खाऊ घालण्याचा ट्रेंड वन्यजीवांना ठरतोय जीवघेणा(फोटो -सोशल मीडिया)
पुणे : निसर्गप्रेम आणि वन्यजीवांविषयी कुतूहल प्रत्येकालाच असते. मात्र, अलीकडच्या काळात जंगलभ्रमंती किंवा प्राणीसंग्रहालयात फिरताना प्राण्यांना मानवी खाद्यपदार्थ खाऊ घालण्याचा ‘ट्रेंड’ वन्यजीवांसाठी जीवघेणा ठरत आहे. वेफर्स, पिझ्झा, बर्गर, कोल्ड ड्रिंक, फ्रेंच फ्राइज, रोटी हे पदार्थ हरीण, माकडे, अस्वल, आणि काही पक्ष्यांच्या तोंडात सहज दिसतात. तसेच जंगलभ्रमंती करताना, गडकिल्ले फिरताना माकड, वानरे, खार सारख्या प्राण्यांना मानवी पदार्थ सहज खाऊ घातले जातात. पर्यटकांना याचा आनंद वाटतो, पण प्रत्यक्षात ही ‘दयाळूपणा’ची नव्हे तर अविचाराची आणि अज्ञानाची कृती आहे.
हेही वाचा : किशोर कुमारच्या बंगल्यात विराट कोहली! आलिशान रेस्टॉरंटची केली सुरवात; रोटी-खिचडीची किंमत वाचून व्हाल अवाक
प्राणी त्यांच्या नैसर्गिक वातावरणात जे खातात, ते त्यांच्या शरीररचनेशी पूर्णपणे सुसंगत असते. त्यांच्या आहारात मीठ, तेल, मसाले किंवा साखर नसते. पण पर्यटकांनी दिलेले जंकफूड खाल्ल्याने त्यांना पचनविकार, स्थूलत्व, त्वचारोग, आणि लिव्हर किंवा किडनीच्या तक्रारी निर्माण होतात. त्यामुळे अशा अन्नपदार्थांनी केवळ प्राण्यांचे आरोग्य धोक्यात येत नाही, तर त्यांचे नैसर्गिक वर्तन, अन्नशोधाची सवय आणि शिकारीची प्रवृत्तीही कमी होते. हे परिसंस्थेतील संतुलनासाठीही धोकादायक आहे.
या वाढत्या समस्येकडे वनविभाग आणि पस्थानिक प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले आहे. अनेक ठिकाणी ‘प्राण्यांना खाऊ घालू नका’ अशा सूचनाफलकांची स्थापना करण्यात आली आहे. तसेच सीसीटीव्हीद्वारे पर्यटकांवर लक्ष ठेवले जात आहे.
वन्यजीवांकडे पाहताना आपण पाहुणे आहोत, मालक नाही हे पर्यटकांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
प्राण्यांना मानवी अन्न देऊन आपण त्यांना ‘आनंद’ देत नाही, तर त्यांच्या आयुष्याशी खेळत आहोत. निसर्गाचा सन्मान म्हणजे हस्तक्षेप न करणे होय. जेव्हा त्यांना सहजपणे आयते अन्न मिळते, तेव्हा त्यांची अन्न शोधण्याची नैसर्गिक क्षमता कमी होते. यामुळे ते मानवी वस्तीकडे आकर्षित होतात आणि मानव-वन्यजीव संघर्ष वाढतो.
भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ अंतर्गत कोणत्याही वन्य प्राण्याला अन्न देणे, त्रास देणे किंवा त्यांच्या नैसर्गिक वर्तनात हस्तक्षेप करणे हा दंडनीय गुन्हा आहे. दंड आणि तुरुंगवास या दोन्ही शिक्षा त्यासाठी होऊ शकतात.
‘आपण प्राण्यांच्या आयुष्यात हस्तक्षेप करून त्यांना सवयी लावतो, आणि मग त्यांचे नैसर्गिक चक्र कोसळते. पवन्यजीवांना खाऊ घालने हे जरी पुण्याचे काम वाटत असले तरी आपण त्यांच्या नैसर्गिक चक्रात बाधा आणत आहोत. तसेच मानव प्राणी संघर्ष ही या मुळे वाढू शकतो. त्यामुळे
जागरूकता हीच पहिली पायरी आहे. जंगलभ्रमंती म्हणजे फक्त छायाचित्र काढणे नव्हे, तर जबाबदारीही आहे.’ अमित सिंग, पर्यावरण तज्ञ ‘मानवी अन्नातील मीठ आणि तेल प्राण्यांच्या पचनसंस्थेसाठी घातक आहे. एकदा हे पदार्थ चाखल्यानंतर काही प्राण्यांना त्याची सवय लागते आणि ते नैसर्गिक अन्न टाळू लागतात. परिणामी त्यांच्या आरोग्याचा आणि वर्तनाचा समतोल बिघडतो.’ डॉ. कुणाल मुनाळे, प्राणीतज्ञ आणि पशुवैद्य






