वैजापूरच्या दोन गट, एका गणात आमदार बोरनारेंच्या पाठिंब्याने विजय; ठाकरे गट ठरला खरा 'धुरंधर' (संग्रहित फोटो)
वैजापूर / विजय गायकवाड : तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संपत चालला. अशी चर्चा असतानाच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत तब्बल तीन जागा पटकावून फिनिक्स पक्षाप्रमाणे उभारी घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. पाठीशी फारसी ताकद नसतानाही शिवसेनेने ठाकरे गटाला मिळालेले यश हे नक्कीच कौतुकास्पद म्हणावे लागेल.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक होऊन निकाल नुकताच जाहीर झाला. या निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवून शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्याखालोखाल पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) ४ जागा मिळवून बाजी मारली तर भाजप तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. निवडणुकीत उबाठा शिवसेनेला उमेदवार मिळतो किंवा नाही? अशी परिस्थिती निर्माण झाली होती. तसे पहायला गेले तर या पक्षाकडून कुणी निवडणूक लढवायलाही फारसे इच्छुक नव्हते. परंतु, शिवसेना भाजप युतीत जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील जागा सुटल्याने ‘अभी नहीं तो कभी नहीं’ असे म्हणत इच्छुक उमेदवारांची पावले तिकडे वळायला लागली.
शिवसेनेचे संजय निकम यांनी ऐनवेळी शिवसेना ठाकरे गटाची उमेदवारी मिळवून शिऊर जिल्हा परिषद आखाड्यात उतरले. याशिवाय बोरसर गटात मनोज गायकेंनी उडी घेतली तर खंडाळा पंचायत समिती गणात हुसेन शेख शड्डू ठोकून मैदानात उतरले. परंतु, निवडणूक जशीजशी जवळ येत गेली तसतसा शिवसेना भाजप युतीचे मुखवटे गळायला सुरुवात झाली अन् दोन्हीही पक्षांची युती असतानाही अपक्षांच्या पारड्यात वजन टाकायला सुरुवात केली. परिणामी, दोन्हीही पक्षांनी आपले हितसंबंध जपत मर्जीतील उमेदवारांना पाठबळ देऊन राजकीय ताकद खर्ची केली. या गदारोळात शिवसेना-भाजप युतीचे सर्वात मोठे नुकसान झाले. परंतु, मान्य कुणी करायचे? हाच यक्षप्रश्न आहे.
कदाचित युती अभेद्य राहिली असती तर…
काही अपवाद वगळता अन्य पक्षांच्या उमेदवारांचा उदय झाला नसता. पण तरीही या निवडणुकीच्या बाजारात आमदार रमेश बोरनारे उजवे राहिले. असे म्हणता येईल. यात संजय निकम व हुसेन शेख भलेही उबाठा शिवसेनेचे असले तरी शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांनी या दोघांच्या पाठीशी संपूर्ण राजकीय वजन वापरून त्यांना विजयी केले. तसे पहायला गेल्यास निकम राजकारणात नवखे नाहीत. परंतु, बोरनारेंच्या पाठबळाने त्यांचा विजय सुकर झाला.
हुसेन शेख थेट निवडणुकीच्या रिंगणात
पोलिस खात्यातून सेवानिवृत्त झाल्यानंतर हुसेन शेख थेट निवडणूक आखाड्यात उतरले. त्यांना राजकारणाचे अंग अथवा अनुभव होता. असे बिल्कुल नाही. परंतु बोरनारेंच्या ताकदीने त्यांना सावरले. याशिवाय बोरसर गटात उबाठाचे मनोज गायकेंनी स्वबळावर विजय मिळवला. या तुल्यबळ लढतीत त्यांनी माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांचे पुत्र तथा शिवसेनेचे उमेदवार अजय पाटील चिकटगावकरांवर मात केली. या गटात गायकेंना भाजपचा छुपा पाठिंबा असल्याची चर्चा होती. परंतु काही फायदा झाला असेल, याची सुतराम शक्यता नाही.
हेदेखील वाचा : Supriya Sule : भगतसिंह कोश्यारींना पद्मभूषण पुरस्कार; खासदार सुप्रिया सुळेंनी थेट जोडले हात






