Nature Miracle : दिवसाला ४०० किलो सिलिकॉन! जाणून घ्या पाणघोडे कसे बनले नद्यांचे नैसर्गिक रक्षक? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
निसर्गाने प्रत्येक प्राण्याला या पृथ्वीवर एका विशिष्ट उद्देशासाठी निर्माण केले आहे. अनेकदा ज्या प्राण्यांकडे आपण केवळ एक अवाढव्य किंवा हिंस्त्र जीव म्हणून पाहतो, तेच प्राणी पर्यावरणाचे चक्र सुरळीत चालवण्यासाठी सर्वात महत्त्वाचे दुवे ठरतात. (Nature Miracle)असाच एक थक्क करणारा वैज्ञानिक खुलासा पाणघोड्यांच्या (Hippopotamus) जीवनशैलीवर झालेल्या संशोधनातून समोर आला आहे. केनियातील प्रसिद्ध मारा नदीवर करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, नदीतील जीवसृष्टी आणि जलचर अन्नसाखळी जिवंत ठेवण्यासाठी पाणघोडे अत्यंत मोलाची भूमिका बजावत आहेत.
प्रसिद्ध ‘सायन्स ॲडव्हान्सेस’ (Science Advances) या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक मासिकात “हिप्पोपोटॅमस ॲम्फिबियस: द ॲनिमल सिलिकॉन पंप” या शीर्षकाखाली एक महत्त्वपूर्ण शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे. या अभ्यासानुसार, कोरड्या ऋतूमध्ये पाणघोडे केनियाच्या मारा नदीत दररोज तब्बल ०.४ मेट्रिक टन (म्हणजेच ४०० किलो) सिलिकॉन वाहून आणतात. हा सिलिकॉन थेट जमिनीवरून नदीच्या पात्रात पोहोचतो आणि पाण्यातील सूक्ष्म जीव तसेच संपूर्ण अन्नसाखळीला मजबूत आधार देतो.
पाणघोड्यांची दैनंदिन जीवनशैली अतिशय रंजक असते. ते आपला दिवस नदीच्या खोल आणि थंड पाण्यात विश्रांती घेण्यात घालवतात, तर रात्र होताच अन्नाच्या शोधात सव्हानाच्या विस्तीर्ण गवताळ प्रदेशात बाहेर पडतात. रात्रभर गवत चरल्यानंतर सूर्योदयाच्या वेळी ते पुन्हा नदीच्या पात्रात परततात. ही साधी दिसणारी दिनचर्या प्रत्यक्षात एक महाकाय नैसर्गिक वाहतूक यंत्रणा म्हणून काम करते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Air India Saudi: सौदी अरेबियाला जाणारी सर्व उड्डाणे रद्द, एअर इंडिया, इंडिगोने जारी केली सूचना, प्रवाशांना रिफंड मिळणार का?
सव्हाना प्रदेशातील गवतामध्ये जमिनीतील सिलिकॉन मोठ्या प्रमाणावर शोषित झालेले असते. जेव्हा पाणघोडे हे गवत खातात, तेव्हा त्यांच्या पचनसंस्थेतून हे सिलिकॉन प्रक्रियेतून जाते. दिवसभरात नदीच्या पात्रात विश्रांती घेत असताना पाणघोडे जेव्हा शेण टाकतात, तेव्हा ते विष्ठेच्या रूपात थेट नदीच्या पाण्यात मिसळते. एरवी सिलिकॉन जमिनीतच अडकून राहतो किंवा त्याचा प्रवास खूप मंद असतो, परंतु पाणघोड्यांच्या या प्रक्रियेमुळे सिलिकॉन कोणतीही अडचण न येता थेट पाण्याच्या प्रवाहात समाविष्ट होतो.
शास्त्रज्ञांनी फेब्रुवारी २०१४ मध्ये नैऋत्य केनियातील मासाई मारा भागातील नदीच्या काठावर क्षेत्रीय नमुने गोळा केले होते. या अभ्यासादरम्यान गोळा करण्यात आलेल्या आकडेवारीने जगभरातील पर्यावरणतज्ज्ञांचे लक्ष वेधून घेतले आहे. या संशोधनानुसार, मासाई मारा भागातील सुमारे ८० पाणघोड्यांचा समूह दररोज ४२.० मेट्रिक टन सुके गवत खातो आणि दिवसभरात ११.१ मेट्रिक टन सुके शेण नदीच्या पात्रात टाकतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Tesla Roadster: इलॉन मस्कचा धडाकेबाज पराक्रम! अखेर टेस्लाने लाँच केली ‘ही’ खतरनाक हवेत उडणारी कार; बुकिंग सुरू, VIDEO तुफान VIRAL
या प्रक्रियेमुळे दररोज ०.४ मेट्रिक टन जैविक सिलिकॉन नदीत पोहोचतो. संशोधकांनी जेव्हा मासाई मारा येथील सिलिकॉनच्या एकूण प्रवाहाची मोजणी केली, तेव्हा असे दिसून आले की नदीतील एकूण सिलिकॉन प्रवाहामध्ये एकट्या पाणघोड्यांचा वाटा तब्बल ७६% इतका प्रचंड आहे. ज्या पात्रात पाणघोडे उपस्थित होते, तिथे जैविक सिलिकॉनचे प्रमाण नदीच्या वरच्या पात्रापेक्षा दुप्पट आढळले. प्रयोगशाला चाचण्यांवरून स्पष्ट झाले की पाणघोड्याच्या शेणातील २.८% जैविक सिलिकॉन २४ तासांच्या आत पाण्यात विरघळते, जे सामान्य गवताच्या कुजण्यापेक्षा १७.२ पट वेगाने घडते.
आता प्रश्न असा उपस्थित होतो की, नदीच्या पाण्यात सिलिकॉन असणे इतके महत्त्वाचे का आहे? याचे उत्तर जलीय वनस्पती आणि सूक्ष्म जीवांशी जोडलेले आहे. नदीच्या पाण्यात ‘डायटम्स’ (Diatoms) नावाचे अत्यंत सूक्ष्म शेवाळ (Microalgae) असते. हे सूक्ष्म शेवाळ पाण्यातील प्राथमिक उत्पादक मानले जाते आणि ते जलीय अन्नसाखळीचा पाया असते.
डायटम्सना आपल्या पेशींच्या भिंती (Cell walls) तयार करण्यासाठी आणि स्वतःचे रक्षण करण्यासाठी विरघळलेल्या सिलिकॉनची अत्यंत गरज असते. जर पाण्यात सिलिकॉनचे प्रमाण कमी झाले, तर डायटम्सची वाढ थांबते. परिणामी, त्यांना खाऊन जगणाऱ्या लहान माशांना आणि किड्यांना अन्न मिळत नाही, ज्यामुळे संपूर्ण नदीतील मत्स्यव्यवसाय आणि अन्नसाखळी धोक्यात येऊ शकते. त्यामुळे पाणघोड्यांनी पुरवलेला हा सिलिकॉन थेट डायटम्सची संख्या नियंत्रित करतो आणि नदीची जैविक विविधता टिकवून ठेवतो.
शास्त्रज्ञांनी या अभ्यासातून केवळ एक सकारात्मक शोधच लावला नाही, तर एक गंभीर इशाराही दिला आहे. जर हवामान बदल, शिकारी किंवा मानवी अतिक्रमाणांमुळे पाणघोड्यांची संख्या कमी झाली, तर नद्यांमधील सिलिकॉनचा पुरवठा विस्कळीत होईल. यामुळे व्हिक्टोरिया सरोवर आणि पूर्व आफ्रिकेतील इतर मोठ्या सरोवरांवर विपरीत परिणाम होऊ शकतो.
तसेच, पाणघोड्यांच्या शेणातून सेंद्रिय पदार्थ आणि इतर पोषक तत्वेही पाण्यात मिसळतात, जे ठराविक प्रमाणात फायदेशीर असतात. मात्र, पाण्याचा प्रवाह कमी असताना सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण खूप वाढल्यास ऑक्सिजन कमी होण्याचा धोकाही असतो. तरीही, एकंदरीत पाहता पाणघोडे हे जमिनीवरील पोषक घटक पाण्यात हस्तांतरित करणारे निसर्गाचे एक अतुलनीय आणि आवश्यक इंजिन आहेत, यावर शास्त्रज्ञांनी शिक्कामोर्तब केले आहे.






