सौजन्य - नवराष्ट्र टीम
स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजपकडून ज्येष्ठ नगरसेवक श्रीनाथ भिमाले आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडून सुहास टिंगरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अध्यक्ष पदासाठी सोमवारी (२३ फेब्रुवारी) सकाळी ११ वाजता निवडणूक घेतली. निवडणूक निर्णय अधिकारी व एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश खडके यांनी अर्जांची छाननी केली. यामध्ये टिंगरे यांनी वेळ संपल्यानंतर एक मिनीटाने उशीरा अर्ज दाखल केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचा अर्ज बाद केला.
यावर राष्ट्रवादीच्या वैशाली बनकर यांनी अक्षेप घेतला. आम्ही वेळेत अर्ज दाखल केला होता, मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चुकीची वेळ टाकल्याचा आरोप केला. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हा आक्षेप फेटाळत भिमाले यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड केली. यावेळी महापालिका अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, नगरसचिव योगिता भोसले यांच्यासह स्थायी समिती सदस्य उपस्थित होते. दरम्यान, निवड झाल्यानंतर महापौर मंजुषा नागपूरे, सभागृहनेते गणेश बिडकर यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी भिमाले यांचे अभिनंदन केले.
भिमाले यांच्यासमोर मोठी जबाबदारी
महापालिका निवडणुकीत पुणेकरांनी ११९ नगरसेवक निवडून देत भाजपला स्पष्ट बहुमत दिले आहे. चार वर्षाच्या प्रशासक राज नंतर लोकनियुक्त महापौर आणि उपमहापौरही निवडण्यात आले आहेत. आता स्थायी समितीचे अध्यक्षही निवडले गेले आहेत. स्थायी समिती ही महापालिकेतील सर्वाधिक महत्त्वाची समिती मानली जाते. महापालिकेच्या आर्थिक व्यवहारांवर, खर्चाच्या मंजुरीवर आणि विविध विकासकामांच्या प्रस्तावांवर अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार या समितीकडे असतात. त्यामुळे अध्यक्षपदाला विशेष महत्त्व आहे. आगामी अर्थसंकल्प, प्रलंबित प्रकल्प आणि विकासकामांच्या पार्श्वभूमीवर भिमाले यांच्यासमोर मोठी जबाबदारी असणार आहे.
सभागृहातून वॉकआऊट
स्थायी समितीच्या अध्यक्षपदाचा अर्ज वेळेतच दाखल केला होता, असे टिंगरे आणि बनकर यांनी सांगितले. मात्र वेळेत अर्ज दाखल केला नसल्यामुळे अर्ज बाद केल्याचे पीठासीन अधिकाऱ्यांनी सांगताच टिंगरे आणि बनकर यांनी सभागृहातून वॉकआऊट केले.






