मोहम्मद शमी(फोटो-सोशल मीडिया)
Mohammed Shami’s 15 wickets in Ranji Trophy : भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या भारतीय संघा बाहेर आहे. त्याच्याकडे निवडकर्त्यांनी दुर्लक्ष केले आहे. अशातच तो रणजी ट्रॉफीमध्ये आपली शानदार कामगिरी करून सर्वांना चकित करत आहे. त्याने पुन्हा एकदा त्याच्या चमकदार कामगिरीने त्याच्या सर्व टीकाकारांना चोख उत्तर दिले आहे. रणजी ट्रॉफीमध्ये त्याने दोन सामन्यांमध्ये १५ बळी घेतले, ज्यामुळे त्याने भारताच्या सर्वात घातक गोलंदाजांपैकी एक असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. या कामगिरीने त्याने बंगालच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावलीच नाही तर त्याच्या फिटनेसबद्दलचे सर्व पूर्वग्रह दूर केले आहे.
एक महिन्यापूर्वी, मुख्य निवडकर्ता अजित आगरकरने मोहम्मद शमीच्या फिटनेसबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्याने सांगितले की जर शमी पूर्णपणे तंदुरुस्त असता तर त्याला ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघात स्थान दिले गेले असते. शमी मात्र या निर्णयावर नाराज होता आणि त्याने स्वतःला तंदुरुस्त असल्याचे सांगितले होते. आता, रणजी ट्रॉफीमधील त्याच्या प्रभावी कामगिरीने, त्याने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की तो कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आणि सक्षम आहे.
मोहम्मद शमीने उत्तराखंडविरुद्धच्या पहिल्या रणजी सामन्यात सात विकेट्स घेतल्या होत्या. तर त्यानंतर गुजरातविरुद्ध शानदार गोलंदाजी करत आठ विकेट्स चटकावल्या होत्या. गुजरातविरुद्धच्या सामन्यात त्याची गोलंदाजी इतकी प्रभावी होती की विरोधी संघाचा १४१ धावांनी पराभव झाला. ईडन गार्डन्सवर प्रथम फलंदाजी करताना बंगालने २१४ धावा उभ्या केल्या आणि गुजरातसमोर ३२६ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात गुजरातचा डाव गदगडला.
बंगालच्या विजयात शमीची महत्त्वाची भूमिका
बंगालकडून सुदीप घरामी (५०) आणि अनुस्तुप मजुमदार (५८) यांनी फलंदाजीने प्रभावी कामगिरी केली. तर मोहम्मद शमी आणि शाहबाज अहमदने चेंडूने विरोधी संघावर चांगलाच दबाव आणला. गुजरातकडून यष्टीरक्षक उर्वी पटेलने शतक झळकावून प्रतिकार केला, परंतु उर्वरित फलंदाज स्वस्तात बाद झाले. परिणामी अखेर बंगालने १४१ धावांनी सामना खिशात घातला.
हेही वाचा : ICC Ranking : Smriti Mandhana ची ‘दहशत’ कायम! प्रतीका रावलनेही घातला धुमाकूळ..
दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी शमीची निवड होण्याची शक्यता वाढली आहे. मोहम्मद शमीने आपल्या कामगिरीने निवडकर्त्यांना काही विचार करायला भाग पाडले आहे. दोन सामन्यांमध्ये १५ विकेट्स घेतल्यानंतर, १४ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेत त्याचा समावेश होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जर असे झाले तर, शमीसाठी हे एक अद्भुत पुनरागमन असणार आहे.






