट होण्याचा पर्याय दिला होता; परंतु अहिर यांनी अद्याप हा फ्लॅट स्वीकारलेला नाही. या प्रशासकीय त्रुटीबद्दल अहिर यांनी खाजगीत तीव्र नाराजी व्यक्त केली असून त्यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्याकडे आपली बाजू मांडली आहे. यावर वरिष्ठ नेतृत्वाने तांत्रिक अडचणी दूर करून त्यांना लवकरच सरकारी बंगला दिला जाईल, अशी ग्वाही दिली आहे.
सचिन अहिर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून केली होती. त्यांच्या राजकीय प्रवासाला आकार देण्यात शरद पवारांचा मोठा वाटा राहिला आहे. याच पार्श्वभूमीवर, उपसभापती पद भूषवल्यानंतर सचिन अहिर यांनी अचानक ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली आणि त्यांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतले.
राम मंदिर प्रकरणात गोविंद गिरींचीही चौकशी व्हावी; संजय राऊत यांची मागणी