सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणूक वादानंतर एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली (फोटो - सोशल मीडिया)
Satara ZP Conflict : मुंबई : सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये झालेल्या गदारोळ आणि हाणामारीवरुन वाद निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये वाद निर्माण झाला. यामध्ये साताऱ्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) तसेच कॅबिनेट मंत्री मकरंद पाटील यांना धक्काबुक्की करण्यात आली. या प्रकरणावरुन महायुतीमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांची भेट घेतली आहे. त्यामुळे सातारा प्रकरण हे जोरदार गाजणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीवेळी शिंदे गटाच्या मंत्र्यांना झालेल्या धक्काबुक्कीमुळे साताऱ्यामध्ये राजकारण तापले आहे. यामुळे सातारा पोलीस अधिक्षक तुषार दोषी यांच्यासह संबंधित सर्व पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे भाजप मंत्री जयकुमार गोरे यांनी पोलिसांच्या निलंबनाला विरोध केला आहे. यावर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पोलीसांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहे. या प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.
हे देखील वाचा : साताऱ्याच्या राड्यामुळे सरकार धोक्यात? शिंदे गटाच्या नेत्यांकडून राजीनाम्याचा इशारा
एकनाथ शिंदे हे रात्री उशीरा मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर दाखल झाले. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एकनाथ शिंदेंनी भेट घेतली. मीडिया रिपोर्टनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंकडे साताऱ्यामध्ये शिवसेनेकडून खेळण्यात आलेली राजकीय खेळी आणि शंभुराज देसाई यांच्या आरोपांबाबत नाराजी बोलून दाखवली आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये झालेल्या प्रकरणावरुन स्पष्टपणे नाराजी आणि असहमती दर्शवली आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी देखील त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे सातारा प्रकरण महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकणार का हे पाहणे महत्त्वाचे आहे.
हे देखील वाचा : ‘खरातने तोंड उघडल्यास अर्धे मंत्रिमंडळ उघडं पडेल’; ठाकरे गटाच्या माजी खासदाराचं मोठं विधान
साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणेवर पक्षपातीपणाचा आरोप करत थेट निशाणा साधला आहे. “प्रशासनाने कोणाच्या दबावाखाली काम केले?” असा सवाल करत त्यांनी पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. या घडामोडींनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात शिवसेनेच्या आमदारांची तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत आमदारांनी आक्रमक पवित्रा घेत, “भाजपकडून सतत आमची गळचेपी होत असून ही बाब आता सहन केली जाणार नाही,” अशा भावना व्यक्त केल्या. काही मंत्र्यांनी तर गरज पडल्यास थेट राजीनामे देण्याची तयारी दर्शवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.






