संग्रहित फोटो
वाळवा, मिरज, पलूस, कडेगाव तालुक्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी सामना होईल, तर खानापूर, आटपाडीत भाजप विरुद्ध एकनाथ शिंदे शिवसेना, तर कवठे महांकाळला महायुती विरुद्ध शरदचंद्र पवार राष्ट्रवादी, तासगावला शरदचंद्र पवार राष्ट्रवादी विरुद्ध अजित पवार राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी तिरंगी, तर जतमध्ये भाजप विरुद्ध सर्वपक्षीय लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले.
जिल्हा परिषदेच्या ६१ गट आणि पंचायत समितीच्या १२२ गणांसाठी निवडणूक होत आहे. झेड. पी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास शुक्रवारपासून सुरु झाली होती, बुधवारी (दि. २१) उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस राहिला. निवडणुकीचे राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून आले. उमदेवार फायनल करण्यासह आघाडीबाबत सर्वच राजकीय पक्षांच्या बड्या नेत्यांच्या बैठकांचे गुर्हाळ दुपारपर्यंत सुरुच राहिले. आघाडीबाबत सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या बैठकांचे गुर्हाळ सुरुच राहिले. राजकीय पक्षांकडून उमेदवारी यादी जाहीर न करता महानगर पालिकेप्रमाणे सर्वच राजकीय पक्षांनी सकाळी अकरा वाजता थेट एबी फॉर्म देण्यात आले.
युतीकडून शक्य तिथं युती करण्यासाठी जिल्हाध्यक्ष सम्राट महाडीक, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सत्यजित देशमुख यांच्यासह आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ यांच्याकडून बैठकांचे सत्र सुरुच राहिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील, काँग्रेसचे डॉ. विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील, जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह सावंत, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून माजी खासदार संजय पाटील, जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, शिंदे सेनेकडून आमदार सुहास बाबर, संजय विभुते, जिल्हाध्यक्ष बजरंग पाटील यांच्यात बैठकांचा सपाटा सुरु होता. सर्वच राजकीय पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या मोठी असताना उमेदवारी निश्चित करताना नेत्यांची चांगलीच दमछाक झाली.
मिनी मंत्रालयात सत्ता कायम राखण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरु केले असताना महाविकास आघाडीने आव्हान निर्माण केले आहे. काही तालुक्यात महायुती आणि महाविकास आघाडीत फूट पडल्याचे स्पष्ट झाले. वाळवा तालुक्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी लढत होत आहे. भाजप 6, अजित पवारांची राष्ट्रवादी एक, शिंदे शिवसेना दोन जागा तर एका ठिकाणी आघाडी करण्यात आली. शरदचंद्र पवार राष्ट्रवादीने सर्व ठिकाणी उमेदवार उभे केले असून, काँग्रेसने बोरगाव गटात स्वतंत्र उमेदवार उभा केल्याने महाविकास आघाडीत फूट पडली. शिराळा तालुक्यात जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक आणि माजी आमदार शिवाजीराव नाईक यांनी शरद पवार राष्ट्रवादी, अजित पवार राष्ट्रवादी असे उमेदवार दिले आहेत. त्यांच्याविरोधात भाजपचे आमदार सत्यजित देशमुख यांनी आव्हान उभे केले आहे. भाजपसोबत शिंदे सेनेने हातमिळवणी केली आहे.
मिरज तालुक्यात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होत असून, कवठेपिरान जिल्हा परिषद गट स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यात आला आहे. जनसुराज्य पक्षानेही उमेदवार उभे केले आहेत, मात्र ते भाजपच्या कमळ चिन्हावर लढतील. पलूस आणि कडेगाव या दोन्ही तालुक्यात भाजपचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आणि संग्रामसिंह देशमुख यांच्यात समझोता झाला. तेथे भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत होईल. काँग्रेस नेते आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी भाजपला जोरदार आव्हान देण्याचा प्रयत्न सुरु आहे. खानापूर-आटपाडी तालुक्यात महायुतीत फूट पडली. खानापूर तालुक्यात भाजप विरुद्ध एकनाथ शिंदे शिवसेना अशी लढत होत आहे. आटपाडीत भाजप विरोधात शिंदे शिवसेना लढत होत असून, अजित पवार गट शिंदे सेनेसोबत राहणार आहे.
जत तालुक्यात भाजप विरुद्ध सर्वपक्षीय आघाडीत सामना होईल. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार विक्रमसिंह सावंत, राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार विलासराव देशमुख यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येवून भाजपविरोधात आघाडी केली आहे. तासगाव तालुक्यात रोहित पाटील आणि संजय पाटील यांच्यात लढत होण्याची चिन्हे आहेत. शरद पवार राष्ट्रवादी विरुद्ध अजित पवार राष्ट्रवादी यांच्यात मुख्य सामना होणार असला तरी भाजपकडून स्वतंत्र उमेदवार देण्यात आले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यात अजित पवार राष्ट्रवादी विरुद्ध शरदचंद्र पवार राष्ट्रवादी अशी लढत होणार आहे. राष्ट्रवादीचे रोहित पाटील यांच्याविरोधात संजय पाटील आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे एकत्र येवून आव्हान दिले आहे.
बंडखोरी थांबवणे आव्हानात्मक
उमेदवारी अर्ज माघारीची मुदत २७ जानेवारी आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सर्व राजकीय पक्षांकडे उमेदवारांची संख्या मोठी आहे, काही ठिकाणी युती आणि आघाडी होवून उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. बहुतांशी गट आणि गणांत बंडखोरी झाली आहे, त्यामुळे नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. बंडखोरी रोखण्यासाठी सर्वच पक्षांच्या नेत्यांसाठी आव्हानात्मक ठरणार आहे.
हे सुद्धा वाचा : हर्षवर्धन सपकाळ ‘या’ तारखेला वाराणसी दौऱ्यावर; मणिकर्णिका घाटाची पाहणी करणार
वाळवा, तासगावमध्ये तुतारीविरोधात इतर पक्ष
वाळवा आणि तासगाव तालुक्यात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी विरोधात इतर पक्ष अशी लढत होईल. वाळव्यात जयंत पाटील यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे सर्व ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. त्यांच्याविरोधात भाजप, शिंदे सेना, अजित पवार गट आणि काँग्रेस सर्व पक्ष एकवटले आहेत. तासगाव तालुक्यात शरद पवार राष्ट्रवादीचे आमदार रोहित पाटील यांच्याविरोधात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय पाटील आणि भाजपचे नेते स्वप्निल पाटील यांनी आव्हान दिले आहे.






