
सुप्रिया सुळेंबाबतचं 'ते' वक्तव्य विजय वडेट्टीवारांनी घेतलं मागे
यापूर्वी वडेट्टीवार यांनी भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा दावा केला होता. याचवेळी सुप्रिया सुळे यांच्याकडेही ओबीसी प्रमाणपत्र असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटल्या.
वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आपल्याकडे कोणतेही ओबीसी किंवा कुणबी प्रमाणपत्र नसल्याचे स्पष्ट करत, वडेट्टीवारांनी आपल्या दाव्याचा पुरावा द्यावा किंवा जाहीर माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली होती.
विजय वडेट्टीवार यांनी माझ्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा धादांत खोटा आरोप केला आहे. माझ्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याची माहिती त्यांना नेमकी कोणी आणि कोणत्या आधारावर दिली, हे त्यांनी जाहीर करावे. तसेच माझ्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा त्यांचा दावा असेल, तर त्यांनी… — Supriya Sule (@supriya_sule) August 27, 2026
दरम्यान, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही या वक्तव्याबाबत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे नाराजी व्यक्त करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी वडेट्टीवारांनी माफी मागावी, अशी भूमिका घेतली होती.
आता वडेट्टीवार यांनी आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, ओबीसी प्रमाणपत्राच्या संदर्भात भूमिका मांडताना सुप्रिया सुळे यांच्या नावाचा उल्लेख अनावधानाने झाला. त्यांचा अपमान किंवा त्यांच्यावर आरोप करण्याचा कोणताही हेतू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या वक्तव्याबद्दल त्यांनी खेदही व्यक्त केला आहे.
मात्र, सुप्रिया सुळे यांचा उल्लेख मागे घेतला असला तरी ओबीसी प्रमाणपत्र घेणाऱ्या मराठा नेत्यांच्या मुद्द्यावर आपली भूमिका कायम असल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
ओबीसी प्रमाणपत्राच्या आधारे सत्तेचा लाभ घेणे आणि त्याचवेळी ओबीसी समाजाच्या हक्कांवर आघात करणे योग्य नसल्याची भूमिका त्यांनी पुन्हा मांडली. आपला संघर्ष कोणत्याही एका व्यक्तीविरोधात नसून ओबीसी समाजाच्या हक्कांचे संरक्षण आणि सामाजिक न्यायासाठी असल्याचेही त्यांनी सांगितले.
त्यामुळे सुप्रिया सुळे आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील या वादाला वडेट्टीवारांच्या स्पष्टीकरणानंतर काहीसा विराम मिळण्याची शक्यता असली, तरी ओबीसी आरक्षण आणि मराठा समाजाच्या ओबीसी समावेशाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय संघर्ष कायम राहण्याची चिन्हे आहेत.
Sushma Andhare News: जिल्हा शल्यचिकित्सकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का नाही? ; सुषमा अंधारे आक्रमक
आपल्या अधिकृत ‘X ‘ अकाउंटवरून बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, “ओबीसी प्रमाणपत्राच्या संदर्भात माझी भूमिका मांडताना खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाचा अनावधानाने उल्लेख झाला. त्यामागे त्यांच्यावर कोणताही आरोप करण्याचा माझा हेतू नव्हता. अनावधानाने त्यांच्या नावाचा उल्लेख झाल्याबद्दल खेद व्यक्त करतो.”
ओबीसी प्रमाणपत्राच्या संदर्भात माझी भूमिका मांडताना खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाचा अनावधानाने उल्लेख झाला. त्यामागे त्यांच्यावर कोणताही आरोप करण्याचा माझा हेतू नव्हता. अनावधानाने त्यांच्या नावाचा उल्लेख झाल्याबद्दल खेद व्यक्त करतो. मात्र, याचा अर्थ ओबीसी प्रमाणपत्र घेणाऱ्या… — Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) August 27, 2026
“मात्र, याचा अर्थ ओबीसी प्रमाणपत्र घेणाऱ्या मराठा नेत्यांबाबत माझी भूमिका बदललेली नाही. एकीकडे ओबीसी प्रमाणपत्र घेऊन सत्तेचा लाभ घ्यायचा आणि दुसरीकडे ओबीसी समाजाच्या हक्कांवर आघात करायचा, ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसायचा, या भूमिकेचे मी कधीही समर्थन करणार नाही. माझा संघर्ष कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून ओबीसी समाजाच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आणि सामाजिक न्यायासाठी आहे!” असे ते यावेळी म्हणाले.