International Yoga Day 2026 : डिजिटल तणावावर योगाचं प्रभावी औषध; स्क्रीन टाईम, फोमो अन् बर्नआउटपासून मिळेल दिलासा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
जांभूळ मधाचे आरोग्यदायी गुणधर्म वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध, पुण्यातील शास्त्रज्ञांचे संशोधन प्रकाशित
यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची ‘योगा फॉर हेल्दी एजिंग’ (निरोगी वृद्धत्वासाठी योग) ही संकल्पना आहे. नियमित योगाभ्यासाद्वारे सर्व वयोगटांतील नागरिकांनी आयुष्यभर शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जपावे, हा संदेश यानिमित्ताने दिला जात आहे.
ऑनलाइन शिक्षण, घरून काम करण्याची पद्धत, करिअरमधील स्पर्धा आणि सोशल मीडियावरील आभासी तुलना यामुळे तरुणांमध्ये तणावाचे प्रमाण वाढले आहे. ‘फोमो'(फिअर ऑफ मिसिंग आऊट), ऑनलाइन प्रतिमा टिकवून ठेवण्याचे दडपण, झोपेच्या समस्या, कमी झालेली एकाग्रता आणि वाढती चिडचिड यांसारख्या समस्या अधिक प्रकर्षाने जाणवत आहेत. आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांमध्ये दीर्घकाळ संगणकासमोर बसून काम केल्याने मानसिक थकवा आणि ‘बर्नआउट’चे प्रमाणही वाढत आहे.
अशा परिस्थितीत योग हा केवळ शारीरिक व्यायाम नसून शरीर, मन आणि श्वास यांचा समतोल साधणारी जीवनपद्धती म्हणून महत्त्वाचा ठरत आहे. नियमित योगासने, प्राणायाम आणि ध्यानामुळे तणाव कमी होण्यास, एकाग्रता वाढण्यास आणि मानसिक स्थैर्य प्राप्त होण्यास मदत होते. तज्ज्ञांच्या मते, दिवसातून केवळ २० ते ३० मिनिटांचा योगाभ्यासही मानसिक आरोग्यासाठी लाभदायक ठरू शकतो.
मानसशास्त्रज्ञ विश्वजीत भालेराव सांगतात, योग म्हणजे केवळ शरीराची हालचाल नसून शरीर आणि मनाला जोडणारी जीवनपद्धती आहे. आजच्या डिजिटल युगात वाढणारा मानसिक ताण आणि अस्वस्थता कमी करण्यासाठी दररोजचा योगाभ्यास आणि ध्यान आवश्यक ठरत आहे. मानसिक आरोग्य जपण्यासाठी योग ही प्रभावी गुरुकिल्ली आहे.
तसेच योद प्रशिक्षक अपेक्षा कुटवड यांच्या मते, ‘तंत्रज्ञानापासून पूर्णपणे दूर जाणे शक्य नसले तरी त्याच्याशी संतुलित नाते राखणे आवश्यक आहे. ‘डिजिटल डिटॉक्स’ आणि नियमित योगाभ्यास यांचा समन्वय साधल्यास मानसिक तणावावर नियंत्रण मिळवणे आणि निरोगी जीवनशैली अंगीकारणे अधिक सोपे होते. योगाला एक दिवसाचा उपक्रम न मानता तो दैनंदिन जीवनाचा भाग बनविण्याची गरज आहे.’
Mental Health Tip : धावपळीच्या आयुष्यात शांतता हवीय? मग ‘हा’ मंत्र वापरुन पहा, मानसिक शांतता मिळेल






