जैन मुनींच्या पांढऱ्या पट्ट्यांवरून मनसे पुन्हा आक्रमक; संदीप देशपांडेंचा ‘हिरवी झाडे' लावण्याचा प्रस्ताव
जैन मुनींसाठी रस्त्यांवर काढण्यात येणाऱ्या पांढऱ्या पट्ट्यांवरून सुरू झालेला वाद अद्यापही शमलेला नसून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) पुन्हा एकदा या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी जैन समाजाला पांढऱ्या पट्ट्यांऐवजी हिरवी झाडे लावण्याचा प्रस्ताव देत या वादाला नवे वळण दिले आहे. याचवेळी त्यांनी राज्याचे मंत्री नितेश राणे यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका केली.
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि कंटेंट क्रिएटर प्रसाद वेदपाठक यांनी आज (मंगळवार, 16 जून) संदीप देशपांडे यांची भेट घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत देशपांडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. जैन मुनींच्या पायांना उन्हाचे चटके बसू नयेत याची काळजी सर्वांनाच आहे. मात्र त्यासाठी सार्वजनिक रस्त्यांवर पांढऱ्या पट्ट्या मारण्याऐवजी झाडे लावली तर पर्यावरणालाही फायदा होईल आणि परिसर अधिक थंड राहील, असे त्यांनी सांगितले. हिरव्या झाडांचा उल्लेख करताना देशपांडे यांनी नितेश राणे यांच्यावरही चिमटा काढला. “हिरव्या झाडांबाबतही कोणाला आक्षेप असेल तर त्याबाबत आम्ही काही करू शकत नाही,” असे ते म्हणाले.
दरम्यान, या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवरही देशपांडे यांनी टोला लगावला. “सीबीआयच का? रॉ किंवा एनआयएकडूनही चौकशी करा,” असे म्हणत त्यांनी या मागणीची खिल्ली उडवली. सार्वजनिक मालमत्तेवर पांढऱ्या पट्ट्या मारून रस्त्यांचे विद्रूपीकरण करणे चुकीचे असल्याचे त्यांनी नमूद केले. जैन समाज ज्या परिसरात राहतो, तेथे मोठ्या प्रमाणावर झाडे लावावीत, त्याला कुणीही विरोध करणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
या प्रकरणात गुन्हे दाखल करण्याच्या मागणीवर बोलताना देशपांडे म्हणाले, “आम्हाला गुन्ह्यांची भीती नाही. मात्र ज्यांनी आधी सार्वजनिक रस्त्यांवर पांढऱ्या पट्ट्या मारल्या, त्यांच्यावर प्रथम कारवाई व्हावी.” सुक्ष्म जीवांचे संरक्षण करण्यासाठी पांढऱ्या पट्ट्यांची आवश्यकता असल्याचा दावा केला जात असल्यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. “कोविड काळात जैन समाजाने लस घेतली नव्हती का? त्यातूनही सूक्ष्मजीव नष्ट झाले असतील. घरात डास आले तर त्यांना मारतात की चावू देतात?” असे सवाल करत कोणत्याही धार्मिक प्रथांचा अतिरेक टाळावा आणि त्या इतरांवर लादू नयेत, असे त्यांनी म्हटले.
यावेळी प्रसाद वेदपाठक यांनीही आपली भूमिका मांडली. हा वाद मूळतः मालमत्तेशी संबंधित मुद्द्यावरून सुरू झाला होता. अनेक वर्षे परिसरात सौहार्दाचे वातावरण होते. मात्र आता परिस्थिती बदलली असून काही जणांकडून आपला पाठलाग केला जात असल्याचा आणि सोशल मीडियावर ट्रोलिंग होत असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणात सर्वप्रथम मनसेने पाठिंबा दिला, तर इतरांकडून अपेक्षित मदत मिळाली नाही, असेही वेदपाठक यांनी सांगितले.






