खासदार संजय राऊत यांनी एपस्टीन फाइल्सवरुन सत्ताधारी राजकीय नेत्यांवर निशाणा साधला (फोटो - सोशल मीडिया)
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्रातील नेत्यांवर निशाणा साधला आहे. खासदार राऊत म्हणाले की, “आपण एपस्टीन फाइल्समध्ये मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्रीही आहेत. केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांचा या लोकांशी संबंध असल्याचं उघड झालं आहे. मोदी सरकार या सँकडलमध्ये अडकलेलं आहे हे तुम्ही पाहू शकता. एपस्टिन सोबत या सरकारचे मंत्री किती नाजूक आणि मधूर संबंध ठेवून होते हे तुम्ही पाहिलं आहे. हरदीप पुरींनी आपल्या पदाचा गैरवापर करून एपस्टिनच्या लोकांना भारतात येण्याचा व्हिसा दिला आहे. हे मोदींच्या संमतीने झालं नसेल का?” असा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
हे देखील वाचा : पंजाबमध्ये कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा; AAP नेत्यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या
खासदार राऊत पुढे म्हणाले की, “या एपस्टीन फाइल्सवर मी आता अधिक काही बोलणार नाही. कारण यावर बोलायला आमचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सक्षम आहेत. मात्र पंतप्रधान मोदींनी त्या नावं येणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई करावी. बिल गेट्स आणि त्याच्या पत्नीचा संसार का मोडला? बिल गेट्स यांच्या पत्नीला याबद्दल कळलं तेव्हा तिने नवऱ्याशी घटस्फोट घेतला. त्याच पद्धतीचं संशयास्पद वातावरण आपल्या मंत्र्यांवर झालेलं असताना ते अजूनही आपल्या देशावर कारभार करत आहेत. हा यातील फरक समजून घ्या,” अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.
हे देखील वाचा : सुनेत्रा काकीच पक्षाच्या प्रमुख राहतील! पवार कुटुंबियांच्या एकत्रित भेटीनंतर रोहित पवारांचे सूचक विधान
तर ते अत्यंत बकवास आहे
त्याचबरोबर सध्या संसदेमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. संसदेमध्ये गदारोळ झाल्यानंतर पंतप्रधान मोदींवर काँग्रेस महिला खासदार आक्रमक भूमिका घेतील अशी भीती लोकसभा स्पीकर ओम बिरला यांनी व्यक्त केली. यावरुन आता जोरदार टीका केली जात आहे. याबाबत खासदार राऊत म्हणाले की, “हे बकवास आहे. मोदींच्या आधीपासून आम्ही संसदेत आहोत. मोदी दिल्लीत नंतर आले. आम्हाला संसद आणि त्याचे कामकाज माहित आहे. संसदेची आचारसंहिता आणि नियम माहीत आहे. मोदींना कोणापासून धोका आहे? काँग्रेसपासून? ज्या काँग्रेसने देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सर्वात मोठं योगदान दिलं, तुरुंगवास भोगला, त्यातूनच ही पार्लमेंट तयार झाली. त्या काँग्रेसपासून मोदींना धोका आहे, असं म्हटलं जात असेल तर ते अत्यंत बकवास आहे,” अशी टीका खासदार राऊतांनी केली आहे.






