
Sanjay raut at MPSC Protest
MPSC Protest : पुण्यात आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भेट देत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्र लोकसेवा आयोग, स्पर्धा परीक्षा आणि निवडणूक प्रक्रियेवरून त्यांनी सरकारला धारेवर धरलं. मागण्या मान्य केल्याचा दावा सरकारकडून केला जातो, मग आंदोलनस्थळी तरुण अजूनही का बसले आहेत, असा सवाल राऊत यांनी केला.
“आम्ही सगळ्या मागण्या मान्य केल्या, मग इथं मुलं का बसली आहेत?” असा सवाल करत राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. आंदोलनाची दखल घेतली नाही, तर हेच आंदोलन पुन्हा जिल्ह्या-जिल्ह्यात उभं राहू शकतं, असा इशाराही त्यांनी दिला.
“जंतर-मंतर जर पुन्हा प्रत्येक जिल्ह्यात निर्माण झालं, तर तुमची गाडी मंत्रालयाबाहेर पडणार नाही, वर्षाबाहेर पडणार नाही, मंत्र्यांच्या बंगल्याबाहेर पडणार नाही,” अशा शब्दांत राऊत यांनी सरकारला सुनावलं.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभारावरही त्यांनी गंभीर आरोप केले. “आयोगाच्या वरपासून खालपर्यंत शुद्धीकरणाची मागणी आहे. पण, निवडणुका पारदर्शक पद्धतीने घेता येत नसतील, तर सरकार स्पर्धा परीक्षा कशा घेणार,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
MPSCच्या माध्यमातून राज्याच्या प्रशासनात येणाऱ्या तरुण पिढीच्या भवितव्याचा प्रश्न असल्याचं सांगत राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला. “तुम्ही या राज्याच्या प्रशासनामध्ये निर्माण होणाऱ्या एका पिढीला बरबाद करायला निघालेला आहात,” असा आरोप त्यांनी केला.
सरकार आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचाही राऊत यांनी दावा केला. सरकारला खरोखरच आंदोलनकर्त्यांच्या प्रश्नांची काळजी असती, तर त्यांनी आंदोलकांशी आणि रोहित पवार यांच्याशी चर्चा केली असती, असं ते म्हणाले.
दरम्यान, परीक्षांमध्ये गैरप्रकार, पेपरफुटी आणि नोकरभरतीतील कथित घोटाळ्यांवरूनही राऊत यांनी सरकारला लक्ष्य केलं. तरुणांना शिक्षण, विचार आणि संस्कृतीपासून दूर नेऊन त्यांना अंधभक्त बनवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
ज्ञानेश कुमार यांच्या मुद्द्यावरही राऊत यांनी भाष्य केलं. ज्ञानेश कुमार पदावरून जाणार असल्याचा आत्मविश्वास तरुणांच्या मनात असेपर्यंत चुकीच्या व्यक्तींना महत्त्वाच्या पदांवर बसवण्याला विरोध सुरूच राहील, असा दावा त्यांनी केला.
रोहित पवार यांच्या आंदोलनस्थळी राऊत यांच्या भेटीमुळे या आंदोलनाला राजकीय पाठिंबा मिळाल्याचं चित्र निर्माण झालं असून, MPSC आणि युवकांच्या प्रश्नावरून आगामी काळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.