फोटो सौजन्य - Social Media
आज २१ सप्टेंबर, भारतातून जरी पाहता येणार नाही तरी आज सूर्यग्रहण आहे. आजचे ग्रहण २०२५ साठी विशेष ठरणार आहे. कारण आजचे सूर्यग्रहण यंदाच्या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण आहे. त्यामुळे खगोलशास्त्रद्न्य असू द्या किंवा विविध धार्मिक श्रद्धेला मानणारा समाज, आज साऱ्यांचे लक्ष या सूर्यग्रहणाकडे आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? ख्रिश्चन समाजात सूर्यग्रहणाला कोणत्या दृष्टीने पाहिले जाते? चला तर मग पाहुयात.
ख्रिश्चन धर्म, जगातील सगळ्यात मोठा धर्म आहे. या श्रद्धेला मानणाऱ्या लोकांची संख्या अफाट आहे, त्यामुळे यांच्या गोष्टी संपूर्ण पृथ्वीवर प्रभाव टाकू शकतात. त्यातच काही लोकांचे असे म्हणणे आहे की ख्रिश्चन धर्मीयांमध्ये सूर्यग्रहणाला प्रकोपाच्या दृष्टीने पाहिले जाते. मुळात, वैज्ञानिकदृष्ट्या सूर्यग्रहण ही एक अतिशय सामान्य गोष्ट आहे, जेव्हा पृथ्वी आणि सूर्याच्या दरम्यान चंद्र येतो, तेव्हा सूर्यग्रहण होते.
वेगवेगळ्या क्षेत्रात मान्यता वेगवेगळी आहे. चीन भागात जेव्हा अजगर सूर्याला जाऊन गिळतो तेव्हा सूर्यग्रहण होते असे म्हंटले जाते. नॉर्डिक देशात तर सूर्याला चक्क कोल्हा जाऊन खातो अशी मान्यता आहे. तर व्हिएतनाममध्ये सूर्याला बेडूक जाऊन खातो त्यामुळे सूर्यग्रहण होते अशी मान्यता आहे. पण ख्रिश्चन धर्मामध्ये या गोष्टीला थेट प्रलयाशी जोडले जात नाही. पण देवाचा काही तरी आदेश आहे अशी मान्यता आहे.
पूर्वीच्या काळात नैसर्गिक आपत्ती, ग्रहण यांसारख्या विलक्षण घटनांना लोक प्रलय किंवा विनाशाशी जोडून पाहायचे. सूर्यग्रहणावेळी अचानक अंधार पडला की लोक घाबरून त्याला जगाचा अंत समजत. काही ख्रिस्ती अनुयायी याला वेळेचा शेवट किंवा प्रलयाचे चिन्ह मानत असत. बायबलमध्ये सूर्य, चंद्र आणि तारे यांना देवाची इच्छा, चेतावणी आणि भविष्यवाणी यांचे प्रतीक मानले जाते. दिवसा सूर्यप्रकाश अचानक नाहीसा होऊन अंधार पसरल्यास, किंवा चंद्र लालसर दिसल्यास त्याला प्रलयाची किंवा देवाची इशारा देणारी घटना समजले जात असे. तथापि, आधुनिक काळात वैज्ञानिक दृष्टीकोनातून सूर्यग्रहण ही एक सामान्य खगोलीय घटना मानली जाते. मात्र अजूनही काही ख्रिस्ती समुदाय या घटनांना प्रतीकात्मक चेतावणी मानून, धार्मिक आचरण, प्रार्थना आणि स्वतःच्या कर्मांवर लक्ष देण्याचा सल्ला देतात.