मध्यरात्री रेल्वे रुळांवर मृत्यूचे भयाण दृश्य, तरीही डगमगल्या नाहीत! पॉईंट्समन रूपाली खरे यांचा थक्क करणारा प्रवास
शारदीय नवरात्रोत्सवाच्या सातव्या दिवशी नवभारत-नवराष्ट्रच्या ‘नवदुर्गा’ विशेष पॉडकास्टमध्ये रेल्वेतील आव्हानात्मक काम, आयुष्यात आलेले संकट, मुलांसाठी केलेला संघर्ष आणि कठीण परिस्थितीतही न डगमगण्याची जिद्द याविषयी त्यांनी मनमोकळेपणाने अनुभव सांगितले.
रूपाली खरे यांच्या आयुष्यातील संघर्षाची सुरुवात पतीच्या अचानक झालेल्या निधनानंतर झाली. सुमारे १६ वर्षांपूर्वी पतीचे हृदयविकाराचा झटक्याने निधन झाले अन् या अनपेक्षित घटनेने त्यांच्या आयुष्याला मोठा धक्का बसला. संसाराचा आधार अचानक हरपला आणि तीन लहान मुलांच्या संगोपनाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. त्यावेळी रूपाली यांचे वय अवघे २० ते २२ वर्षे होते. एवढ्या कमी वयात पतीच्या निधनाचे दुःख, मुलांचे भविष्य आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला होता.
मात्र, परिस्थितीसमोर हार न मानता त्यांनी स्वतःला सावरले. रेल्वेकडून अनुकंपा तत्त्वावर नोकरीची संधी मिळाल्यानंतर त्यांनी ती स्वीकारली. मुलांना चांगले शिक्षण द्यायचे, त्यांचे भविष्य घडवायचे आणि कुटुंबाला पुन्हा उभे करायचे, या निर्धाराने त्यांनी रेल्वे सेवेत पाऊल ठेवले.
रूपाली खरे यांच्या रेल्वे नोकरीची सुरुवात मुंबईतील अत्यंत गजबजलेल्या दादर स्थानकातून झाली. दादर हे मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील महत्त्वाचे स्थानक असल्याने येथे दिवसभर प्रवाशांची मोठी वर्दळ असते. सतत धावणाऱ्या लोकल, प्रवाशांची गर्दी, रेल्वेच्या परिचालनाशी संबंधित जबाबदाऱ्या आणि अचानक उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थिती अशा वातावरणात काम करणे आव्हानात्मक असते.
मात्र, रूपाली यांनी सुरुवातीपासूनच आत्मविश्वासाने काम केले. अपघात असो, गाडी थांबण्याची परिस्थिती असो किंवा स्थानकात निर्माण झालेला वाद असो, त्यांनी जबाबदारीपासून कधीही पळ काढला नाही. ‘मी कधीच भीती बाळगून नोकरी केली नाही. कोणतीही परिस्थिती असली तरी पुढे जाऊन काम केले,’ अशा शब्दांत त्यांनी आपल्या कर्तव्यनिष्ठेची भावना व्यक्त केली. दादर स्थानकातील अनुभवांनी त्यांना अधिक खंबीर बनवले. त्यानंतर माटुंगा स्थानक महिलांकडून संचालित ‘पिंक स्टेशन’ म्हणून विकसित झाल्यावर त्यांची तेथे बदली झाली.
रेल्वेतील पॉईंट्समनचे काम केवळ गाड्यांच्या परिचालनाशी संबंधित नसून काही परिस्थितींमध्ये त्यांना अत्यंत कठीण प्रसंगांनाही सामोरे जावे लागते. रेल्वे रुळांवर अपघात झाल्यानंतर निर्माण होणारी परिस्थिती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ करणारी असते. अशा वेळी संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून आवश्यक कामे पार पाडावी लागतात. रूपाली खरे यांनी अशा प्रसंगी मृतदेहाचे अवशेष गोळा करण्यासारखी कठीण जबाबदारीही पार पाडल्याचे सांगितले. मृत्यूचे भयावह दृश्य समोर असतानाही त्यांनी मन घट्ट करून आपले काम केले. अशा प्रसंगांत मानसिक धैर्य, प्रसंगावधान आणि कर्तव्याप्रती निष्ठा किती महत्त्वाची असते, हे त्यांच्या अनुभवातून समोर येते.
रूपाली खरे मूळच्या पुण्याच्या आहेत. रेल्वेतील नोकरीसाठी त्यांना अनेकदा पुणे ते मुंबई असा लांबचा प्रवास करावा लागतो. सकाळी पुण्याहून रेल्वेने मुंबईत पोहोचणे, त्यानंतर सायंकाळपासून दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत ड्युटी करणे आणि पुन्हा पुण्याच्या दिशेने प्रवास करणे, असा त्यांचा दिनक्रम असतो. रेल्वेतील काम शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आव्हानात्मक असताना लांबच्या प्रवासामुळे थकवाही जाणवतो. मात्र, कुटुंबाची जबाबदारी आणि कामाप्रती असलेली निष्ठा यामुळे त्या आपले कर्तव्य पार पाडत आहेत. काही वेळा मुंबईतील मालाड येथे मावशीकडे राहूनही त्या ड्युटी करतात. प्रवास, नोकरी आणि घरातील जबाबदाऱ्या यांचा समतोल साधण्यासाठी त्यांना सतत धडपड करावी लागते.
रूपाली खरे यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. त्यांची मोठी मुलगी उच्च शिक्षण घेत आहे, दुसरी मुलगी बारावीत तर मुलगा दहावीत शिकत आहे. पतीच्या निधनानंतर या तिन्ही मुलांचे संगोपन आणि शिक्षणाची जबाबदारी त्यांनी एकटीने सांभाळली. मुलांच्या भविष्यासाठी केलेल्या संघर्षाची जाणीव त्यांच्या मुलांनाही आहे. रूपाली सांगतात की, मुलांना आपल्या आईचा अभिमान वाटतो. ‘मम्मी, तू आमच्यासाठी खूप कष्ट केलेस. आम्ही मोठे झालो की तुला आराम देऊ,’ असे मुलांचे शब्द ऐकून त्यांना नवी ऊर्जा मिळते. मुलांचे प्रेम, विश्वास आणि त्यांना घडवण्याचे स्वप्न हीच त्यांच्या आयुष्यातील मोठी प्रेरणा ठरली आहे.
रेल्वे सेवेत गेल्या १४ वर्षांत रूपाली खरे यांनी अनेक आव्हानात्मक प्रसंगांना सामोरे जात आपली जबाबदारी पार पाडली आहे. त्यांच्या धाडसी आणि कर्तव्यनिष्ठ कामाची दखल घेत विभागीय रेल्वे व्यवस्थापकांकडून (डीआरएम) त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. रेल्वेतील कामाच्या निमित्ताने अनेक कठीण प्रसंग पाहूनही त्यांनी आपली जिद्द कायम ठेवली. या सन्मानामुळे त्यांच्या कामाची दखल घेतली गेल्याचे अधोरेखित होते.
आपल्या आयुष्यातील संघर्ष सांगताना रूपाली खरे यांनी माणुसकीचे महत्त्वही अधोरेखित केले. ‘माणुसकी ही सर्वांत मोठी गोष्ट आहे. एखाद्याला अडचण आली तर मदतीला धावून जा. तो रेल्वेतला असो किंवा बाहेरचा; पण माणूस म्हणून एकमेकांना साथ देणे महत्त्वाचे आहे,’ असा संदेश त्यांनी दिला. स्वतःच्या आयुष्यात अनेक संकटांचा सामना करूनही इतरांना मदत करण्याची भावना त्यांनी जपली आहे.
शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त नवभारत-नवराष्ट्रच्या ‘नवदुर्गा’ विशेष पॉडकास्टमधून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांच्या प्रेरणादायी कहाण्या प्रेक्षकांसमोर आणल्या जात आहेत. या विशेष उपक्रमात रूपाली खरे यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील संघर्षासोबत रेल्वेतील कामाचे अनुभवही सांगितले. पतीच्या निधनानंतर खचून न जाता तीन मुलांचे संगोपन करणारी आई, कठीण प्रसंगात धैर्याने काम करणारी रेल्वे कर्मचारी आणि माणुसकीचा संदेश देणारी संवेदनशील महिला अशी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची अनेक रूपे या संवादातून समोर आली.
मुंबईची लोकल रेल्वे लाखो प्रवाशांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. मात्र, ही व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पडद्यामागे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे योगदान अनेकदा दुर्लक्षित राहते. रूपाली सिद्धार्थ खरे यांच्यासारख्या महिला या व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत. पतीचे अकाली निधन, तीन मुलांची जबाबदारी, रेल्वेतील आव्हानात्मक ड्युटी आणि पुणे-मुंबईचा थकवणारा प्रवास या सगळ्यांवर मात करत त्यांनी आपली वाटचाल सुरू ठेवली आहे.
एका आईची माया, कुटुंबप्रमुखाची जबाबदारी, रेल्वे कर्मचाऱ्याची कर्तव्यनिष्ठा आणि संकटांसमोर न डगमगणारे धैर्य यांचा संगम म्हणजे रूपाली खरे. त्यांचा संघर्षमय प्रवास अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.






