(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
घानाच्या राजघराण्याच्या उपस्थितीत अभिनेता, समाजसेवक आणि कॉमनवेल्थ ग्लोबल यूथ ॲम्बेसेडर दारासिंह खुराना यांनी लंडनमध्ये भव्य गाला कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमाला घानाचे महामहिम किंग टॅकी टेको त्सुरु द्वितीय यांच्यासह राजघराण्याचे मान्यवर सदस्य उपस्थित होते. यावेळी कॉमनवेल्थच्या पहिल्या आफ्रिकन महिला महासचिव हर एक्सलन्सी शर्ली बोटचवे यांचा तसेच युनायटेड किंगडममध्ये घानाच्या पहिल्या महिला उच्चायुक्त ठरलेल्या हर एक्सलन्सी सबाह झिता बेंसन यांचा सन्मान करण्यात आला.
महिला नेतृत्व, जागतिक कूटनीती आणि सक्षमीकरणाला समर्पित असलेल्या या कार्यक्रमात विविध देशांतील राजनयिक, मंत्री, मान्यवर आणि विशेष पाहुण्यांनी हजेरी लावली होती. या गालामधून भारत आणि आफ्रिका यांच्यातील वाढते लोकस्तरीय आणि राजनैतिक संबंध अधोरेखित झाले, तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये महिलांचा वाढता सहभाग आणि योगदान यावरही प्रकाश टाकण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान दारासिंह खुराना म्हणाले, “आज केवळ दोन सक्षम महिलांचा सन्मान करण्यात आला नाही, तर महिला शक्ती आणि तिच्या अस्तित्वाचा हा उत्सव आहे. महिलांकडे जपणूक करण्याची आणि समाजाला पुढे नेण्याची विशेष क्षमता असते. जेव्हा त्यांना योग्य सन्मान आणि संधी दिली जाते, तेव्हा त्या जगात मोठा सकारात्मक बदल घडवू शकतात.”
काय चाललंय राव! एल्विश यादव आणि जिया शंकरचा साखरपुडा की…? Gen-Z शो साठी युक्ती
या गाला कार्यक्रमात सन्मानित महिलांच्या कूटनीती, सार्वजनिक सेवा आणि आंतरराष्ट्रीय संबंधांमधील उल्लेखनीय योगदानाचे कौतुक करण्यात आले आहे. जागतिक प्रगती आणि समतोल विकासासाठी महिलांचे नेतृत्व किती आवश्यक आहे, यावरही यावेळी भर देण्यात आला आहे. अलीकडेच लंडनमध्ये आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय स्तरावर महिला नेतृत्वाचा गौरव करणारा ठरला आहे. अभिनेता दारासिंह खुराना हे भारतीय अभिनेते, समाजसेवक तसेच मानसिक आरोग्य जनजागृतीसाठी कार्यरत असून, कॉमनवेल्थचे ग्लोबल यूथ ॲम्बेसेडर म्हणून ते युवा सक्षमीकरण, कूटनीती आणि सामाजिक उपक्रमांसाठी जागतिक पातळीवर ओळखले जातात.






