Today's Maharashtra Breaking News Updates in marathi 12.10.2026
Maharashtra to World Breaking News :
१ ऑक्टोबरपासून व्यावसायिक एलपीजी (LPG) सिलिंडरच्या दरात वाढ झाली असून सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा नवा फटका बसला आहे.भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार राज्यात मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला असून पश्चिम महाराष्ट्र व विदर्भातील काही जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकाच्या पुनर्विकासाच्या कामासाठी १ ऑक्टोबरपासून ७५ दिवसांचा मोठा मेगा ब्लॉक लागू करण्यात आला आहे.आशियाई खेळ २०२६ मधील १२ व्या दिवशी भारतीय कुस्तीपटू आणि नेमबाजांनी आगेकूच केली असली तरी पुरुष व्हॉलीबॉल स्पर्धेत भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे.
अमेरिकन सैन्याने इराकमधील आपल्या सर्व लष्करी तळांवरून पूर्णपणे बाहेर पडत १२ वर्षांच्या मोहिमेची अधिकृत सांगता केली आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे आणि ठाणे शहरात अवजड वाहनांना ठराविक वेळेत प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे
01 Oct 2026 06:05 PM (IST)
IND Vs WI T20 Series: सध्या भारत आणि वेस्ट इंडिजचा संघ वनडे सिरिज खेळण्यात व्यस्त आहे. त्यानंतर हे दोन्ही संघ टी 20 सिरिज देखील खेळणार आहे. मात्र त्याआधी भारतीय संघासाठी एक मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. बीसीसीआय आणि सिलेक्शन कमिटीने वॉशिंग्टन सुंदरला रिलीज केल्याचे समोर येत आहे. त्याच्या जागी नमन धीरला संधी देण्यात आली आहे. नमन धीर आता टी 20 संघातून खेळताना दिसणार आहे.
01 Oct 2026 05:59 PM (IST)
कामशेत आणि परिसरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर वेगाने हालचाली सुरू असून, यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने पर्यायी मार्ग शोधण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. सध्या थर्ड पार्टीच्या माध्यमातून सुमारे ५० लाख लिटर पाणी आणले जात आहे. कुकडी प्रकल्पातील नवीन पाणी उपलब्ध झाल्यास सिन्नरला पाणी सोडता येईल, तसेच कृष्णा-भीमा स्थिरीकरणातून अतिरिक्त पाणी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, पाणीपुरवठ्याच्या अनेक मोठ्या योजना २५ ते ४० टक्के कामे बाकी असताना बंद पडल्याबद्दल विखे पाटलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अधिकारी आणि कंत्राटदारांच्या हलगर्जीपणामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप करत त्यांनी सांगलीच्या १२ किमी पाईपलाईन कामाचे उदाहरण दिले. वन विभागाच्या परवानगीबाबत दिशाभूल करणारी व खोटी माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांना शेवटची संधी देण्यात आल्याचा सज्जड दमही त्यांनी दिला. सद्यस्थितीत टँकर भरण्याचे काम सुरू असून टंचाईवर मार्ग काढला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
01 Oct 2026 05:49 PM (IST)
सावंतवाडी तालुक्यातील कास गावामध्ये शांतपणे स्वच्छंद विहार करणाऱ्या ‘ओंकार’ हत्तीवर चक्क पेटत्या मशाली फेकण्याचा अमानुष प्रकार नुकताच उघडकीस आला. या घटनेमुळे सर्वसामान्य नागरिकांसह वन्यजीव प्रेमींमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली असून संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
या गंभीर प्रकरणाची तत्काळ दखल घेत सावंतवाडी वन विभागाकडून सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. घटनेच्या वेळी त्या ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या ३ वनरक्षक आणि ४ हाकारे अशा एकूण ७ जणांना वन विभागाने कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, याचा अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट आणि कडक इशारा उपवनसंरक्षक सावंतवाडी मिलिश शर्मा यांनी दिला आहे.
01 Oct 2026 05:36 PM (IST)
प्लॉट विक्रीतून मिळालेले नऊ लाख रुपये घेऊन घरी जात असलेल्या दीपक येळाई यांच्यावर अज्ञात दुचाकीस्वार चोरट्यांनी हल्ला करून त्यांच्याकडील नऊ लाख रुपयांची रोकड लंपास केली.ही घटना गुरुवारी दिवसाढवळ्या पाथर्डी शहरातील पेठ परिसरात नवरंग कापड दुकानासमोर घडली. या झटापटीत येळाई जखमी झाले आहेत.
दीपक येळाई हे प्लॉट विक्रीतून मिळालेले नऊ लाख रुपये घेऊन घरी जात होते.ते पेठेतील नवरंग कापड दुकानासमोर आले असता पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी झालेल्या झटापटीत येळाई यांना दुखापत झाली. चोरट्यांनी त्यांच्या ताब्यातील नऊ लाख रुपयांची रोकड हिसकावून दुचाकीवरून पोबारा केला.
01 Oct 2026 05:29 PM (IST)
कर्जत तालुक्यातील चिल्लार नदीवर बांधण्यात येत असलेल्या शिलार धरणाला या मतदारसंघाचा माझा 100 टक्के विरोध आहे असे आमदार महेंद्र थोरवे यांनी जाहीर आश्वासन शिलार धरण जनआंदोलन समितीला आश्वासन दिले. शिलार जनआंदोलन समितीचे वतीने कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांना निवेदन देण्यात आले.
नवी मुंबई मधील सिडको क्षेत्राला पाणी मिळावे म्हणून कर्जत तालुक्यातील चिलार नदीवर पाच ग्रामपंचायत हद्दीत धरण बांधणार आहे.या धरणाच्या विरोधात स्थानिक सर्व ग्रामस्थ आणि शेतकरी यांचा विरोध आहे.या विरोधाला कर्जत तालुक्यातील सर्व राजकीय पक्ष यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रस्तावित प्रकल्पाच्या ठिकाणावरून शेतकरी कर्जत शहरात धडकले. कर्जत येथे आमदार महेंद्र थोरवे,माजी आमदार सुरेश लाड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस,मनसे आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते यांची भेट घेऊन या सर्व राजकीय पक्षाची पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला.आमदार महेंद्र थोरवे यांनी शिवसेना पक्षाचे वतीने तर भाजप कडून माजी आमदार सुरेश लाड,शिवसेना ठाकरे पक्षाचे वतीने उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत, राष्ट्रवादी कडून कर्जत पंचायत समिती सभापती नमिता घारे यांनी ही निवेदने स्वीकारली.यावेळी शिलार आंदोलनाचे प्रमुख दिनेश रसाळ,योगेश सावंत,अक्षय तितकारे, संतोष कदम, काशीनाथ रसाळ,ॲड अहिर, काशीनाथ निरगुडे,यशवंत निरगडे,दिलीप रसाळ, मनोज भोईर,महादू शेंडे,गणेश भगत,हरेश अहिर,राम कातवरा,वसंत केवारी,संभाजी कदम आदी शेतकऱ्यांनी निवेदने दिली.
01 Oct 2026 05:08 PM (IST)
कर्जत आणि जामखेड हे तालुके उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात येत असले, तरी आपल्या हक्काचे वळण योजनेतील पाणी मराठवाड्याकडे वळवले जात आहे. कुकडी खोऱ्यातील हे पाणी खालून मराठवाड्याला जाणे योग्य नाही. कृष्णा खोऱ्यातील अतिरिक्त पाणी मराठवाड्याला देताना या भागाच्या हक्काच्या पाण्यावर गदा येऊ नये, यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरु असल्याची माहिती विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी दिली.
जामखेड येथे आयोजित आढावा व नियोजन बैठकीत ते बोलत होते. दुष्काळसदृश परिस्थिती, चारा आणि पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि सभापती राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. ५.५ TMC पाणी मिळाल्याशिवाय जामखेड तालुका पूर्णपणे ओलिताखाली येऊ शकत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांच्याशी या विषयावर चर्चा झाली असून, अवर्षणप्रवण तालुक्यांच्या या पाण्याचा आणि बोंद्याचा प्रश्न मुख्यमंत्री-पालकमंत्र्यांची भेट घेऊन लवकरच निकालात काढू असंही राम शिंदेंनी म्हटलंय..
01 Oct 2026 04:57 PM (IST)
ठाण्याच्या मानपाडा परिसरात ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या घटनेनंतर बुधवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पूर्णेकर यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांनी पूर्णेकरांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यामुळे भावुक वातावरण निर्माण झाले. यावेळी त्यांनी कुटुंबीयांना धीर देत भावनिक होऊन कोणताही निर्णय घेऊ नका, असा सल्ला दिला.
01 Oct 2026 04:47 PM (IST)
भारतीय पुरुष हॉकी संघाने पाकिस्तानला रोमहर्षक सेमिफायनलमध्ये धुळ चारत एशियन गेम्स 2026 (Asian Games 2026 ) च्या फायनलमध्ये जागा मिळवली. भारताने पाकिस्तानला 4-3 ने घरचा रस्ता दाखवला. अशाप्रकारे, गतविजेत्या भारताने आपले आणखीन एक पदक निश्चित केले आहे. पाकिस्तानविरुद्ध खेळवण्यात आलेला हा सेमिफायनल सामना रोमहर्षक राहिला आणि सामन्यात अधिक वेळ भारतीय संघाने आपला दबदबा बनवला होता. सामन्याच्या अखेरीस पाकिस्तानने जोरदार पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण अखेरच्या मिनिटांत अभिषेकच्या गोलने पाकिस्तानला घरचा रस्ता दाखवला.
01 Oct 2026 04:42 PM (IST)
अनैतिक संबंधाच्या संशयातून ३८ वर्षीय तरुणाला दोघांनी फरशी आणि दगडाने बेदम मारहाण करून ठार केल्याची धक्कादायक घटना उमरगा तालुक्यातील चिंचोली भुयार शिवारात घडली. तानाजी शिवाजी गायकवाड असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मुरुम पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाचा सविस्तर...
01 Oct 2026 04:31 PM (IST)
विमानातील अचानक निर्माण झालेली गंभीर परिस्थिती आणि शेकडो निरपराध लोकांच्या जीवावर बेतलेले संकट… अशा अत्यंत थरारक आणि भयानक क्षणी मुंबईच्या एका भारतीय वैमानिकाने दाखवलेले अतुलनीय धैर्य आज जगभरात कौतुकाचा विषय ठरले आहे. फ्लायदुबई (flydubai) विमानात घडलेल्या भीषण प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून शेकडो प्रवाशांना सुरक्षित ठेवणारे भारतीय पायलट कॅप्टन स्मित मच्छर यांची इस्रायलने अत्यंत गौरवपूर्ण शब्दांत प्रशंसा केली आहे. मध्य-पश्चिम भारतातील इस्रायलचे (Israel) महावाणिज्य दूत याविन रेवाच यांनी कॅप्टन स्मित (Captain Smit Machchhar) यांना ‘खरे सुपरहिरो’ आणि भारत-इस्रायल यांच्यातील अढळ मैत्रीचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून गौरव न्याय दिला आहे.
01 Oct 2026 04:17 PM (IST)
शिवसेना (ठाकरे गट) विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्येचा तपास पुढे सरकत असतानाच पोलिसांच्या हाती नवे धागेदोरे लागत आहेत. मिरा रोड परिसरातून तीन महिलांसह एकूण पाच जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या तिन्ही महिलांचा मुख्य संशयित पप्या शिंदे याच्याशी संपर्क असल्याचा संशय असून, हत्येच्या कटात त्यांची काही भूमिका होती का, याचा तपास सुरू आहे. वाचा सविस्तर...
01 Oct 2026 04:07 PM (IST)
केज तालुक्यातील विलास घुले हत्या प्रकरणाला (Vilas Ghule Murder Case) आता नवं वळण मिळालं आहे. खासदार बजरंग सोनवणे यांनी पत्रकार परिषद घेत वाल्मीक कराड आणि सुग्रीव कराड यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आपल्या मुलाला म्हणजेच सौरभ सोनवणे याला या प्रकरणात अडकवण्यासाठी कट रचण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. या आरोपांच्या समर्थनार्थ सोनवणे यांनी ऑडिओ क्लिपही पत्रकारांना ऐकवली. वाचा सविस्तर...
01 Oct 2026 03:59 PM (IST)
Rohit Sharma Century Celebration Viral: काल गुवाहाटी येथे भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा वनडे सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने दणदणीत विजय प्राप्त केला आहे.या सामन्यात अनेक मोठे रेकॉर्डस झाल्याचे पाहायला मिळाले. वेस्ट इंडिजने दिलेले 406 रन्सचे टार्गेट भारताने सहज पूर्ण केले. तर रोहित शर्माने देखील शानदार शतक ठोकले. शतक झाल्यावर त्याने केलेले सेलिब्रेशन व्हायरल झाले आहे.
01 Oct 2026 03:55 PM (IST)
Chess/Pune: उझबेकिस्तानमधील समरकंद येथे नुकत्याच पार पडलेल्या ४६व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारतीय बुद्धिबळपटूंनी दमदार कामगिरी करत सलग तिसऱ्यांदा गॅपरिंदाश्विली करंडकावर आपले नाव कोरले. खुल्या गटात भारताने (Sports) रौप्यपदक, तर महिला गटात कांस्यपदक पटकावत सर्वसाधारण सांघिक विजेतेपदाची हॅटट्रिक साधली. चेन्नई येथे २०२२ आणि बुडापेस्ट येथे २०२४ मध्ये झालेल्या ऑलिम्पियाडनंतर भारतीय संघाने सलग तिसऱ्यांदा गॅपरिंदाश्विली करंडक पटकावला आहे.
01 Oct 2026 03:50 PM (IST)
मानवी इतिहास साक्षी आहे की, मानवाने ज्या ज्या ठिकाणी पाऊल ठेवले, तिथे आपल्या वर्चस्वाचा संघर्ष सुरू झाला. पूर्वी केवळ जमीन, जल आणि आकाशापुरता मर्यादित असलेला लष्करी संघर्ष आता थेट अवकाशात (Space War) पोहोचला आहे. एकेकाळी अंतराळाकडे केवळ वैज्ञानिक संशोधन, खगोलशास्त्र आणि उपग्रह प्रक्षेपणाचे केंद्र म्हणून पाहिले जात होते. मात्र, बदलत्या जागतिक परिस्थितीनुसार आज अंतराळ हे प्रत्येक प्रमुख राष्ट्राच्या सैनिकी आणि धोरणात्मक सामर्थ्याचा एक अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा भाग बनले आहे. याच धोरणाचा भाग म्हणून ब्रिटनने सप्टेंबर २०२६ मध्ये ‘नंबर ३ स्पेस EFFECT स्क्वॉड्रन’ (No. 3 Space Effects Squadron) या आपल्या पहिल्यावहिल्या विशेष अंतराळ युनिटची अधिकृत स्थापना केली आहे. अंतराळातील शत्रू राष्ट्रांच्या संशयास्पद हालचालींवर बारीक लक्ष ठेवणे, त्यांची ताकद रोखणे आणि त्यांच्या कार्यप्रणालीत व्यत्यय आणणे, ही जबाबदारी या स्क्वॉड्रनकडे सोपवण्यात आली आहे.
01 Oct 2026 03:45 PM (IST)
Difference between Internship vs Apprenticeship: शिक्षण पूर्ण केल्यानंतर तरुणांसमोर सर्वात मोठा प्रश्न असतो की आता पुढे काय करावे? पुस्तकी ज्ञानाबाहेर पडून व्यावसायिक जगतात पाऊल ठेवण्यासाठी प्रॅक्टिकल अनुभवाची गरज असते. हा अनुभव मिळवण्यासाठी इंटर्नशिप आणि अप्रेंटिसशिप हे दोन उत्तम रस्ते आहेत. बऱ्याचदा लोकांना हे दोन्ही पर्याय सारखेच वाटतात, पण प्रत्यक्षात त्यांचे उद्देश, काम करण्याची पद्धत आणि मिळणारे फायदे पूर्णपणे वेगळे असतात. आज आपण अप्रेंटिसशिप आणि इंटर्नशिपमध्ये नेमका काय फरक आहे? हे जाणून घेणार आहोत.
01 Oct 2026 03:40 PM (IST)
छत्रपती संभाजीनगर : पैठण येथील न्यायालयीन कामकाज आटोपून छत्रपती संभाजीनगरकडे परतणाऱ्या मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांच्या वाहनावर हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे. यावेळी वाहन चालकाला कड्याने मारहाण करण्यात आली. तर वाहनावर हातोड्याने हल्ला करुन वाहनाच्या दरवाज्याचे नुकसान करण्यात आले आहे. ही घटना २९ सप्टेंबर रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास विट्स हॉटेल चौकात घडली आहे. या प्रकरणात मारहाण करुन कारचे नुकसान करणाऱ्या दोघां अज्ञातांविरोधात वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
01 Oct 2026 03:35 PM (IST)
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर यांच्या वतीने नुकतेच विक्रोळी येथे जिल्हास्तरीय आंतरशालेय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. १९ वर्षांखालील मुले व मुली या गटांमध्ये कुर्ला, अंधेरी व बोरिवली या तालुक्यांतील प्रत्येकी प्रथम दोन क्रमांकाचे संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेत संदेश कनिष्ठ महाविद्यालयाने दुहेरी यश मिळवले आहे.
01 Oct 2026 03:30 PM (IST)
पुणे : राज्यातील सरकारी आणि अनुदानित शाळांनंतर आता खासगी विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळांमधील शिक्षकांच्या टीईटी पात्रतेचीही तपासणी केली जाणार आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार (RTE) इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. त्यामुळे खासगी शाळांमधील शिक्षकांची टीईटी पात्रतेची माहिती संकलित करण्याची प्रक्रिया शिक्षण विभागाकडून सुरू केली जाणार आहे.
01 Oct 2026 03:25 PM (IST)
Sanjay Raut: ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्येने खळबळ उडाली आहे. मानपाडा परिसरातील त्यांच्या कार्यालयात त्यांच्यावर गोळीबार आणि धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या प्रकरणी कापूरबावडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी पूर्णेकर यांचा जुना सहकारी पप्या शिंदे याला अटक केली असून अन्य संशयितांचा शोध सुरू आहे.
01 Oct 2026 03:20 PM (IST)
जागतिक स्तरावर सर्वात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या ‘नोबेल शांतता पुरस्कारा’ची (Nobel Peace Prize) घोषणा ९ ऑक्टोबर रोजी होणार असून, संपूर्ण जगाचे लक्ष या निर्णयाकडे लागले आहे. यंदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इस्रायल, कंबोडिया आणि पाकिस्तानसारख्या देशांनी अधिकृतपणे नामांकित केले असले, तरी त्यांना हा पुरस्कार मिळण्याची शक्यता अत्यंत धूसर आहे. जागतिक घडामोडी आणि नामांकित विश्लेषकांच्या मते, ट्रम्प यांच्या काही आंतरराष्ट्रीय धोरणांमुळे नोबेल समिती त्यांच्या नावाला पसंती देण्याच्या मनस्थितीत नाही.
01 Oct 2026 03:11 PM (IST)
Wardha News : शालार्थ आयडी प्रकरणामुळे राज्यातील शिक्षण विभाग आधीच चर्चेत असताना आता वर्धा जिल्ह्यातही या प्रकरणाची धग पोहोचली आहे. जिल्ह्यातील तब्बल १३ शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांची चौकशी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
01 Oct 2026 02:59 PM (IST)
राज्यात यंदा अपुऱ्या पावसामुळे गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी अनेक भागांत पिकांना मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेती कर्जवसुलीला स्थगिती देण्याचा शासन निर्णय जारी केला आहे. यासोबत पीक कर्जाचे पुनर्गठन करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. सरकारच्या निर्णयानुसार बँकांना पीक कर्जाच्या पुनर्गठनासंदर्भातील प्रक्रिया 30 एप्रिल 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दुष्काळाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना पुढील खरीप हंगामात आर्थिक अडचण येऊ नये, यासाठी त्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्याबाबतही बँकांना सूचना करण्यात आल्या आहेत.
01 Oct 2026 02:50 PM (IST)
सध्या जपानमध्ये सुरू असलेल्या एशियन गेम्समध्ये भारताने शानदार कामगिरी करून दाखवली आहे. अनेक क्रीडा प्रकारांत भारताने पदके जिंकली आहेत. दरम्यान प्रिथिका प्रदीपने भारताच्या आणि महाराष्ट्राच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे. प्रिथिका प्रदीप हिने तिरंदाजीमध्ये गोल्ड मेडल जिंकले आहे. पिंपरी-चिंचवड शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
भारतीय महिला कंपाऊंड तीरंदाजी संघातून खेळताना प्रिथिकाने आपल्या अचूक निशाणा साधत देशाला गोल्ड मेडल जिंकून दिले आहे. या दैदिप्यमान यशामुळे पिंपरी-चिंचवड शहरासह संपूर्ण महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे. जपानमधील आयची-नागोया येथे पार पडलेल्या या स्पर्धेतील महिला कंपाऊंड तीरंदाजीच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने सुरुवातीपासूनच उत्कृष्ट वर्चस्व राखल्याचे पाहायला मिळाले.
01 Oct 2026 02:40 PM (IST)
‘माझ्या पत्नीशी का बोलतोस?’ असा संशय घेत १७ वर्षीय मुलाला पळवून नेऊन मारहाण केल्याची धक्कादायक घटना पुण्यात समोर आली आहे. बंडगार्डन बंधाऱ्याजवळील बर्निंग घाट परिसरात मुलाला मारहाण केल्यानंतर त्याचा पाठलाग करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर दोन दिवसांनी चंदननगर परिसरातील नदीपात्रात त्याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मुलगा पळताना नदीत पडला की त्याच्यासोबत घातपात झाला, याचा तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत.
01 Oct 2026 02:30 PM (IST)
नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) ने नीट पीजी परीक्षेचे निकाल जाहीर केल्यानंतर आता वैयक्तिक स्कोरकार्ड देखील जारी केले आहेत. परीक्षेत सहभागी झालेले उमेदवार natboard.edu.in या अधिकृत वेबसाइटवरून ते डाउनलोड करू शकतात. नीट पीजी स्कोरकार्ड हे वैद्यकीय समुपदेशन प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचे कागदपत्र मानले जाते, याशिवाय तुम्ही कोणत्याही वैद्यकीय महाविद्यालयात समुपदेशनासाठी पुढे जाऊ शकत नाही.
01 Oct 2026 02:00 PM (IST)
जिल्ह्यात शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणात तब्बल ५५ विद्यार्थी शाळाबाह्य असल्याची माहिती जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाकडून देण्यात आली. शिक्षणापासून वंचित राहिलेल्या या विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत दाखल करून घेण्यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न करण्यात आले आहेत. संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क साधून शाळेत प्रवेश देण्याची प्रक्रिया राबवण्यात आली.
01 Oct 2026 01:55 PM (IST)
आगामी मराठी चित्रपट ‘अफरातफरी’मधील ‘होऊन जाऊ दे’ हे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ग्लॅमरस अंदाज, रंगीबेरंगी रोषणाई, मस्तीचा मूड आणि ठेका धरायला लावणारं संगीत यामुळे हे गाणं लक्ष वेधून घेत आहे. ‘केरळा स्टोरी’ फेम अभिनेत्री प्रणाली घोगरे हिचा आकर्षक अंदाजही या गाण्यात पाहायला मिळत आहे.
01 Oct 2026 01:50 PM (IST)
आगामी मराठी चित्रपट ‘अफरातफरी’मधील ‘होऊन जाऊ दे’ हे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ग्लॅमरस अंदाज, रंगीबेरंगी रोषणाई, मस्तीचा मूड आणि ठेका धरायला लावणारं संगीत यामुळे हे गाणं लक्ष वेधून घेत आहे. ‘केरळा स्टोरी’ फेम अभिनेत्री प्रणाली घोगरे हिचा आकर्षक अंदाजही या गाण्यात पाहायला मिळत आहे.
01 Oct 2026 01:45 PM (IST)
अमेरिका आणि इराण यांच्यातील लष्करी तणाव आणि राजकीय वाद दिवसेंदिवस अधिकच बिकट आणि गंभीर वळण घेत आहे. मध्यपूर्वेतील अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून (Strait of Hormuz) दोन्ही देशांमधील शाब्दिक युद्ध आणि युद्धाच्या धमक्या आता पराकोटीला पोहोचल्या आहेत. याच काळात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक अत्यंत आक्रमक आणि खळबळजनक विधान करत दावा केला आहे की इराण लवकरच आपला पराभव स्वीकारेल आणि अमेरिकेसमोर शरणागती पत्करेल.
01 Oct 2026 01:40 PM (IST)
तुम्ही फॅन्स मोमेंट्स तर आतापर्यंत बऱ्याचदा पाहिले असतील. आपल्या हिरोला पाहून कधी कुणी त्याचे हात धरतो तर कुणी भावनिक होतो. अलिकडे मात्र एका फॅनगर्लने हद्दच पार केली. सोशल मिडियावर नेहमीच चर्चेत असलेले तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांना भेटण्यासाठी तिने जिद्द पकडली. आम्ही सांगतो की, विजय ज्यांना थलापती या नावानेही ओळखले जाते, हे पूर्वीपासून तामिळनाडूतील एक लोकप्रिय अभिनेता आहेत आणि अलिकडेच मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची ही फॅन फाॅलोविंग आणखीनच वाढली आहे.
01 Oct 2026 01:35 PM (IST)
जपानमध्ये सुरू असलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष क्रिकेट संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात दमदार कामगिरी करत भारताने सुवर्णपदकाच्या लढतीचे तिकीट निश्चित केले. आता अंतिम सामन्यात भारताचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार असल्याने क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
01 Oct 2026 01:30 PM (IST)
आकाशात हजारो फूट उंचावर असताना विमानात घडलेल्या एका अत्यंत थरारक आणि प्राणघेण्या घटनेने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. फ्लायदुबईच्या FZ1073 या (Dubai) विमानामध्ये उड्डाणादरम्यान अचानक भीषण आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली. विमानाचे नियंत्रण सांभाळणारे मुख्य भारतीय pilot कॅप्टन स्मित माछार (Capt.Smit Machchhar) यांच्यावर त्यांच्याच ओमानच्या सह-वैमानिकाने चाकूने अचानक हल्ला केला. विमानाचा ताबा मिळवून ते पाडण्याचा कथित प्रयत्न या सह-वैमानिकाकडून केला जात होता.
01 Oct 2026 01:25 PM (IST)
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सार्वजनिक क्षेत्रातील (सरकारी) बँकांमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. यापुढे सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँकांना शनिवारी साप्ताहिक सुट्टी (Saturday Off) जाहीर करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना जारी केली असून हा निर्णय तत्काळ प्रभावाने लागू करण्याचे निर्देश दिले आहेत.
01 Oct 2026 01:18 PM (IST)
फिनटेक कंपनी Moneyview ने आज शेअर बाजारात जोरदार एंट्री केली. ज्या लोकांनी या IPO मध्ये पैसे लावले होते त्यांंना जणूकाही लॉटरीच लागली आहे. पहिल्याच दिवशी त्यांना 60 टक्क्यांपेक्षा जास्त नफा मिळाला असल्याने आज BSE वर Moneyview चा शेअर 55.61 रुपयांवर लिस्ट झाला आणि NSE वर 55 रुपयांवर लिस्ट झाला. कंपनीने IPO मध्ये शेअर 34 रुपयांना दिला होता. म्हणजे लिस्ट होताच 63% नफा झाला. लिस्ट झाल्यावर पण शेअर थांबला नाही. तो BSE वर 56.58 रुपयांपर्यंत गेला. त्याचा अर्थ आता गुंतवणूकदार 66% नफ्यात आहेत.
01 Oct 2026 01:10 PM (IST)
मुंबईतील अँटॉप हिल परिसरात एका ७० वर्षीय महिलेची मंत्रजपाच्या बहाण्याने फसवणूक करून सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुलसुमबी काझी या दूध घेऊन घरी परतत असताना एका अनोळखी तरुणीने त्यांचा पाठलाग केला. त्यानंतर घरात शिरून बहिणीच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी आल्याचे सांगत तिने महिलेचा विश्वास संपादन केला.
01 Oct 2026 01:02 PM (IST)
तरूणीसोबत विवाहबाह्य संबंध प्रस्थापित करुन तिला शारिरीक व मानसिक त्रास देत आत्महत्या करण्यास भाग पाडल्याची घटना घडली. याप्रकरणी तरुणाला चतुःशृंगी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना २६ सप्टेंबरला वडारवाडी येथील जय मित्रमंडळाजवळील इमारतीत घडली आहे. याप्रकरणी मुकेश नागेश विटकर (रा. वडारवाडी, गोखलेनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. ज्योती मुकेश विटकर (वय २६ असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.
01 Oct 2026 12:48 PM (IST)
शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून जेष्ठ नागरिकाची १५ लाखांची फसवणूक झाली आहे. ही घटना २८ नोव्हेंबर ते २२ डिसेंबर २०२५ कालावधीत आंबेगाव बुद्रुकमध्ये घडली आहे. याप्रकर अनोळखी मोबाइलधारक, ट्रेडिंग अॅप व लिंक वापरणारे तसेच विविध बँक खातेदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. उमेश जनार्दन चव्हाण (वय ६४, रा. अॅस्टोनिया रॉयल, आंबेगाव बुद्रुक ) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार चव्हाण हे आंबेगाव बुद्रुक मध्ये राहायला असून, २८ नोव्हेंबर २०२५ रोजी सायबर चोरट्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर विविध कारणे सांगून चव्हाण यांना वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे पाठवण्यास सांगण्यात आले. ट्रेडिंग अॅप व लिंकचा वापर करून त्यांच्याकडून १५ लाख रुपये वर्ग करुन घेतले. अपेक्षित परतावा न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी आंबेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिस निरीक्षक चांगदेव सजगणे तपास करत आहेत.
01 Oct 2026 12:36 PM (IST)
घरफोडी आणि दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करताना भक्ती-शक्ती चौकात संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या दोघांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्या बॅगेत घरफोडीसाठी वापरण्यात येणारे साहित्य आढळून आले. दोन घरफोड्या आणि चार दुचाकी चोरी अशा सहा गुन्ह्यांचा चौकशीतून उलगडा झाला. पोलिसांनी त्यांच्याकडून तीन लाख २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. विकास ऊर्फ जंगल्या मिलिंद कांबळे (वय ३५, रा. पिंपरी) आणि गौतम धर्मलिंगम नाडार (वय २८, रा. राजगुरुनगर, ता. खेड, जि. पुणे) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांना काळेवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
01 Oct 2026 12:24 PM (IST)
राजीव गांधी इन्फोटेक पार्कमध्ये दररोज ये-जा करणाऱ्या सुमारे पाच लाख कर्मचाऱ्यांची जीवघेण्या वाहतूक कोंडीतून सुटका करणाऱ्या हिंजवडी मेट्रो प्रकल्पाची प्रतीक्षा अजूनही संपलेली नाही. बहुतांश कामे आणि तांत्रिक चाचण्या पूर्णत्वाकडे असतानाही, केवळ औपचारिक लोकार्पण आणि प्रशासकीय कारणांमुळे मेट्रो सेवेचा शुभारंभ लांबणीवर पडल्याने दररोज तासनतास प्रवासात अडकणाऱ्या आयटी अभियंत्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. निवडणूक आचारसंहिता किंवा पितृपक्षासारखी कारणे पुढे करून सार्वजनिक वाहतुकीची अत्यावश्यक सुविधा रोखून धरणे अयोग्य असल्याचे मत कर्मचारी व्यक्त करत आहेत. “शासकीय करवसुली कोणत्याही कारणाने थांबत नाही; मग नागरिकांच्या सोयीसाठी उभा राहिलेला प्रकल्प सुरू करण्यास विलंबाचे कारण काय?” असा सवाल आयटीयन्स उपस्थित करत आहेत. हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेचे काम मार्गी लागल्याने परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची आशा होती. मात्र, केवळ औपचारिक उद्घाटन सोहळ्याच्या प्रतीक्षेत हा मार्ग रखडला असल्याची भावना निर्माण झाली आहे. सध्या रस्त्यांवरील खड्डे, अरुंद रस्ते आणि वाहतूक कोंडीमुळे कर्मचाऱ्यांचे दररोज २ ते ३ तास केवळ प्रवासात खर्ची पडत आहेत. यामुळे इंधनाचा अपव्यय आणि प्रदूषण तर वाढतच आहे, शिवाय कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावरही त्याचा गंभीर परिणाम होत आहे. अशा स्थितीत मेट्रो सेवा तातडीने सुरू करणे गरजेचे असल्याचा सूर उमटत आहे.
01 Oct 2026 12:12 PM (IST)
ग्रामीण भागातील शेतीपंपांना वीजपुरवठा करणाऱ्या महावितरणच्या डीपी (रोहित्र) फोडून तांब्याच्या तारा चोरणाऱ्या टोळीच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने मुसक्या आवळल्या. टोळीतील तिघांना ताब्यात घेऊन २४२ किलो तांब्याच्या तारांसह इर्टिगा कार असा १० लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कामगिरीमुळे चार गुन्ह्यांची उकल झाली. मोहम्मद तय्यब मोहम्मद शफी शहा (२८, सध्या रा. चिखली, मूळ रा. उत्तर प्रदेश), मैनुद्दीन खलील शहा (३५, सध्या रा. कुदळवाडी, चिखली, मूळ रा. उत्तर प्रदेश) आणि सुफियान जमीरुल्ला खान (वय १९, मूळ रा. उत्तर प्रदेश) अशी आरोपींची नावे आहेत.
01 Oct 2026 11:55 AM (IST)
मुंबईतील मालाड येथील एका डे केअरमधून पोलिसांनी ४ वर्षांपासून तिथे दडवून ठेवलेल्या मृतदेहाचा खुलासा केला. बुधवारी कुटुंबियांच्या उपस्थितीत यावर अंतिम संस्कार करण्यात आले पण आता प्रश्न असा पडतो की, या रहस्यमयी केसची पार्श्वभूमी काय? हा मृतदेह तिथे कुठुन आला आणि ४ वर्षे तिथे तो कुणी लपवून ठेवला? चला या प्रकरणाची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
01 Oct 2026 11:35 AM (IST)
बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे (SBI) डिजिटल मार्केटिंग आणि संप्रेषण विभागांतर्गत कंत्राटी तत्त्वावर विविध उच्च पदांसाठी पात्र भारतीय नागरिकांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरती मोहिमेद्वारे ‘डिप्टी व्हाईस प्रेसिडेंट’ (अॅनालिटिकल मार्केटिंग अँड कॅम्पेन), ‘डिप्टी व्हाईस प्रेसिडेंट’ (डिजिटल मार्केटिंग) आणि ‘कंटेंट स्पेशालिस्ट’ या पदांची भरती केली जाणार असून एकूण ३ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची आणि शुल्क भरण्याची प्रक्रिया ३० सप्टेंबर २०२६ पासून सुरू झाली असून, २१ ऑक्टोबर २०२६ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
01 Oct 2026 11:20 AM (IST)
उलट्यांचा त्रास होत असल्याने उपचारासाठी क्लिनिकमध्ये नेलेल्या अवघ्या आठ वर्षांच्या चिमुकलीचा उपचारानंतर काही वेळातच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना वसई पूर्वेतील भोयदापाडा परिसरात घडली. कथित बोगस डॉक्टरने दिलेल्या गोळ्या आणि दोन इंजेक्शन्सनंतर मुलीच्या नाकातून व तोंडातून रक्तस्राव सुरू झाला आणि त्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी महापालिकेच्या आरोग्य विभागाने कारवाई करत वालीव पोलिस ठाण्यात संबंधित डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
01 Oct 2026 11:10 AM (IST)
गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव नरम पडत होते, पण आज, १ ऑक्टोबर रोजी, त्यात ₹८३३ ने वाढ झाली. सकाळी ९ वाजता, एमसीएक्सवर सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ₹१४६,९५० होता. एमसीएक्सवर चांदीचा भाव ₹१,८३७ ने वाढून ₹२२५,५४३ झाला. आंतरराष्ट्रीय बाजारातही दोन्ही धातूंच्या किमती वाढल्या आहेत. कॉमेक्सवर सोन्याचा भाव ०.२९ टक्क्यांनी वाढून $४,१९९ प्रति औंस झाला आहे, तर चांदीचा भाव १.३९ टक्क्यांनी वाढून $६१ प्रति औंस झाला आहे.
01 Oct 2026 11:03 AM (IST)
नीट यूजी (NEET UG) परीक्षेच्या पद्धतीमध्ये मोठा बदल करण्याची तयारी शिक्षण मंत्रालयाकडून सुरू आहे. आतापर्यंत ही परीक्षा पेन आणि पेपर माध्यमातून घेतली जात होती, परंतु भविष्यात ती संगणक आधारित पद्धतीने घेण्याच्या विचाराधीन आहे. देशभरात ऑनलाइन परीक्षेसाठी आवश्यक तांत्रिक पायाभूत सुविधा आणि केंद्रे तयार करण्याच्या धोरणावर काम केले जात आहे.
01 Oct 2026 10:50 AM (IST)
जागतिक हवामान बदलामुळे उद्भवलेली परिस्थिती, तसेच यंदा ‘एल-नीनो’ आणि ‘आयओडी’बाबत वर्तवण्यात आलेल्या अंदाज तसेच कमी पावसामुळे नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणातील पाणीसाठ्यात प्रचंड घट झाली आहे. सध्या मोरबे धरणात केवळ ७३.९० टक्के इतकाच वापरायोग्य पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. भविष्यात उद्भवू शकणारी संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने नागरिकांना पाणी जपून आणि काटकसरीने वापरण्याचे आवाहन केले आहे. शहराची दैनंदिन पाण्याची गरज लक्षात घेता, महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांसाठी काही महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा इशाराही दिला आहे.
01 Oct 2026 10:40 AM (IST)
चित्रपटसृष्टीत दरवर्षी अनेक चित्रपट प्रदर्शित होतात. काही चित्रपट मोठ्या बजेटचे असूनही बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कामगिरी करू शकत नाहीत, तर काही कमी बजेटमध्येही प्रेक्षकांची मनं जिंकत दमदार कमाई करतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘हनुमान अंश’ हा चित्रपट. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत मोठ्या बजेटच्या चित्रपटांनाही मागे टाकल्याचं पाहायला मिळालं.
01 Oct 2026 10:40 AM (IST)
दुबईहून इस्रायलला जाणाऱ्या विमानातील 180 प्रवाशांसाठी बुधवारचा (दि.30) दिवस एक भयानक अनुभव ठरला. हजारो फूट उंचीवर, जेव्हा सह-वैमानिकाने अचानक मुख्य वैमानिक भारतीय वंशाचे कॅप्टन स्मित मच्छर यांच्यावर चाकूने हल्ला केला, तेव्हा एकच गोंधळ उडाला. दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानातील बुधवारी घडलेल्या घटनेनंतर भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांचे नाव चर्चेत आले आहे.
01 Oct 2026 10:30 AM (IST)
देशातील विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याविषयीची चिंता सतत वाढत आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो (NCRB) च्या अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, गेल्या एका दशकात विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. २०२४ मध्ये देशभरात एकूण १४,४८८ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, जी २०१४ च्या तुलनेत सुमारे ८० टक्क्यांनी जास्त आहे. हा आकडा गेल्या १० वर्षांतील सर्वाधिक आहे आणि यामुळे विद्यार्थ्यांवरील अभ्यास, स्पर्धा परीक्षा आणि पारिवारिक दबावासंदर्भातील गंभीर चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.






