खरात प्रकरणामुळे रुपाली चाकणकर यांचे राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष पद देखील धोक्यात आले आहे (फोटो - सोशल मीडिया)
Rupali Chakankar : मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर या वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरातला गुरुस्थानी मानल्यामुळे त्या अडचणींमध्ये आल्या आहेत. अशोक खरात (Ashok Kharat) हा लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये अडकला असून त्याची अनेक प्रकरणे आता समोर येत आहेत. त्यामुळे रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना राज्य महिला आयोग अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर आता त्यांच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावर देखील टांगती तलवार आहे.
लैंगिक अत्याचार करणाऱ्या नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याचे पाद्यपूजन केल्यामुळे आणि त्याची पूजा केल्यामुळे रुपाली चाकणकर वादाच्या भोवऱ्यात अडकल्या. महिलांच्या हक्कासाठी आवाज उठवणाऱ्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरुन त्यांना पायउतार व्हावे लागले. त्यांच्याच पक्षातील महिला नेत्या रुपाली चाकणकरांविरोधात भूमिका घेताना दिसत आहेत. यानंतर आता त्यांच्याकडे असणाऱ्या राष्ट्रवादी महिला मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष पद काढून घेण्यात यावे अशी मागणी केली जात आहे.
हे देखील वाचा : पोलीस की घरगडे? एसपी तुषार दोशींच्या निलंबनाची मागणी; सातारा ZPमध्ये नेमकं काय घडलं?
यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चाकणकरांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी त्यांच्याच पक्षातील नेत्यांकडून केली जात आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात महिला नेत्यांचा समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना राजीनामा घेणार का असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी एका ओळीमध्ये उत्तर दिले. रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याबद्दल पक्षाच्या बैठकीत निर्णय होईल असे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.
आज उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी पक्षाच्या सर्वेसर्वा सुनेत्रा पवार यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीपूर्वी राजकीय हालचालींना वेग आला आहे. बैठकीपूर्वी सुनेत्रा पवार या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेल्या. त्यामुळे बारामतीमधील पोटनिवडणुकीसह रुपाली चाकणकर यांच्या विषयी सुद्धा या भेटीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बैठकीमध्ये रुपाली चाकणकर यांच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा : सातारा प्रकरण टाकणार महायुतीत मिठाचा खडा? मध्यरात्री DCM शिंदेंनी गाठले वर्षा निवासस्थान
चाकणकरांच्या विरोधात आंदोलन
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याला अटक केल्यानंतर रुपाली चाकणकर यांचे खरात सोबतचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. रुपाली चाकणकर यांचे अशोक खरात याच्यासोबतचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये रुपाली चाकणकर या अशोक खरात याचे पाद्यपूजन करताना बघायला मिळत आहे. तसेच काही व्हिडीओमध्ये रुपाली चाकणकर खरातचे कौतुक करताना दिसत आहेत. चाकणकर यांनी महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आता चाकणकरांविरोधात काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. रुपाली चाकणकरांना अटक करा, अशा मागणीसाठी पुणे शहर महिला काँग्रेसच्या वतीने शनिवारी फर्ग्युसन कॉलेज रोड येथे आंदोलन करण्यात आले.






