खासदार संजय राऊत यांनी अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर साधला निशाणा (फोटो - टीम नवराष्ट्र)
नाशिक : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहेत. त्यासाठी महायुतीसह महाविकास आघाडी तयारीला लागली आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह हे दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आगामी विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीने अमित शाह यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीचे नेते व खासदार संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला असून माध्यमांशी संवाद साधला आहे. संजय राऊत यांनी अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरुन जोरदार निशाणा साधला आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
विधानसभा निवडणूकीच्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे महाराष्ट्र दौरे वाढले आहे. राज्यामध्ये प्रचाराचा धुराळा उडालेला असताना त्यांचे हे दौरे महायुतीसाठी महत्त्वाचे मानले जात आहे. यावर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधताना खासदार राऊत म्हणाले की, देशाच्या गृहमंत्र्यांना सर्व कामं टाकून मणिपूर, लडाख आणि उत्तर प्रदेश सोडून आणि देशाची कायदा व सुव्यवस्था सोडून आणि अतिरेक्यांचे प्रश्न वाऱ्यावर सोडून देशाचे गृहमंत्री उत्तर महाराष्ट्रामध्ये भाजपच्या निवडणूकीच्या तयारीचा आढावा घ्यायला येतात ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मणिपूरला किंवा काश्मीरच्या सीमेवर ते आढावा घ्यायला गेले नाहीत. लडाखमध्ये चीनचं सैन्य घुसलं आहे, त्याचा आढावा नाही. अरुणाचलमध्ये 60 किमीमीटरमध्ये सैन्य घुसलं आहे पण गृहमंत्र्यांनी त्याचा आढावा घेतला नाही. देशाचं रक्षण सोडून महाराष्ट्रामध्ये येत आहेत ही गोष्ट मला गंमतीची वाटते, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
हे देखील वाचा : महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोणाला किती जागा मिळणार?
पुढे संजय राऊत म्हणाले की, केंद्रीय मंत्री राज्याचा आढावा घ्यायला येतात, याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाची खटीया खडी होती आहे, म्हणून गृहमंत्र्यांना यावं लागलं. गृहमंत्री येणार म्हणजे काय करणार तर आढावा बैठक हे फक्त सांगणार. पण इथले जे कलेक्टर आणि अधिकारी आहेत, त्यांना दम देणार. निवडणूकीमध्ये मतमोजणी करताना आमच्या बाजूने रहा असा दम हे अधिकाऱ्यांना देणार. केंद्रीय गृहमंत्री जेव्हा राज्याच्या निवडणूकांसाठी येतात, तेव्हा निवडणूक प्रक्रियेमधील अधिकाऱ्यांवर दबाव निर्माण करण्यासाठी येतात. या गेल्या दहा वर्षांतील देशाचा अनुभव आहे. लोकसभेमध्ये सुद्धा काही मतदारसंघामध्ये हेच केलं. जेव्हा जेव्हा अमित शाह आणि नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये येतात तेव्हा तेव्हा राज्यातील एक एक उद्योग बाहेर जातो, अशी गंभीर शब्दांत संजय राऊत यांनी भाजप पक्षश्रेष्ठींवर टीका केली आहे.