संग्रहित फोटो
कारखान्याचे माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे यांना सहकार क्षेत्रातील कामाचा अनुभव आहे. त्यांनी यापूर्वी कारखान्याचे अध्यक्षपद भूषवले असून, दिवंगत अजित पवार यांच्या सूचनेनुसार बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. बारामती तालुका दूध उत्पादक संघातील अनुभव, कारखाना कार्यक्षेत्रातील जनसंपर्क आणि सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची शैली या त्यांच्या जमेच्या बाजू मानल्या जातात. त्यामुळे अध्यक्षपदासाठी त्यांच्या नावाला प्राधान्य मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रमोद काकडे यांचीही चर्चा
जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती प्रमोद काकडे यांचे नावही अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. त्यांना प्रशासकीय कामाचा अनुभव असून, त्यांनी यापूर्वी कारखान्याचे संचालक म्हणूनही काम केले आहे. प्रगतशील बागायतदार असलेल्या काकडे यांचा शेतकरी आणि सभासदांशी थेट संपर्क आहे. त्यामुळे त्यांचा अनुभव आणि स्थानिक पातळीवरील प्रभाव अध्यक्षपदाच्या निवडीत महत्त्वाचा ठरू शकतो.
संग्राम सोरटे यांना संधी मिळणार?
नवनाथ उद्योग समूहाचे प्रमुख संग्राम सोरटे हेही अध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा आहे. विविध सहकारी संस्थांमधील कामाचा अनुभव, उद्योग समूहाच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती, स्वच्छ प्रतिमा आणि मोठा जनसंपर्क ही त्यांची बलस्थाने मानली जातात. ब वर्ग संस्था प्रतिनिधी मतदारसंघातून त्यांनी सलग दोन निवडणुकांत विजय मिळवला आहे.
बारामती तालुक्यात धनगर समाजाची मोठी लोकसंख्या असून, कारखान्याच्या स्थापनेपासून या समाजाला अध्यक्षपदाची संधी मिळाली नसल्याचा मुद्दा चर्चेत आहे. त्यामुळे सोरटे यांना संधी दिल्यास सामाजिक प्रतिनिधित्वाच्या दृष्टीने सकारात्मक संदेश जाऊ शकतो, असे मत व्यक्त केले जात आहे.
सुनेत्रा पवार यांच्या निर्णयाकडे लक्ष
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रचाराच्या शुभारंभाच्या सभेत अध्यक्ष निवडताना सर्वांना विचारात घेतले जाईल, असे सूचक वक्तव्य केले होते. खासदार पार्थ पवार यांनीही कारखान्याच्या कामकाजात लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. आगामी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आणि २०२९ मधील विधानसभा निवडणूक लक्षात घेता, अध्यक्ष निवडताना राजकीय व सामाजिक समीकरणांचा विचार होण्याची शक्यता आहे.
पारंपरिक गटांबाहेरील गावाला संधी मिळणार?
कारखान्याच्या स्थापनेपासून गट क्रमांक १ मधील निंबूत-खंडाळा आणि गट क्रमांक २ मधील मुरूम-वाल्हे या गटांतील व्यक्तींनाच अध्यक्षपदाची संधी मिळाल्याची चर्चा आहे. त्यामुळे यंदा या पारंपरिक गटांबाहेरील गावाला संधी मिळणार का, याबाबत सभासदांमध्ये उत्सुकता आहे.
Ans: श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार विकास पॅनेलचे सर्व २१ उमेदवार विजयी झाले.
Ans: राजवर्धन शिंदे, प्रमोद काकडे आणि संग्राम सोरटे यांची नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत.
Ans: त्यांना सहकार क्षेत्रातील अनुभव असून, त्यांनी यापूर्वी सोमेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्षपद भूषवले आहे.






