रायगड जिल्हा परिषदेत कोट्यवधींचा घोटाळा? अंगणवाडी सोलर प्रकल्पात २.५ कोटींच्या अपहाराचा आरोप
Karjat News : ऐन उन्हाळ्यात पाणी संकट ; कर्जत तालुक्यातील गावकऱ्य़ांचे होतायत हाल
अंगणवाड्यांमधील वीज जोडणी आणि सौर ऊर्जा (सोलर पॅनेल) प्रकल्पाचा मुद्दा उपस्थित करत सभापती म्हणाल्या की, “रायगड जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये सोलर पॅनेल पुरवण्याचे काम कंत्राटदारांना देण्यात आले होते. सोलर पॅनेल आले, मात्र त्यांची योग्य प्रकारे वीज जोडणीच करण्यात आली नाही. जोडणी न केल्यामुळे हे लाखो रुपयांचे साहित्य धूळ खात पडून राहिले आणि निकृष्ट दर्जाचे झाले. विशेष म्हणजे, प्रत्यक्षात काम पूर्ण झालेले नसतानाही कंत्राटदारांची कोट्यवधी रुपयांची बिले अदा करून अधिकारी मोकळे झाले आहेत. या केवळ एकाच प्रकल्पात सुमारे २.५ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा प्राथमिक संशय आहे.”
महिला व बालकल्याण विभागाच्या मुख्य अधिकारी निर्मला कुचिक यांच्या कामकाजावर आक्षेप घेताना सभापतींनी आरोप केला की, रायगड जिल्ह्यात सक्षम कंत्राटदार उपलब्ध असतानाही येथील एकाही स्थानिक व्यक्तीला काम दिले जात नाही. प्रशासकीय कालावधीपासून ते आत्तापर्यंत कुचिक मॅडम यांच्याकडून केवळ पुण्यातील कंत्राटदारांचीच नावे सुचवली आणि रेटली जात आहेत. यामध्ये मोठी आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.
खाऊ वाटप, अंगणवाडीतील मुलांचे गणवेश आणि गरोदर मातांना दिल्या जाणाऱ्या पोषण किट वाटपातही मोठा घोळ सुरू असल्याचे सभापतींनी उघड केले. कागदोपत्री या योजनांचे १००% वाटप दाखवून शासकीय निधी हडप केला जात आहे, तर प्रत्यक्षात जमिनीवर केवळ २५% लाभार्थींनाच याचा लाभ मिळतो आहे. उर्वरित ७५% साहित्याची बिले परस्पर लाटली जात आहेत.
“लहान मुलांना दिला जाणारा पोषण आहार (खाऊ) अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहे. त्याचे पॅकेजिंगही अतिशय घाणेरड्या आणि निकृष्ट पद्धतीने केले जात आहे. हा खाऊ इतका खराब आहे की मुले तो खाऊ शकत नाहीत, परिणामी हा शासकीय पैशातून घेतलेला अन्नधान्याचा साठा थेट कचऱ्याच्या कुंडीत फेकला जात आहे,” असा संताप केणी यांनी व्यक्त केला. ई-टेंडरिंग होऊन ५-६ महिने उलटले तरी कामांची अंमलबजावणी का झाली नाही, असा सवालही त्यांनी केला.
प्रशासकीय जबाबदारी ही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची (CEO) देखील असते. मग गेल्या चार वर्षांच्या प्रशासकीय कालावधीत आणि टेंडरिंग होऊनही कामे का रखडली, याची माहिती सीईओ मॅडमनी का घेतली नाही? लहान मुलांच्या आणि गरोदर मातांच्या या संवेदनशील प्रश्नावर त्यांनी गांभीर्याने लक्ष का दिले नाही? असा थेट सवाल करत या प्रकरणाला सीईओ देखील कुठेतरी जबाबदार आहेत का, असा प्रश्न सभापती रसिका केणी यांनी उपस्थित केला आहे.
Raigad News : धावत्या बसचं चाक निखळलं अन्… आगार व्यवस्थापकाचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ
“महिला व बालविकास हा अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा विभाग आहे. लहान मुलांच्या तोंडचा घास आणि गरिबांचे हक्क हिरावून घेणाऱ्या अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांची आणि कंत्राटदारांची सखोल चौकशी करून शासनाने त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची किंवा कडक फौजदारी कारवाई करावी, ही माझी प्रशासनाला आणि सरकारला नम्र विनंती आहे.या गंभीर आरोपांमुळे रायगड जिल्हा परिषद वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, आता या प्रकरणावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आरोपी अधिकारी निर्मला कुचिक काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, अशी माहिती रसिका राजा केणी (सभापती, महिला व बालकल्याण विभाग, रा.जि.प.) यांनी दिली.






