फोटो सौजन्य - Social Media
प्रत्येक खेळाडूचा यशाचा प्रवास प्रेरणादायक कथा सांगतो. दिल्ली दबंग K.C. संघाचा प्रमुख खेळाडू अशू मलिक याची ही कहाणी त्याच्या संघर्षमय सुरुवातीपासून आजच्या प्रगतीपर्यंत पोहोचते. कबड्डीच्या मैदानावर त्याच्या यशामागे कठोर मेहनत, आत्मविश्वास आणि खेळाप्रतीची निष्ठा आहे. हरियाणातील एका खेड्यात जन्मलेल्या अशूची कबड्डीची ओढ लहानपणापासूनच होती. गावातील रेल्वे कर्मचारी आणि वरिष्ठ खेळाडूंच्या खेळामुळे त्याला प्रेरणा मिळाली. अशू म्हणतो, “गावातील खेळाडू खेळताना पाहून मीही कबड्डी खेळायचं ठरवलं.” या छंदासाठी त्याला कुटुंबाचा विरोध सहन करावा लागला. “सुरुवातीच्या काही वर्षांत कुटुंबाने मला अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला,” तो आठवतो.
कबड्डीच्या मैदानावर त्याचा प्रवास सोपा नव्हता. घरच्यांचा विरोध, आर्थिक आव्हाने आणि शारीरिक तयारी यावर मात करून अशूने आपली क्षमता सिद्ध केली. वजन कमी करून खेळासाठी फिटनेस मिळवणे हा त्याच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा ठरला. “माझं वजन 80 किलो होतं. मी पाच किलो वजन कमी केलं,” अशू सांगतो. प्रो कबड्डी लीगमध्ये सामील होणे ही अशूच्या करिअरसाठी निर्णायक गोष्ट ठरली. सुरुवातीला संघात सामील होताना तो बुजला होता. “मी काही दिवस गप्प होतो, पण नंतर संघात मिसळलो,” तो सांगतो. 10 व्या हंगामात नवीन कुमारच्या अनुपस्थितीत त्याच्या नेतृत्वगुणांनी चमक दाखवली. “नवीन नाही खेळत तर काय झालं? आपण त्याच्या अनुपस्थितीतही जिंकणारच,” अशूने संघाला दिलेला आत्मविश्वास महत्त्वाचा ठरला.
10 व्या हंगामात 276 गुण मिळवत अशू मलिक सर्वोत्तम रेडर ठरला. त्याने संघाला उपांत्य फेरीपर्यंत पोहोचवले. 11 व्या हंगामातही त्याची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. आतापर्यंत 174 गुण मिळवत त्याने 13 सुपर 10 सत्रे पूर्ण केली आहेत. “माझं एकमेव लक्ष्य दिल्लीला पुन्हा चॅम्पियन बनवणं आहे,” अशूने स्पष्टपणे सांगितलं. त्याच्या या जिद्दीमुळे दिल्ली संघ सातत्याने चांगली कामगिरी करत आहे.
9 डिसेंबरला हरियाणा स्टीलर्स विरुद्ध तेलुगू टायटन्स (रात्री 8 वाजता) आणि पुणेरी पलटन विरुद्ध दबंग दिल्ली K.C. (रात्री 9 वाजता) हे सामने होणार आहेत. चाहते हे सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर आणि डिस्ने+ हॉटस्टारवर पाहू शकतात. अधिक माहितीसाठी www.prokabaddi.com या संकेतस्थळाला भेट द्या किंवा प्रो कबड्डीच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्सवर फॉलो करा. दिल्ली दबंग K.C. च्या या खेळाडूचा प्रवास खेळाडूंना प्रेरणा देणारा असून, त्याच्या मेहनतीची कहाणी ही नवीन पिढीसाठी प्रेरणादायी आहे.






