दिशा सालियन मृत्यू प्रकरणामध्ये महायुतीच्या नेत्यांनी केली आदित्य ठाकरेंची पाठराखण (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्यामध्ये सध्या दिशा सालियन प्रकरण हे चर्चेमध्ये आले आहे. दिशा सालियन हिच्या वडिलांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार होऊन तिची हत्या केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या संदर्भात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. यावरुन आता राजकारण तापले आहे. सत्ताधारी नेत्यांनी या प्रकरणामध्ये नाव येणाऱ्या आदित्य ठाकरे यांना अटक करण्यात यावी अशी मागणी केली आहे. मात्र याला एक नेते अपवाद ठरले आहेत. सत्ताधारी एका नेत्याने आदित्य ठाकरेंची पाठराखण केल्यामुळे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
दिशा सालियन प्रकरण हे पुन्हा एकदा चार वर्षानंतर प्रकाशझोतात आले आहे. यामध्ये तिच्या बलात्कार केल्याचा आरोप तिच्या वडिलांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली होती. त्यांचे नाव या प्रकरणामध्ये येत असल्यामुळे सत्ताधारी नेते आक्रमक भूमिका घेत आहेत. त्यांच्या अटकेची मागणी देखील भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी केली आहे. दरम्यान, याबाबत शिंदे गटाचे नेते संजय गायकवाड आणि अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे सांगितले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय म्हणाले संजय गायकवाड?
एकीकडे महायुतीचे नेते हे आदित्य ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. तर दुसरीकडे संजय गायकवाड यांनी आदित्य ठाकरेंची साथ दिली आहे. शिंदे गटाचे नेते संजय गायकवाड म्हणाले की, “दिशा सालियानच्या प्रकरणात सीआयडी तपास करण्यात आला. मात्र यामध्ये कोणत्याही राजकीय नेत्यांचा समावेश नव्हता. मी आदित्य ठाकरेंची पाठराखण करतोय असे नाही मी जे सत्य आहे ते सांगतो आहे. हे सत्य तपासामध्ये समोर आलं आहे. कोणाकडे काही पुरावे असतील तर त्यांनी ते पुरावे द्यायला हवे होते. पण कोणतेही पुरावे नसल्यामुळे आदित्य ठाकरेंना क्लिन चीट मिळाली आहे त्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार होते. आता मागचे तीन वर्षे आमचे सरकार आहे. पण कोणताही पुरावा मिळालेला नाही,” असे स्पष्ट मत संजय गायकवाड यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अजित पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील दिशा सालियान प्रकरणामध्ये प्रतिक्रिया दिली. त्यांनी देखील आदित्य ठाकरेंची बाजू घेत यामध्ये तथ्य नसल्याचे सांगितले आहे. अमोल मिटकरी म्हणाले की, “दिशा सालियान प्रकरणामध्ये इतक्या वर्षानंतर का याचिका दाखल करण्यात आली? एवढी दिरंगाई का केली? इतक्या वर्षानंतर याचिका का दाखल करण्यात आली? इतकी दिरंगाई का केली? राज्यात औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरुन वातावरण भरकटवले जात आहे. हे महाराष्ट्र समोरचे प्रश्न नाहीत. राजकीय लोकांनी याला हवा देऊ नये. विरोधक आणि सत्ताधारी यांनी दिशा सालियन प्रकरणात महाराष्ट्राचे मूळ प्रश्नांना बगल देऊ नये. प्रशांत कोरटकर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे,” अशी मागणी सत्ताधारी अमोल मिटकरी यांनी केली आहे. यामुळे सत्ताधारी महायुतीमधील भाजपचे मित्रपक्ष हे आदित्य ठाकरेंची बाजू घेत असल्याचे स्पष्ट आहे.