'आम्ही फक्त विकासावरच बोलतो'; माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा भालकेंना टोला
पंढरपूर : अनेक वर्षांपासून पंढरपूर शहरात भाजप सरकारच्या माध्यमातून केलेल्या विकासकामांवर आणि पुढील विकासाचे व्हिजन नागरिकांसमोर मांडत आहे. मात्र, विरोधकांकडून विकासावर न बोलता नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शामल शिरसट यांच्यासाठी माजी आमदार प्रशांत परिचारक, आमदार समाधान आवताडे यांची रॅली ‘परिचारक हटाव’ अशी द्वेषाची भावना जपली जात असल्याचा टोला भालके यांना माजी आमदार परिचारक यांनी लगावला.
पंढरपूर नगरपरिषदेची पंचवार्षिक निवडणूक सुरू असून, यामध्ये भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शामल शिरसट आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रणिता भालके यांच्यात थेट लढत होत आहे. गेली अनेक वर्षांपासून पालिकेवर वर्चस्व असणाऱ्या पांडुरंग परिवाराने शामल शिरसट यांच्या विजयासाठी माजी आमदार प्रशांत परिचारक, युवक नेते प्रणव परिचारक यांच्या माध्यमातून पुढाकार घेतला आहे. २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपा आणि शहर विकास आघाडीने दिलेला वचननामा पूर्ण केल्याचा दावा माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी केला आहे.
दरम्यान, भाजप प्रचार रॅलीला मिळणाऱ्या प्रतिसादावरून माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर नागरिकांचा विश्वास कायम असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे.
…म्हणून वाढलंय भाजपचे प्राबल्य
चार दशकांपासून पांडुरंग परिवाराचे पंढरपूर नगरपालिकेवर वर्चस्व आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या माजी आमदार स्वर्गीय सुधाकर परिचारक यांनी काही वर्षापूर्वी भाजपसोबत काम करण्याची भूमिका घेतल्यामुळे या भागात भाजपचे प्राबल्य वाढले आहे.
पक्षाला फायदा होणार
परिचारक यांनी या निवडणुकीत शामल शिरसाट यांच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी काम करणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिल्याने सर्वसामान्य जनता त्यांच्या पाठीशी उभी राहील आणि याचा फायदा नक्कीच पक्षाला होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
परिचारक यांच्याकडून पंढरपूरच्या विकासासाठी मोठा निधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी पंढरपूरच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून विकासाला चालना देण्याचे काम केले आहे. यामुळे त्यांच्यावर नागरिकांचा विश्वास कायम आहे. नगरपालिकेत अनेक वर्षांपासून प्रतिनिधित्व करणारे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, माजी भाजपा शहराध्यक्ष, नगरसेवक विक्रम शिरसट यांनी केलेल्या कामाच्या प्रचारफेरीमध्ये प्रशांत परिचारक, शामल शिरसाट व अन्य मान्यवर उपस्थित होते.
हेदेखील वाचा : Maharashtra Local Body Election : काँग्रेस-वंचितचा राजकीय घटस्फोट; निवडणूकीच्या ऐनवेळी खुपसला खंजीर






