नवरात्रीतली आजची आठवी माळ. देवी म्हटली की तिचा जयघोष हा तिच्या नावाने उदो उदो करत केला जातो. तुळजाई, रेणुका माता, आई अंबाबाई आणि आई एकविरा देवी या देवींच्या नावाने त्यांचा जयघोष केला जातो. कार्ल्याची देवी एकविरा आईला आई माऊलीचा उदो उदो आणि देवी तुळजाईला आई राजाचा उदो उदो असा जयघोष केला जातो, याचा नेमका अर्थ काय किंवा असं का म्हणतात ते तुम्हाला माहितेय का ?
आई एकविरा देवी ही कोळ्यांची श्रद्धास्थान आहे. कोळ्यांची ही देवी फक्त तारणहार नाही तर त्यांची आई आहे. समुद्रात मासेमारीकरता जाणाऱ्या कोळीबांधवांच वादळ वाऱ्यात तसंच समुद्रातील अनेक आव्हानं पेलण्याचं बळ देते अशी एक आख्यायिका सांगितली जाते. आई म्हणजे माऊली म्हणजेच एकविरा माऊली. नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ अर्पण केल्यावर कोळी बांधव पुन्हा मासेमारीच्या व्यवसाय़ाला सुरुवात करतात. त्यावेळी एकविरा देवीला देखील पुजलं जातं. याचबरोबर चैत्र पौर्णिमेला देखील सगळे कोळी बांधव कार्ला लेणीवर एकविरेच्या दर्शनाला जातात. जी आई सुमद्रात मासेमारीला जाताना वादळ पावसापासून वाचवते त्या देवीचा जयघोष म्हणजे आई माऊलीचा उदो उदो असं म्हटलं जातं.
‘आई राजा उदो उदो’ हे भक्तीचे आणि आदराचे उद्गार आहेत, आई राजा उदो उदो हे खास करुन देवी तुळजाभवानीचा जयघोष करताना म्हटलं जातं. तुळजापूरची तुळजाई ही अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हटली जाते.तुळजापूर आणि अवतीभवतीच्या परिसरात शेतकरी वर्ग मोठ्य़ा प्रमाणात आहे. ही तुळजाई शेतकऱ्यांच्या पाठीशी कायम राहते असा विश्वास आहे. शेतकऱ्यांची तारणहार म्हणून आई तुळजाईला भक्तीभावाने पुजलं जातं. संकटातून बाहेर येण्यास मार्ग दाखवते मातृत्वाच्या भावनेने सांभाळते ती आई आणि शेतातून धान्य जो पिकवतो ज्याच्या कष्टामुळे पोटाची खळगी भरते तो बळीराजा या दोघांच्या नावाचा जागर म्हणजे आई राजा उदो उदो असा तुळजाईचा जयघोष केला जातो. अशी एकविरा आणि तुळजाभवानीची आख्यायिका आहे.