World Tourism Day 2025: पर्यटन दिनी भारतातील 'या' ठिकाणांना भेट द्या आणि बदला जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
२७ सप्टेंबरला जगभर पर्यटन दिन साजरा केला जातो; यंदाची थीम आहे “पर्यटन आणि शाश्वत बदल”.
कमी खर्चातही भारतातील दिल्ली, वाराणसी, अमृतसर, गोवा आणि जयपूर यांसारखी ठिकाणे पर्यटनासाठी सर्वोत्तम.
ही ठिकाणे केवळ पाहण्यासारखी नसून जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलवणारी आणि संस्कृती-अध्यात्माचा अनुभव देणारी आहेत.
World Tourism Day 2025 : दरवर्षी २७ सप्टेंबर हा दिवस जगभरात जागतिक पर्यटन दिन (World Tourism Day) म्हणून साजरा केला जातो. केवळ प्रवासाचा आनंद लुटण्यासाठी नव्हे, तर पर्यटन हे आर्थिक विकास, सांस्कृतिक एकात्मता आणि शाश्वत जीवनशैलीचे प्रतीक आहे असा संदेश या दिवसाद्वारे दिला जातो. यंदा २०२५ च्या पर्यटन दिनाची थीम ( Theme) आहे “पर्यटन आणि शाश्वत बदल”. आजच्या वेगवान जगात पर्यटन म्हणजे फक्त सुट्ट्या काढण्याचा मार्ग राहिलेला नाही; ते मानसिक समाधान, नवीन दृष्टिकोन आणि संस्कृतींना जवळून ओळखण्याची संधी बनले आहे.
एकेकाळी प्रवास करणे हा वेळ आणि पैशांचा अपव्यय मानला जात होता. परंतु आज, पर्यटन हे केवळ मनोरंजनाचे साधन राहिलेले नाही; ते रोजगार निर्मिती, परंपरा जपणे आणि समाजात एकात्मतेची भावना रुजवणारे महत्त्वाचे साधन आहे. म्हणूनच, पर्यटन दिन आपल्याला प्रवासाला नवे आयाम देतो जिथे आपण निसर्ग, संस्कृती आणि अध्यात्म या सर्वांचा संगम अनुभवतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Netanyahu UN : ‘हमास अजूनही जिवंत आहे आणि…’; UNGA मध्ये नेतन्याहू रोषाने गर्जले; इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष शिगेला
बर्याच जणांना वाटते की प्रवास म्हणजे खूप मोठा खर्च. पण प्रत्यक्षात भारतात अशी असंख्य ठिकाणे आहेत जिथे कमी बजेटमध्येही अविस्मरणीय अनुभव घेता येतो. प्रवासादरम्यान जर आपण स्थानिक भोजन, सार्वजनिक वाहतूक किंवा वसतिगृहांचा उपयोग केला, तर खर्च कमी ठेवून जास्त आनंद घेता येतो.
भारताची राजधानी दिल्ली ही संस्कृती, इतिहास आणि आधुनिकतेचा सुंदर संगम आहे. इंडिया गेट, लाल किल्ला, जंतरमंतर, लोटस टेंपल यांसारखी ठिकाणे केवळ ऐतिहासिक वारसा सांगत नाहीत तर जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतात. दिल्लीच्या गजबजलेल्या बाजारपेठा आणि रस्त्यावर मिळणारे खाद्यपदार्थ तुमच्या प्रवासात खास रंग भरतात.
वाराणसी म्हणजे भारताचा प्राचीन वारसा. गंगाघाटावर बसून सूर्यास्त पाहणे, संध्याकाळची गंगा आरती अनुभवणे, हे क्षण शब्दांच्या पलीकडचे आहेत. इथले वातावरण तुम्हाला शांततेची, भक्तीची आणि संस्कृतीची खरी ओळख करून देते. कमी खर्चात राहण्याची सोय आणि स्थानिक जेवण येथे सहज उपलब्ध असल्याने बजेट प्रवाशांसाठी हे उत्तम ठिकाण आहे.
पंजाबमधील अमृतसर हे ठिकाण पर्यटन दिनानिमित्त अवश्य भेट द्यावे असे आहे. सुवर्णमंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नसून जगभरातून येणाऱ्या पर्यटकांसाठी शांतीचे केंद्र आहे. सर्वात खास म्हणजे येथे प्रवेश मोफत असून लंगरात मिळणारे जेवण ही मानवतेची खरी शिकवण आहे.
गोवा म्हटलं की समुद्रकिनारे, पार्ट्या आणि स्वातंत्र्याची भावना डोळ्यासमोर उभी राहते. समुद्रकिनाऱ्यावर बसून सूर्यास्त पाहणे हे सर्वस्वी मोफत आहे, पण त्याचा आनंद अमूल्य आहे. मित्रमंडळी किंवा जोडीदारासोबत गोव्यात घालवलेले क्षण जीवनातील अविस्मरणीय ठरतात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Imam Khomeini Spaceport : ‘युद्धानंतरही इराण आक्रमकच…’; उपग्रह प्रतिमांद्वारे उघडकीस आली गुप्त माहिती समोर
राजस्थानची राजधानी जयपूर ही किल्ले, राजवाडे आणि पारंपरिक बाजारपेठांसाठी प्रसिद्ध आहे. “पिंक सिटी” म्हणून ओळखले जाणारे हे शहर भारतीय राजेशाही संस्कृतीची खरी झलक दाखवते. कमी खर्चातही येथील प्राचीन बाजार, हस्तकला आणि रंगीबेरंगी रस्ते अनुभवण्यासारखे आहेत.
पर्यटन दिनाचा खरा अर्थ म्हणजे प्रवासाद्वारे स्वतःला शोधणे आणि जगाकडे नवा दृष्टीकोन विकसित करणे. प्रवास हा फक्त छायाचित्रे काढण्यापुरता नसून, तो संस्कृती, अध्यात्म आणि मानवी नात्यांना अधिक जवळून समजून घेण्याची संधी आहे. त्यामुळे या पर्यटन दिनी, कमी खर्चातही भारतातील ही ठिकाणे एक्सप्लोर करा आणि तुमच्या जीवनात नव्या उर्जेचा संचार करा.