सत्यभामा देशमाने (फोटो- सोशल मिडिया)
सत्यभामा देशमाने; शंभर मुलांची मायेची सावली!
सत्यभामा देशमाने यांची मातृत्वाची अनोखी कहाणी
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या लेकरांसाठी समर्पित केले आयुष्य
गायत्री पवळे/Navaratri 2026: नवरात्रीत देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. संकटांशी लढण्याचे बळ, मायेची ऊब आणि त्यागाची शिकवण देणाऱ्या या देवीच्या रूपांचे दर्शन काही व्यक्तींच्या आयुष्यातही घडते. परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील मंगरूळ येथील सत्यभामा बाबाराव देशमाने या त्यापैकीच एक. स्वतःच्या मुलाला (Navarashtra Navdurga) कष्टाने शिकवणाऱ्या सत्यभामा यांनी पुढे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना आपले मानले. सुरुवातीला २० मुलांची आई बनलेल्या सत्यभामा आज शंभर मुलांची आजी म्हणून त्यांच्यावर मायेची पाखर घालत आहेत. त्यांचा हा सेवाप्रवास म्हणजे मातृत्व, त्याग आणि माणुसकीचे जिवंत उदाहरण आहे.
सत्यभामा आणि त्यांचे पती बाबाराव हे वारकरी दाम्पत्य. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. आठवड्याचा बाजार अवघ्या दहा रुपयांत करावा लागायचा. चूल पेटवण्यासाठी शेजारच्या घरातून विस्तव आणण्याची वेळही सत्यभामा यांच्यावर आली. बाबाराव शेतीकामासोबत रात्री उशिरापर्यंत कंदिलाच्या प्रकाशात कपडे शिवायचे. मात्र, गरिबीमुळे मुलाच्या शिक्षणात अडथळा येऊ नये, यासाठी दोघांनीही कष्टांची पराकाष्ठा केली. त्यांचा एकुलता एक मुलगा अशोक सॉफ्टवेअर इंजिनिअर झाला आणि पुण्यात नोकरीला लागला.
नशिबाने हिरावली ऐकण्याची क्षमता, पण जिद्दीने दिली नवी ओळख! भरतनाट्यम नृत्यांगनेचा प्रेरणादायी प्रवास
मात्र, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण आणि चांगले संगोपन मिळावे, यासाठी अशोकने वयाच्या २६व्या वर्षी मोठ्या पगाराची नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. बाबा आमटे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्याने ‘स्नेहवन’ हा सामाजिक प्रकल्प सुरू केला. सुरुवातीला मुलाच्या भविष्याची चिंता वाटली; पण अखेर सत्यभामा आणि बाबाराव यांनी त्याच्या स्वप्नाला साथ देण्याचे ठरवले. गावची शेती, घर सोडून ते पुण्यात आले आणि या मुलांचे आजी-आजोबा बनले.
सुरुवातीला सत्यभामा यांनी २० मुलांसाठी एकट्याने स्वयंपाक केला. मुलांच्या आजारपणात रात्रभर जागून त्यांची काळजी घेतली. त्यांच्या खाण्यापिण्यापासून ते भावनिक आधारापर्यंत प्रत्येक गोष्टीत त्या मुलांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. आज त्या स्नेहवनच्या भोजनालयाची जबाबदारी सांभाळतात. बाबाराव मुलांना गायन आणि मृदंग शिकवतात. पक्षाघातातून सावरल्यानंतरही मुलांना चांगले दूध मिळावे, यासाठी ते गोशाळेचे काम पाहतात. अशोक आणि त्यांची पत्नी अर्चना हेही मुलांच्या भविष्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतात.
सत्यभामा यांना इंद्रायणी थडी, राजमाता जिजाऊ, आदर्श मातापिता आणि ज्ञानप्रबोधिनीच्या राधामाता पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. पंढरीची वारी करणाऱ्या या वारकरी दाम्पत्याने मुलांच्या सेवेसाठी स्वतःची वारी थांबवली. मात्र, शंभर मुलांच्या रूपाने त्यांच्या आयुष्यात भक्तीची नवी वाट खुली झाली. स्वतःच्या लेकरापुरते मातृत्व मर्यादित न ठेवता अनेक मुलांना मायेचे छत्र देणाऱ्या सत्यभामा देशमाने यांच्यातच नवदुर्गेच्या ममतेचे आणि त्यागाचे दर्शन घडते.






