फोटो सौजन्य- pinterest
महाराष्ट्रात गणेशोत्सवाच्या काळात गौरी किंवा गौराईचे स्वागत मोठ्या उत्साहाने केले जाते. अनेक घरांमध्ये गौरीला साडी, फुलांची सजावट आणि विविध पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. या नैवेद्यामध्ये काही कुटुंबाच्या परंपरेनुसार मांसाहारी पदार्थांचादेखील समावेश असतो. यामुळे गौराईला मांसाहाराचा नैवेद्य का दाखवला जातो, ही प्रथा सर्वत्र आहे का आणि त्यामागे कारण काय आहे, असे प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होतात.
गौराईला मांसाहारी पदार्थांचे नैवेद्य दाखवण्याची प्रथा नेमकी कुठे आढळते, गौराईच्या पूजेला महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागांमध्ये आणि समाजामध्ये वेगवेगळ्या प्रथा आहेत. काही घरांमध्ये गौराईला पूर्णपणे शाकाहारी नैवेद्य दाखवला जातो तर काही कुटुंबामध्ये कुटुंबाच्या पारंपरिक पद्धतीनुसार मांसाहारी पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. विशेषतः कोकण आणि महाराष्ट्रातील काही भागांमध्ये स्थानिक लोकपरंपरा, कुटुंबाची श्रद्धा आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या रितीरिवाजानुसार गौराईच्या नैवेद्यात मांसाहारी पदार्थांचा समावेश केला जातो. मात्र ही प्रथा सर्व महाराष्ट्रात किंवा सर्व गौरी पूजनामध्ये पाळली जाते असं नाही.
पौराणिक आख्यायिकेनुसार, गौराई ही माहेरवाशीण म्हणून येते आणि तिच्या रक्षणासाठी शिवागार सोबत येतात. हा मांसाहारी नैवेद्य थेट देवीला नसून गौरी सोबत आलेल्या शिवगणासाठी असतो अशी काहींची श्रद्धा आहे. मांसाहारी नैवेद्यामागील लोकपरंपरा नेमकं काय सांगते. काही कुटुंबामध्ये गौराईला घरची समृद्धी, अन्नधान्याची भरभराट आणि सुख समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे घरात जे अन्न पारंपरिक पद्धतीने तयार केलं जातं त्यातील काही पदार्थ देवीला अर्पण करण्याची प्रथा दिसते. मांसाहारी नैवेद्याबाबत काही ठिकाणी लोकमान्यता आढळतात. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे घरच्या अन्नाचा सन्मान. काही कुटुंबामध्ये देवीला केवळ गोडधोडच नाही तर घरच्या जेवणातील पारंपरिक नैवेदय ही अर्पण केले जातात. त्या कुटुंबाच्या आहार परंपरेत मांसाहारचा समावेश असल्यास तो नैवेद्याचाही भाग होऊ शकतो.
दुसरं म्हणजे कुलाचार आणि कौटुंबिक परंपरा. काही प्रथा या धार्मिक ग्रंथांपेक्षा कुळाचार, स्थानिक रुढी आणि पूर्वजांपासून चालत आलेल्या श्रद्धांवर अवलंबून असतात त्यामुळे एका घरातील नैवेद्य दुसऱ्या घरांपेक्षा वेगळा असू शकतो. स्थानिक संस्कृतीचा प्रभावही यामध्ये आहे. कोकणामध्ये अनेक भागामध्ये मासे आणि इतर मांसाहारी पदार्थ हे पारंपरिक आहाराचा भाग राहिलेत त्यामुळे काही स्थानिक देवी परंपरामध्ये त्याचा नैवेद्याशी संबंध जोडला जातो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मांसाहारी नैवेद्य दाखवण्यामागे एकच सर्वसामान्य धार्मिक कारण आहे असं ठामपणे सांगता येत नाही याप्रकारचे स्पष्टीकरण प्रामुख्याने स्थानिक लोकविश्वास आणि कुटुंब परंपरेनुसार बदलतं.
गौराईच्या नैवेद्य़ाची परंपरा घरांनुसार बदलते. अनेक घरांमध्ये पुरणपोळी, पंचपक्क्वान्न, विविध भाज्या, कोंशिबीर, आमटी भात, लाडू आणि इतर गोड पदार्थ केले जातात. तर काही कुटुंबामध्ये पारंपरिक मांसाहारी जेवणाचा भाग म्हणून मासे, मटण किंवा चिकन यांसारखे पदार्थ नैवेद्याला ठेवले जातात. मात्र कोणता पदार्थ ठेवायचा तो कोणत्या दिवशी करायचा आणि पूजा कशी करायची हे त्या कुटुंबाच्या प्रथेनुसार ठरतं
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






