फोटो सौजन्य: गुगल
हिंदू धर्मात अनेक व्रत वैकल्य केली जातात. त्यातील एक म्हणजे चतुर्मास. या चतुर्मास व्रत वैकल्य मोठ्या प्रमाणात केली जातात. भारतीय सणावाराला जशी धार्मिक बाजू आहे तसाच वैज्ञानिक दृष्टीकोन देखील आहे. हा चतुर्मास म्हणजे नक्की काय आणि हिंदू धर्मात त्याला इतकं महत्व का दिलं जातं, हे जाणून घेऊयात.
आषाढ महिन्यापासून चतुर्मास सुरु होतो. ‘चतुर’ म्हणजे चार आणि ‘मास’ म्हणजे महिने. हा चार महिन्यांचा कालावधी असतो. आषाढ ते कार्तिक महिन्यापर्यंतचा कालावधी म्हणजे चतुर्मास. आषाढतली एकादशी ही देवशयनी एकादाशी म्हणून ओळखली जाते. या देवशयनी एकादशीपासून सुरु झालेल्या चतुर्मासाचा कालखंड देवउठनी एकादशी म्हणजेच कार्तिकी एकादशीला संपतो. चतुर्मासाचा पुराणातील संदर्भ संदर्भ असा सांगितला जातो की, या काळात भगवान विष्णू क्षीरसागरात योगनिद्रेमध्ये जातात आणि देवउठनी एकादशी म्हणजेच कार्तिकी एकादशीला योगनिद्रेतून जागे होतात. तो हा चातुर्मास.
या काळात व्रत मोठ्या प्रमाणात केली जातात. हिंदू धर्मानुसार चतुर्मासातील काळ हा साधना, संयम, उपवास आणि आत्मशुद्धीचा मानला जातो. या काळात ध्यान करणं, देवाचं नामस्मरण करणं याने आत्मिक शांती लाभते. असं म्हणतात की, भगवान विष्णू क्षीरसागरात योगनिद्रेमध्ये जातात त्यामुळे या काळात कोणतेही शुभ कार्य करत नाही. देवशयनी एकादशी , हरितालिका तृतीया, रक्षाबंधन, कृष्ण जन्माष्टमी, गणेश चतुर्थी आणि वउठनी एकादशी या सणांचा चतुर्मासात समावेश होतो. चतुर्मास म्हणजे आत्मनियंत्रण, साधना, सात्त्विक जीवनशैली आणि श्रद्धेचा काळ. या काळात व्रत करणं म्हणजे आपल्या जीवनात शिस्त, शुद्धता, श्रद्धा आणि संतुलन आणणे असा अर्थ आहे.
धार्मिकबाजू प्रमाणेच या चतुर्मासाला शास्त्रीय कारण देखील आहे. चतुर्मास हा पावसाळ्याचा काळ असतो. या काळात पचनशक्ती कमी होते. पावसाळा असल्याने सूर्याची किरणं पृथ्वीवर पोहोचत नाही.यामुळे पचनशक्तीवर देखील परिणाम होतो. या काळात रोगराई देखील वाढते. त्यामुळे तूप, दही, उडीद, मांसाहार, कांदा-लसूण यांसारखे जड अन्न खाणं टाळावं, असं सांगितलं जातं. या काळात उपवास आणि सात्विक आहार यामुळे शरीर डिटॉक्स होते. शरीर आणि मन यांचा खूप जवळचा संबंध आहे. त्यांमुळे सात्विक आहाराप्रमाणे मानसिक आरोग्य देखील तितकंच महत्वाचं आहे. म्हणून मानसिक शांतता मिळावी म्हणून या दिवसात नामस्मरण करण्याने सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते.