फोटो सौजन्य - Social Media
भारतात रक्षाबंधनच्या दिवशी विविध राज्यांमध्ये नारळी पौर्णिमाही साजरी केली जाते. महाराष्ट्रातील कोकण विभागात या सणाला विशेष महत्व आहे. कोकणातील मासेमारी करणाऱ्या कोळी समाजासाठी नारळी पौर्णिमा म्हणजे सगळ्यात मोठ्या सणांपैकी एक असतो. या दिवशी समुद्र देवतेची आराधना केली जाते. दर्या देवाला पुजले जाते. हिंदू पंचांगानुसार, यंदाच्या वर्षी नारळी पौर्णिमा १९ ऑगस्ट २०२४ तारखेला आहे. या सणामध्ये वरुण राजाला एक विशेष मान असतो. कोकणातील तसेच महाराष्ट्रात इतर भागांमध्ये मासेमारी करणाऱ्या समाजात या दिवशी समुद्राला नारळ अर्पण केले जाते. असे म्हटले जाते कि, नारळी पौर्णिमेच्या दिवशी सागर देवाला नारळ अर्पण केल्याने समुद्र देवता प्रसन्न होतात आणि समुद्र किनारी राहणाऱ्या समाजाची वादळ वार्यांपासून रक्षा करतात.
सागर तटावर राहणारे कोळी समाजातील बांधव नारळी पौर्णिमेला विशेष महत्व देतात. इतकेच नव्हे, तर वर्षभर या सणाची वाट पाहत असतात. मराठी महिन्यानुसार, श्रावणात येणारा नारळी पौर्णिमा या सणाच्या दिवशी भगवान शंकराची आराधना केली जाते. नारळावर असलेल्या तीन छिद्रांना त्रिनेत्रधारीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे या दिवशी भगवान शिव शंकराला नारळाचे भोग लावले जातात. नारळी पौर्णिमेच्या दिवशी मासेमार बांधव आपल्या मासेमारीसाठी उपयोगात असलेल्या औजारांची स्वच्छता करतात. ज्या मासेमार बांधवांकडे भरपूर संपत्ती असते, ते या दिवशी नवीन बोट घेण्यास पसंती देतात. एकंदरीत, नारळी पौर्णिमेच्या दिवशी कोळी समाज आपल्या कमला तसेच व्यवसायाला देव मानून त्याचे पूजन करतात.
हे सुद्धा वाचा : राखी बांधताना फक्त 3 गाठी का बांधल्या जातात? जाणून घ्या महत्त्व
नारळी पौर्णिमेच्या दिवशी मासेमारी पूर्णपणे बंद असते. त्याचबरोबर माश्यांच्या सेवनासही सक्त मनाई आहे. कोकणातील काही गावांमध्ये समुद्राला सोन्याचा नारळ देण्याची प्रथा आहे. समुद्र देवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी सागराला नारळ वाहिले जाते. त्याचसोबत नारळ वाहणे शांतीचे प्रतीक मानले जाते. दक्षिण भारतात ही नारळी पौर्णिमेला विशेष स्थान आहे. विशेष म्हणजे तेथील साजरा करण्याची पद्धत महाराष्ट्रपेक्षा जरा वेगळी आहे.






