पंढरपूर : राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहाने महाशिवरात्री साजरी केली जात आहे. महाशिवरात्री निमित्त राज्यभरातील शिव मंदिरं सजली, अनेक ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची रीघ दिसत आहे. तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपुरातील विठ्ठलाचे मंदिरात विशेष सजावट व रोषणाई केली आहे. विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं महाशिवरात्रीनिमीत्त विठ्ठल रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात आकर्षक सजावट करण्यात आली आहेत. विठुराया आणि रक्मिणी मातेच्या गाभारा बेलाची पानं आणि झेंडु-शेवंतीच्या फुलांनी सजला आहे. त्यामुळं सावळ्या विठुरायाचे रुप अधिकच खुलुन आणि विलोभनीय दिसत आहे.
महाशिवरात्र असल्याने पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे मंदिरमहादेवाच्या आवडीच्या बेलपत्राच्या पानाने आणि शेवंती, मोगरा , झेंडू अशा विविध पाना फुलांनी सजवले आहे. मंदीराला सजावट श्री. विठ्ठल भक्त कोळी यानी केली आहे. या सजावटीसाठी जवळपास एक टन बेलपत्राच्या पाना फुलांचा वापर करण्यात आला आहे.
देवाचा गाभारा, सोळखांबी, चारखांबि, तसेच रुक्मिणीमातेचा गाभारा सुंदर असा पांढऱ्या शेवंतीच्या फुलांनी आणि बेलपत्रांने सजवण्यात आला आहे. श्री विठ्ठलाला पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करण्यात आले आहे तर रुक्मिणीमातेला दुधाळ रंगाची साडी परिधान करण्यात आली आहे. त्यामुळे सावळ्या विठुरायाचे आणि रुक्मिणीमातेचे रुप अधिकच खुलून दिसत आहे.