National Doctors' Day : डॉक्टर गुगलवर विश्वास ठेवताय?आरोग्यासाठी ठरु शकते धोकादायक; तज्ज्ञांकडून महत्त्वपूर्ण इशारा (फोटो सौजन्य: Adobe Stock)
तज्ज्ञांच्या मते, अनेक रुग्ण दवाखान्यात येण्यापूर्वी इंटरनेटवर लक्षणे शोधून स्वतःच आजाराचा निष्कर्ष काढतात. काही जण सोशल मीडियावर पाहिलेल्या व्हिडिओंमधील उपायांचा अवलंबही करतात, तर काही विशिष्ट औषधे किंवा तपासण्यांचा आग्रह धरतात. यामुळे योग्य निदान करण्यासाठी डॉक्टरांना अधिक वेळ देऊन समुपदेशन करावे लागते.
तर दुसरीकडे, इंटरनेटमुळे आरोग्यविषयक जागरूकता वाढल्याचे सकारात्मक चित्रही आहे. अनेक रुग्ण उपचारांची माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करतात, औषधांचे दुष्परिणाम, पर्यायी उपचारपद्धती आणि जीवनशैलीतील बदल याबाबत प्रश्न विचारतात. त्यामुळे डॉक्टर-रुग्ण संवाद अधिक मोकळेपणाने होतो, असेही काही डॉक्टरांचे म्हणणे आहे.
मात्र, सोशल मीडियावरील अप्रमाणित माहिती, व्हॉट्सॲप फॉरवर्ड, प्रभावशाली व्यक्तींकडून दिले जाणारे वैद्यकीय सल्ले आणि एआय चॅटबॉट्सवर अवलंबून राहण्याची वाढती प्रवृत्ती चिंतेचा विषय ठरत आहे. अनेकदा रुग्ण स्वतःहून औषधे सुरू किंवा बंद करतात, उपचार अर्धवट सोडतात किंवा उशिरा डॉक्टरांकडे पोहोचतात. त्यामुळे आजार गंभीर होण्याचा धोका वाढतो.
‘डॉक्टर्स डे’च्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांनी नागरिकांना इंटरनेटवरील माहितीचा वापर केवळ प्राथमिक माहितीसाठी करावा आणि उपचारांबाबतचा अंतिम निर्णय तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यावा, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. तंत्रज्ञानामुळे माहिती मिळणे सोपे झाले असले, तरी योग्य निदान, रुग्णाची प्रत्यक्ष तपासणी आणि वैयक्तिक वैद्यकीय सल्ल्याला पर्याय नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जनरल फिजिशियन डॉ. कुणाल मुनाळे सांगतात ‘गुगल किंवा एआयवरून मिळणारी माहिती ही सामान्य स्वरूपाची असते. प्रत्येक रुग्णाची प्रकृती, वैद्यकीय इतिहास आणि तपासणीचे निष्कर्ष वेगळे असतात. त्यामुळे इंटरनेटवरील माहितीच्या आधारे उपचार सुरू करणे किंवा बदलणे धोकादायक ठरू शकते.’
तर स्त्रीरोगतज्ञ डॉ. मीरा शिंदे ‘आजचे रुग्ण अधिक जागरूक आहेत, ही सकारात्मक बाब आहे. मात्र, सोशल मीडियावरील प्रत्येक माहिती वैज्ञानिकदृष्ट्या योग्य असेलच असे नाही. डॉक्टरांशी मोकळेपणाने संवाद साधल्यास उपचार अधिक प्रभावी ठरतात.’






