फोटो सौजन्य: गुगल
हिंदू धर्मात ज्योतिषशास्त्राला मोठं महत्व आहे. असं म्हणतात की पत्रिकेतले ग्रह तारे हे तुमच्या स्वभावाचं आणि भविष्याचा अंदाज असतो. त्यामुळे पत्रिकेतील ग्रह ताऱ्यांचा काही ना काही परिणाम होतो. तुमच्या जन्मवेळेला चंद्र ज्या राशीत प्रवेश करतो त्यावेळी असणारी ती रास तुमची असते. राशीनुसार जसं स्वभावाचा अंदाज लावला जातो तसाच तुमच्या पत्रिकेतील गणानुसार देखील स्वभावाचा अंदाज आणि आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतो याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
लग्न जमवताना वधू आणि वराचे किती गुण जुळत आहेत हे पाहिलं जातं. त्याचप्रमाणे पाहिलं जातं ते गोत्र आणि गण कोणतं आहे ते. गणमिलन याला ज्योतिषशास्त्रात मोठं महत्त्व आहे. देव गण, मनुष्य गण आणि राक्षस गण. या गणांवर व्यक्तीचा स्वभाव, विचारसरणी आणि जीवनशैली यांचा मोठा प्रभाव असतो. या गणांच्या आधारावर माणसाच्या स्वभावाचा अंदाज बांधता येतो.
देवगण : या गणातील व्यक्ती सौम्य, धार्मिक आणि नम्र स्वभावाची असतात. त्यांचा जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन असतो. सहकार्य, सेवाभाव, अध्यात्म आणि संयम ही त्यांची प्रमुख वैशिष्ट्ये असतात. अशा व्यक्ती समाजात मान सन्मान मिळवतात, आणि त्यांच्या आयुष्यात शांतता व स्थिरता असते. असं म्हटलं जातं ती देवगणाच्या, मंडळींना वाईट शक्ती काहीही करु शकत नाही. त्यांचा स्वभाव दुसऱ्यांच्या आनंदात आनंद मानणारा असतो.
समाजसेवा, अध्यात्म किंवा शिक्षक, डॉक्टर यासारख्या सेवा क्षेत्रात ते अधिक दिसतात.कधी कधी हे लोक खूपच सौम्य असल्यामुळे स्वतःचा फायदा सोडून इतरांच्या मदतीला धावतात. यामुळे त्यांच्या आयुष्यात फसवणूक होण्याची शक्यता असते. ही मंडळी संयमी स्वभावाची असतात. यांना मेडीटेशनचे खूप चांगले फायदे होतात. देवगण असणं हे ज्योतिषशास्त्रानुसार एक शुभ संकेत आहे. अशा व्यक्ती भूत-प्रेतांच्या गोष्टींपासून दूर राहतात, त्यांचं आयुष्य शांत आणि संतुलित असतं.
मनुष्यगण : या गणात येणारी मंडळी व्यवहारिक, संतुलित आणि बुद्धिमान अशी असतात. सामाजिक प्रतिष्ठा आणि स्थैर्य यावर त्यांचा भर असतो. कोण काय बोलतंय किंवा कोम आपल्याबद्दल काय विचार करतोय यापेक्षा आपला आपल्यावर किती विश्वास आहे याला ही मंडळी जास्त महत्व देतात. यांचा दृष्टिकोन प्रॅक्टिकल आणि स्थिर असतो.ते भावना आणि बुद्धी यामधील योग्य समतोल साधतात.सामाजिक संबंध जपणं, मैत्री, नेटवर्किंग यात ते पटाईत असतात. यांना समूहाने राहणं खूप आवडतं. मनुष्यगणातील व्यक्ती भावनिक असतात. अंधश्रद्धेचा थोडाफार प्रभाव यांच्यावर दिसून येतो. भूत-प्रेताविषयीठिकाणी किंवा अशा वातावरणात राहिल्यास त्यांना मानसिक अस्वस्थता जाणवू लागते.
राक्षस गण : या गणातील व्यक्ती या तेजस्वी, आत्मकेंद्री, हट्टी, आणि प्रखर बुद्धीचे असतात. राक्षसगण म्हटल्यावर यांच्यात राक्षसासारखी ओरबाडण्याची वृत्ती नसते. त्यांच्यात नेतृत्वगुण, साहस आणि संघर्ष करण्याची जिद्द असते. मात्र, मनाप्रमाणे न झाल्यास यांच्यात अहंकार, चिडचिडेपणा आणि ताणतणाव वाढण्याची शक्यता असते. ते मोठ्या यशाला गवसणी घालतात. नातेसंबंधांना ही मंडळी स्वत:पेक्षा जास्त महत्त्व देतात. या मंडळींना नकारात्मक शक्ती आजूबाजूला असल्यास ती जाणवते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)