गर्जना मोर्चात उद्धव ठाकरेंचा एल्गार; भाजप आणि ज्ञानेश कुमारांवर जोरदार हल्लाबोल (Photo - X)
Uddhav Thackeray : मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ‘गर्जना मोर्चा’मुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचं वातावरण चांगलंच तापलं आहे. लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी काढण्यात आलेल्या या मोर्चात शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच मंचावर आले. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजप सरकार आणि केंद्रीय निवडणूक आयोगावर जोरदार निशाणा साधला.
उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या कारभारावर टीका करताना थेट शब्दांत सरकारला लक्ष्य केलं. “भारतीय जनता पक्षाला सरकार चालवता येत नाही. प्रशासन आणि भाजप हे दोन विरुद्धार्थी शब्द आहेत,” असं ते म्हणाले. सरकारच्या कारभाराला त्यांनी ‘सूड उगवणे’ असं संबोधत भाजपवर जोरदार हल्ला चढवला.
देशातील मतदान प्रक्रियेवरूनही उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला घेरलं. मतदारांच्या हक्कांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असल्याचं सांगत त्यांनी ‘व्होट चोर’च्या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधला. बंगालमधील मतदार यादीच्या प्रक्रियेचा उल्लेख करत त्यांनी निवडणूक व्यवस्थेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
‘यांच्यामध्ये कोणतीही भिती नाही, एकाच उद्योगपतीला सर्व देऊन टाकायचं’; राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
उद्धव ठाकरे यांनी यावेळी कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरूनही सरकारला धारेवर धरलं. ठाण्यातील पूर्णेकर यांच्या हत्येचा उल्लेख करत त्यांनी पोलिसांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला. महिला अत्याचाराच्या घटनांवरूनही त्यांनी सरकारला जाब विचारला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, “मतदानाचा अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा त्यांचा आरोप आहे. सरकारने संस्था ताब्यात घेतल्या असतील, प्रशासन ताब्यात घेतलं असेल; मात्र रस्ते जनतेच्या मालकीचे आहेत,” असं सांगत त्यांनी सरकारला थेट इशारा दिला. “या रस्त्यावर उद्या तुम्हाला फिरणे मुश्किल होईल,” असा इशाराच त्यांनी आपल्या भाषणातून दिला.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नियुक्तीवरूनही उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारला घेरलं. निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीच्या प्रक्रियेतून सरन्यायाधीशांना बाजूला करून सरकारला अनुकूल व्यवस्था तयार करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
निवडणूक आयोगासारख्या संस्थेची विश्वासार्हता आणि स्वायत्तता महत्त्वाची असल्याचं सांगत उद्धव ठाकरेंनी ज्ञानेश कुमार यांच्या नियुक्तीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यामुळे गर्जना मोर्चातील त्यांचं भाषण महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे.
‘आज पाऊल उचललं, उद्या हात उचलणार’; मुंबईत महामोर्चातून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल






