Maharashtra Politics:' चाव्या कुणाकडेही असल्या तरी तिजोरीच्या मालक...'; चंद्रकांत पाटलांचे अजित पवारांना प्रत्युत्तर
राज्याच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असल्या तरीही त्या तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे. मालकाच्या परवानगीशिवाय तिजोरी उघडता येणार नाही आणि जर ती उघडली तर त्याचे काय परिणाम होतील हे तुम्हाला माहितीच आहे.’ असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.
राष्ट्रपती आणि राज्यपालांना विधेयक मंजुरीवरुन सुनावणी; कालमर्यादा नाही पण विलंब नको
गेल्या काही दिवसात राज्यातील सरकारी निधीच्या वाटपावरून सत्ताधाऱ्यांमध्ये तणाव वाढला आहे. अजित पवार यांनी “राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आपल्याकडे आहेत आणि निधी कुणाला द्यायचा हे देखील आपल्यावरच अवलंबून आहे.” असे विधान केले होते. यावर चंद्रकांत पाटलांनी जोरदार प्रतिक्रिया देत अजित पवारांना खुला इशाराच दिला आहे. चंद्रकांत पाटलांच्या या वादग्रस्त विधानामुळे राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यातील तणाव आणखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “विरोधकांकडे एक मंत्री असला तरी आम्ही इथे दोन मंत्री आहोत. आम्ही महायुतीत असल्यामुळे एकमेकांवर टीका करायचे नाही, असं ठरवलं आहे. आता पर्यंत हसन मुश्रीफ यांनी आपल्यावर टीका केली नाही. पण जर त्यांनी टीका केली, तर मी कशी टीका करतो हे तुम्हाला माहिती आहे,” असे पाटलांनी जोरदार शब्दात सांगितले.
राज्यातील निधीवाटपाच्या राजकारणावरून वातावरण चांगलेच तापले आहे. धाराशिव येथील नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याने वाद पुन्हा पेटला. “माझ्या हातात राज्य सरकारची तिजोरी आहे. माझ्या घड्याळाच्या पाठीशी उभे राहिलात तर बातमीसारखा विकास करू शकतो. अर्थमंत्री म्हणून याकडे बारकाईने लक्ष देईन,” असे अजित पवार म्हणाले होते.
या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही दावा केला की, राज्याच्या तिजोरीच्या चाव्या अजित पवारांकडे आहेत. याच संदर्भावरून चंद्रकांत पाटलांनी जोरदार प्रतिक्रिया देत पवार यांना टोला लगावला. अजित पवार यांच्या बेधडक शैलीची चर्चा नवी नाही. बारामतीतील एका भाषणातही त्यांनी निधीवरून वादग्रस्त वक्तव्य केले होते. “विरोधात उभा राहून निवडून आलेल्या उमेदवाराला नंतर निधी मिळाला नाही तर काय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. “तुम्ही काट मारली, तर मीही काट मारणार,” असेही ते म्हणाले होते.अजित पवारांच्या या सलग वक्तव्यांवर विरोधकांनी जोरदार टीका केली असून, निधीवाटपाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण अधिकच ढवळून निघाले आहे.






