सिद्धिविनायक प्रभादेवी
मुंबईला लोक स्वप्नांचे शहर म्हणून ओळखतात. या शहरातील सर्व काही अद्वितीय आहे आणि मंदिरं तर आश्चर्यकारक आणि अत्यंत सुंदर आहेत. मुंबईतील प्रभादेवी येथे असलेले श्री सिद्धिविनायक मंदिर हेदेखील अशाच मंदिरांपैकी एक आहे. आज संकष्टी चतुर्थी आहे आणि या मंदिराबाबत आपण अधिक माहिती घेऊया.
हे मंदिर बृहन्मुंबईमध्ये असून गणपती बाप्पा आपल्या मनोकामना पूर्ण करतो असा भक्तांचा विश्वास आहे. सद्यस्थितीत सिद्धिविनायक मंदिराची इमारत पाच मजली असून येथे दूरदूरवरून लोक पूजेसाठी येतात. पण या मंदिराच्या नामकरणाची कहाणी तुम्हाला माहीत आहे का? (फोटो सौजन्य – @siddhivinayakonline instagram)
सिद्धिविनायक नामकरणाची कथा
श्रीगणेशाची अनेक रूपे असून प्रत्येक रूपासाठी वेगळी मूर्ती बनवली जाते. परंतु ज्यांची सोंड उजवीकडे वाकलेली आहे अशा गणेशाच्या मूर्ती सिद्धपीठाशी जोडलेल्या आहेत. अशा मूर्ती असलेल्या मंदिरांना सिद्धिविनायक मंदीर नाव दिले जाते सिद्धीविनायकाचा महिमा अगाध आहे, तो भक्तांच्या मनोकामना त्वरीत पूर्ण करतो, असा समज आहे. इतकंच नाही तर सिद्धिविनायकडे साकडे घातल्यानंतर ते पूर्ण होत नाही असं नाही. सिद्धिविनायक हा असा गणपती आहे जो आपल्या भक्तांवर लवकर प्रसन्न होतो आणि तितक्याच लवकर रागवतोही असा याबाबत समज आहे. हे हिंदू धर्मातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे, जे मुंबईच्या केंद्रस्थानी प्रभादेवी येथे स्थित आहे.
मंगळवारी भक्तांची रांग
दर मंगळवारी मोठ्या संख्येने भाविक सिद्धिविनायक मंदिरात गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन मनोकामना पूर्ण करतात. सामान्य लोक या गर्दीचा भाग कायम असतात. पण मोठमोठे सेलिब्रिटीही या मंदिराला भेट देत असतात. यामध्ये अंबानी कुटुंबीय, दीपिका पादुकोण, रणवीर सिंह, अमिताभ बच्चन आणि कुटुंबीय, अशोक सराफ, सचिन पिळगावकर अशा मराठी आणि बॉलीवूडमधील अनेक नावांच्या याद्या आहेत.
कधी होते पहिली आरती
मंदिरातील पहिली आरती पहाटे साडेपाच वाजता होते. मंदिराचे दरवाजे पूजा, नैवेद्य आणि आरतीसाठी सकाळी 10:45 ते दुपारी 1:30 पर्यंत बंद असतात. तोपर्यंत दुरूनच गणेशाचे दर्शन होणे शक्य होते. तसंच या मंदिराचे व्यवस्थापन उत्तम असून येणाऱ्या सर्व भाविकांचे योग्य स्वागतही केले जाते.
बॉलीवूड स्टार्सची जत्रा
कोणत्याही चित्रपटाचे प्रमोशन असो किंवा स्टार्सचे लग्न असो ते सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी नक्कीच येतात. मुंबई दर्शनासाठी आलेल्या प्रत्येकालाच या मंदिराची भुरळ पडते आणि सिद्धिविनायकाच्या दर्शनाशिवाय कोणाचेही मुंबई दर्शन सफल होत नाही. मात्र मंगळवार अथवा संकष्टी या दिवशी या मंदिरामध्ये तुफान गर्दी असते, त्यामुळे वेळ आणि तानमान बघून जावं लागतं हे निश्चित.