फोटो - टीम नवराष्ट्र
सातारा : राज्यात लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यासाठी सर्वच नेत्यांची व पक्षांची तयारी सुरु झाली आहे. अद्याप निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केलेला नाही. त्यापूर्वी राज्यामध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीने विधानसभेसाठी मास्टर प्लॅन तयार केला जात आहे. सातऱ्यामध्ये देखील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या भेठीगाठी वाढल्या आहेत. खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्र भोसले यांच्यामध्ये राजकीय चर्चा वाढल्या आहेत. त्यांनी एकाच गाडीमध्ये प्रवास करत पॅलेसमध्ये देखील चर्चा केली आहे.
काही दिवसांपूर्वी सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे आजारी असल्यामुळे त्यांना पाहण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले हे सुरुची बंगला येथे गेले होते. मात्र त्यांची आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट न झाल्याने आज शिवेंद्रसिंहराजे भोसले आपल्या थोरल्या बंधूराजांना भेटण्यासाठी जलमंदिर पॅलेस मध्ये गेले होते. या वेळेला तब्येतीच्या विचारपूस तर झालीच त्याच बरोबरच दोन्ही राजे बंधू मध्ये राजकीय चर्चा देखील झाली. त्यामुळे अनेक विरोधकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आमदारकीच्या प्रचाराला आत्तापासूनच सुरुवात केल्याची चर्चा आता साताऱ्यात सुरू झाली असून विरोधकांनी देखील या दोन्ही राज्यांच्या भेटीचे चांगलीच जास्त घेतल्याचं दिसून येत आहे.
कित्येक वर्षांपासून दोन्ही राजांच्यात असलेलं वैरत्व सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे एकमेकांच्या बंगल्यावर जाणे- येणे या दोन्ही राजेंचे बंद होते. मात्र लोकसभेच्या निवडणुकीपासून दोन्ही राज्यांचे मनोमिलन झाल्याने हे आता दोन्ही राजे एकमेकांच्या घरात येऊ लागले आहेत. त्यामुळेच अनेक वर्षानंतर शिवेंद्रसिंहराजे भोसले देखील जलमंदिर पॅलेस मध्ये आल्याचे पाहायला मिळाले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांची झालेली भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. साताऱ्याच्या राजकारणावर याचा चांगला परिणाम होण्याची चर्चा रंगली आहे. या दोन्ही नेत्यांनी एकाच गाडीमध्ये प्रवास करत गाणं लावून हा प्रवास केला.