रत्नागिरी नगरपरिषदेत शौचालय घोटाळा (फोटो- istockphoto)
रत्नागिरी नगरपरिषदेमध्ये ४ कोटींचा शौचालय घोटाळा
बोगस कामे अन् अनेक अधिकारी अडचणीत
दुरुस्तीच्या नावाखाली हजारो रुपये लाटले
रत्नागिरी: रत्नागिरी नगरपरिषद ६५ कोटी रुपयांच्या कर्जाखाली आधीच दबलेली असताना रत्नागिरी नगर परिषदेतील एक मोठा घोटाळा समोर आला आहे. भाजपाचे रत्नागिरी नगर परिषदेतील नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर यांनी नगरपरिषदेतील तब्बल ४ कोटी रुपर्याचा ‘शौचालय घोटाळा’ अत्यंत धाडसाने उघडकीस आणला आहे. कर्मचाऱ्यांनी बोगस कामे करून पैसे लाटायचे आणि त्याची शिक्षा मात्र कररूपाने सामान्य नागरिकांना देण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप तिवरेकर यांनी केल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. समीर तिवरेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी शहरात एकूण ८० सार्वजनिक शौचालये आहेत. गेल्या ४ वर्षांत नगरपालिकेवर लोकप्रतिनिधी नसताना म्हणजेच ‘प्रशासक राजवटी’त या शौचालयांच्या दुरुस्ती आणि नूतनीकरणाच्या नावावर मोठा भ्रष्टाचार झाला आहे.
नावाखाली दुरुस्तीच्या – हजारो रुपये लाटले
तिवरेकर यांनी कागदपत्रांची पडताळणी केली असता, दुरुस्तीसाठी वापरलेली १००० रुपयांची वस्तू चक्क ५००० रुपये दाखवून बिले काढण्यात आली आहेत. एकाच शौचालयाच्या दुरुस्तीच्या नावावर दोन ते तीन वेळा खर्च टाकून पैसे लाटण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ही सर्व बिले पास होऊन पैसे देखील दिले गेले आहेत.
Maharashtra Politics: ‘या’ तीनही पंचायत समिती जिंकणार; आमदार भास्कर जाधव
कर्मचाऱ्यांच्या उधळपट्टीचा नागरिकांना भुर्दंड
कागदोपत्री कोट्यवधींचा खर्च होऊनही आजच्या घडीला शहरातील शौचालयांची अवस्था अत्यंत बिकट आहे. काम न करताच बिले लाटल्याचा हा प्रकार असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. एकीकडे हा भ्रष्टाचार सुरू असताना दुसरीकडे नगरपालिकेची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक आहे. समीर तिवरेकर यांनी धक्कादायक वास्तव मांडताना सांगितले की, ‘आजच्या घडीला नगरपालिकेच्या खात्यात फक्त १२ लाख रुपये शिल्लक आहेत, तर पालिकेला कंत्राटदार आणि इतरांचे तब्बल ६५ कोटी रुपये देणे बाकी आहे.’ कर्मचाऱ्यांनी केलेल्या या उधळपट्टीचा भुर्दंड रत्नागिरीतील सामान्य नागरिकांवर कर वाढीच्या स्वरूपात पडणार आहे. प्रशासक राजवटीत अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी मनमानी कारभार केल्याचा आरोप तिवरेकर यांनी केला आहे.
Ratnagiri News: महायुतीच्या अडचणी वाढणार? ‘या’ पक्षाने थोपटले दंड
सर्व पाहणी करून घोटाळा तडीस नेण्याची तयारी
ते म्हणाले, ‘मला रत्नागिरीचा विकास करायचा आहे आणि मी जनतेसाठी लढणार आहे. या घोटाळ्याशी संबंधित निविदा आणि कागदपत्रे मी जमा करत असून, प्रत्येक शौचालयाची सध्याची परिस्थिती काय आहे, याची पाहणी करून हा घोटाळा मी तडीस नेणार आहे समीर तिवरेकर यांच्या या गौप्यस्फोटामुळे नगरपालिकेतील अनेक बड़े अधिकारी आणि कर्मचारी अडचणीत येण्याची शक्यता असून, या प्रकरणात पुढे काय कारवाई होणार, याकडे संपूर्ण रत्नागिरीचे लक्ष लागले आहे.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






