जागतिक आदिवासी दिन (फोटो- ai gemini)
पुण्यातील आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय ठरते महत्त्वाचा संदर्भ
आदिवासी संस्कृती आता सोशल मीडियाच्या माध्यमातून शहरांपर्यंत पोहोचतेय
९ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो जागतिक आदिवासी दिन
पुणे/गायत्री पवळे: जंगल, शेती, सण-उत्सव आणि सामुदायिक जीवनाशी जोडलेली आदिवासी संस्कृती आता सोशल मीडियाच्या माध्यमातून शहरांपर्यंत पोहोचत आहे. विशेषतः जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आदिवासी नृत्य, पारंपरिक वाद्ये आणि लोककलांचे व्हिडिओ ‘रील्स’च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर शेअर केले जातात. त्यामुळे पूर्वी विशिष्ट भौगोलिक परिसरापुरती मर्यादित असलेली ही वाद्यपरंपरा नव्या पिढीसमोर डिजिटल माध्यमातून येत आहे. मात्र, या वाद्यांकडे केवळ ‘ट्रेंडिंग कंटेंट’ म्हणून न पाहता त्यामागील सांस्कृतिक संदर्भ समजून घेण्याची गरज आहे.
दरवर्षी ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी १९९४ मध्ये हा दिवस निश्चित केला असून, १९८२ मध्ये जिनिव्हा येथे झालेल्या आदिवासी लोकसंख्येबाबतच्या संयुक्त राष्ट्रांच्या कार्यगटाच्या पहिल्या बैठकीच्या स्मरणार्थ ही तारीख निवडण्यात आली. महाराष्ट्रातील आदिवासी वाद्यपरंपरेचा अभ्यास करण्यासाठी पुणे हे महत्त्वाचे केंद्र आहे.
आदिवासी समाजात निसर्गाला का देव मानलं जातं? जाणून घ्या यामागील सांस्कृतिक आणि पारंपरिक कारणे
आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (टीआयटीआर ) च्या परिसरातील आदिवासी सांस्कृतिक संग्रहालयाची स्थापना १९६५ मध्ये झाली. संग्रहालयात महाराष्ट्रातील आदिवासी जीवन, कला, हस्तकला आणि वाद्यांची माहिती जतन करण्यात आली आहे. येथे सुमारे १,३५९ वस्तू प्रदर्शित असून, त्यामध्ये विविध पारंपरिक वाद्यांचाही समावेश आहे. या संग्रहालयाच्या माहितीनुसार आदिवासी वाद्यांचे वायुवाद्य, तालवाद्य, तंतुवाद्य आणि सहाय्यक तालवाद्य असे वर्गीकरण केले जाते. वारली समाजातील ‘धाक’, कोरकू समाजातील ‘धिमकी’, माडिया गोंड समाजातील ‘मंदारी’, तसेच विविध समुदायांमध्ये वापरला जाणारा ढोल यांचा त्यात समावेश आहे.
यातील तारपा हे विशेष लक्षवेधी वाद्य आहे. वारली समाजाशी संबंधित तारपा वादनावर आधारित नृत्याची परंपरा महाराष्ट्रात आढळते. भारत सरकारच्या आदिवासी कार्य मंत्रालयाच्या ‘आदि कलाकार’ पोर्टलवरही तारपा नृत्याचा संबंध वारली समाजाशी नोंदविण्यात आला आहे. या नृत्याला कापणीच्या काळाशी जोडलेले सांस्कृतिक महत्त्व असल्याचे नमूद आहे.
World Tribal Day 2024: जागतिक आदिवासी दिवस 9 ऑगस्टलाच का साजरा केला जातो? जाणून घ्या रंजक इतिहास
आज तारपाचा आवाज पारंपरिक उत्सवांबरोबरच मोबाईलच्या स्क्रीनवरही ऐकू येतो. काही सेकंदांच्या रीलमधून वाद्याचे सूर, पारंपरिक वेशभूषा आणि समूह नृत्य लाखो प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे डिजिटल माध्यमे ही आदिवासी कलांसाठी नव्या पिढीपर्यंत पोहोचण्याचे प्रभावी साधन ठरू शकतात. मात्र, या प्रक्रियेत वाद्याचा इतिहास, कलाकारांचे योगदान आणि समुदायाचा सांस्कृतिक संदर्भ जपणे तितकेच महत्त्वाचे आहे.तारपा ते रील्स हा केवळ तंत्रज्ञानाचा प्रवास नाही; तो परंपरेला नव्या माध्यमातून मिळालेल्या व्यासपीठाचा प्रवास आहे.






