(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
Chattrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्यावेळी दक्षिणेमध्ये अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. इसवी सन १६३० मध्ये भारतात प्रचंड दुष्काळ पडला होता, रयत होरपळून निघाली होती. गाव ओस पडले, दुष्काळाच्या संकटाला जोडूनच साथीच्या रोगांचा फैलाव झाला मात्र समकालीन राज्यकर्ते आपापसात कुरघोडी करण्यात व्यस्त असल्यामुळे राजकीय अस्थिरता निर्माण झाली.
राजकीय परिस्थिति म्हणाल तर, इ.स. १६३० च्या सुमारास निजामशाही अतिशय कमकुवत झाली होती. आदिलशाही दरबारात अंतस्थ कटकटी सुरू झाल्या होत्या. कुतुबशाही जरी आपले अस्तित्व टिकवून असली तरी मुघलांचा प्रभाव तेथे वाढू लागला होता. अशा परिस्थितीत १६३६ मध्ये शहाजहानने दक्षिणेची स्वारी काढली. कुतुबशहाशी सख्य जुळवून आदिलशहाबरोबर तह करून निजामशाही विरूद्ध लढा उभारला. शहाजिंनी निजामशाही वाचविण्याचे प्रयत्न केले मात्र १६३६च्या अखेरीस त्यांना शरणागती पत्करावी लागली. शहाजहानने निजामशाही खालसा केली आणि तो प्रदेश मुघल व आदिलशहा यांच्यामध्ये वाटून घेण्यात आला. शहाजींनी आदिलशाहीची नोकरी पत्करली, त्यांच्या कडे पुण्याची जहागीर होती, कालांतराने शहाजी राजे कर्नाटकात निघून गेले आणि पुणे जहागिरीची देखरेख करण्यासाठी शहाजींनी दादोजी कोंडदेव याची नेमणूक केली. या जहागिरीमध्ये इंदापूर, सुपे, पुणे आणि चाकण हे परगणे होते. शहाजी जरी कर्नाटकात असले तरी जिजाबाई व बालशिवाजी शिवनेरीवरच होते.
त्यांच्यासह शामराज निळकंठ याची शिवाजीचा पेशवा म्हणून नेमणूक केली. याशिवाय माणकोजी दहातोंडे, सरनोबत बाळकृष्णपंत दीक्षित याला मुजुमदार म्हणून नेमले, सोनोपंत डबीर आणि रघुनाथ बल्लाळ सबनीस हे देखील सोबतीला होते. दादोजी कोंडदेव, राजमाता जिजाऊ यांच्या सह बालशिवाजी जहागिरीचे कामकाज शिकू लागले. मात्र सुलतानांची वतनदारी सांभाळणे शिवरायांना कधीच मान्य नव्हते. अन्याय अत्याचारत खितपत असलेल्या आपल्या रयतेला स्वतंत्र करून सार्वभौम सत्ता स्थापन करण्याचा त्यांनी विचार केला.
राजे शहाजी आणि राजमाता जिजाऊ यांची शिकवण आणि प्रेरणा घेऊन २७ एप्रिल १६४५ मध्ये शिवाजी महाराजांनी आपल्या सवंगळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. शिवरायांनी पुण्याभोवतीचे सर्व कोट, किल्ले, चोरवाटा, भुयारे, तळघरे, दारुगोळा,हत्यारे आणि शत्रूच्या फौजांची ठाणी यांची खडानखडा माहिती मिळवली. स्वराज्याची मुहुर्तमेढ रोवण्यासाठी इ. स. 1647 मध्ये शिवाजी महाराजांनी तोरणा हा किल्ला आदिलशाहीकडून जिंकून घेतला, त्या नंतर मुरूम्बदेवाचा डोंगर, चाकणचा संग्रामदुर्ग, कोंढणा किल्ला असे अनेक किल्ले महाराजांनी ताब्यात घेतले.
शहाजी राजांची जहागीरी पुणे आणि सुपे इंदापूर. या भागावर लक्ष ठेवण्यासाठी आवश्यक असणारे किल्ले शिवराय एका मागून एक घेत होते. त्यानंतर शिवरायांचे लक्ष गेलं ते पुरंदर किल्ल्यावर, किल्लेदार होता निळकंठराव हैबतराव, भावा भावांच्या भांडणाचा फायदा घेत शिवरायांनी पुरंदर किल्ला युक्तीने आपल्या ताब्यात घेतला. या सर्व गोष्टींच्या तक्रारी आदिलशहा पर्यंत पोहोचल्या होत्या, त्याने शहाजीराजांना त्याबाबत ताकीद दिली मात्र शहाजीराजांनी प्रकरण धुडकावून लावले.
आदिलशहाच्या या कटाने इतिहासाला कलाटणी दिली. कट होता भोसले पिता पुत्रांच्या विरोधात. शहाजी राजे, शहाजीपुत्र संभाजी आणि शिवराय या तिघांवर एकाच वेळी कारवाई करण्याचा! कटात आदिलशाह सोबत बाजी घोरपडे, मुस्तफा खान, मंबाजी भोसले, आणि अफजलखान सामील होता. मुस्तफा खान, अफजल खान, बाजी घोरपडे आणि मंबाजी भोसले यांच्यावर जबाबदारी होती शहाजी राजेनां कैद करण्याची, दुसरीकडे शहाजीपुत्र संभाजीवर बंगलोर ला फरहाद खान मोठ सैन्य घेऊन गेला. आणि फतेह खान ला पाच हजार सैन्यासह शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवण्यात आल.
एकाच वेळी भोसले कुटुंबावर तिन्ही बाजूने संकट आले, त्यांना एकमेकांना मदत करणे शक्य नव्हते, हा कट तिघांनी आपापल्या पद्धतीने उधळून लावायचा होता. शहाजी राजांना कैद करण्यात आल. शिवरायांवर चालून आलेला फतेह खान आदिलशाहच सरदार, पाच हजारची फौज, सोबत मुसे खान , मिनाद शेख, फाजल खान, बाळाजी हैबतराव, नाईक निंबाळकर, मताजी घाटगे, आश्रम शाह, आणि मोठा खजिना एवढा मोठा लवाजमा! तर दुसऱ्या बाजूला मूठभर मावळे, तुटपुंजी शस्त्र आणि शिवराय. मात्र निष्ठेची तलवार आणि आत्मविश्वासची ढाल करून मावळे आदिलशहाच्या सैन्यावर चालून गेले.
हीच ती स्वराज्याची पहिली लढाई! ह्या लढाईने आदिलशाहीवर शिवरायांचा धाक बसला. फतेह खान ला कळलं शिवाजी महाराज पुरंदर गडावर आहेत, त्याने लगेच बेलसरला तळ ठोकला. बेलसर पासून जवळच असणारा सुभान मंगल किल्ला, पुरंदर किल्ला, आणि शिरवळ चे ठाणे शिवाजी महाराजांच्या ताब्यात होते. फतेह खान ने बाळाजी हैबतराव याला सुभान मंगळ वर पाठवल. आणि खान च सैन्य दोन ठिकाणी विभागल्या गेल. शिवाजी महाराजांनी सुभान मंगळ फतेह खानाला लुटुपुटूची लढाई करून जिंकून दिला, शिरवळ ठाणेही जिंकून दिले.
शिवाजी महाराजांना जे पाहिजे होत ते त्यांनी साधल, फतेह खान विजयाच्या उन्मादात राहीला आता त्याचे सैन्य तीन ठिकाणी विभागले गेले.
बाळाजी हैबतराव आणि त्याचे सैन्य विजयाचा उत्सव साजरा करून नाचून दमून भागून झोपलेले, रात्रीच्या अंधारात मावळ्यांनी किल्ल्याला शिड्या लावल्या, किल्ल्यात प्रवेश मिळवून हैबतराबाची फौज कापून काढली. किल्ला जिंकला. दुसरा हल्ला शिरवळच्या ठाण्यावर करून ते ठाणे ही पुन्हा शिवरायांच्या मावळ्यांनी जिंकून घेतले.
तिसरा हल्ला हा बेलसरच्या छावणीत होणार होता. रात्रीच्या अंधारात पडत्या पावसात बाजी पासलकर यांच्या नेतृत्वात हा हल्ला झाला.
खानावर तीन हल्ले झाले सुभान मंगळ, शिरवळ आणि खुद्द खान असलेली बेलसरची छावणी. हल्ले झाले पुरंदरावरून. फतेह खान चवताळून उठला आणि शिवाजी महाराजांनी हेच हव होत. फतेह खान आपल्या सैन्यांनीशी पुरंदरावर चाल करून गेला. खानाचे सैन्य पुरंदराच्या पायथ्याला पोहोचले. तरी राजांनी त्याला विरोध केला नाही. आपले सैन्य पाहून शिवाजी घाबरून किल्ल्यात लपून बसला. या समजुतीने फतेह खानाचे सैन्य किल्ल्यावर चढाई करू लागले.
राजांनी या सैन्याला तटापर्यंत भिडू दिले आणि आपल्याला इच्छित असणाऱ्या जागेत माऱ्याच्या टप्प्यात शत्रू आलेला पाहून मावळ्यांना इशारा केला. मावळे शत्रूवर तुटून पडले. अचानक झालेल्या हल्ल्याने खानाचे सैन्य गांगारून गेले, जीव वाचवण्यासाठी माघारी पळत सुटले. याचा शिवाजी राजांनी फायदा घेतला, किल्ल्याचा दरवाजा उघडून खानाच्या सैन्यावर हल्ला करण्याचा हुकूम सोडला आणि गोदाजी जगताप, भैरोजी चोर, भिमाजी वाघ यासारख्या वीरांनी पराक्रमाची शर्त केली मुसे खान ठार झाला मीनाद खान मारला गेला मताजी घाटगे कापला गेला. हे बघून फतेह खान आणि त्याच सैन्य घाबरल आणि तिथून पळत सुटल. मावळ्यांनी सासवड पर्यंत त्यांचा पाठलाग केला. या लढाईत बाजी पासलकर गनिमा सोबत लढता लढता धारातीर्थी पडले पण स्वराज्याची पहिली लढाई यशस्वी झाली.