Ajit Agarkar resigns From as Chief Selector
बीसीसीआय लवकरच नवीन मुख्य निवडकर्त्याच्या निवडीची प्रक्रिया सुरू करणार आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, अजित आगरकर यांनी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना कळवले आहे की, त्यांना आता मुख्य निवडकर्ता म्हणून काम करण्याची इच्छा नाही. आगरकर यांच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की, अजित यांनी बीसीसीआयला आपला हा निर्णय कळवला आहे. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनले आहेत, कारण त्यांचा करार ४ ऑक्टोबर रोजी संपणार आहे.
काही महिन्यांपूर्वी, बीसीसीआय अजित आगरकर यांचा करार एका वर्षासाठी वाढवण्याचा विचार करत असल्याची बातमी समोर आली होती. २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाला डोळ्यासमोर ठेवून या निर्णयावर चर्चा झाली होती. मात्र, लॉर्ड्सवरील एकदिवसीय सामन्यानंतर रोहित शर्माने भारतीय संघ सोडल्याच्या बातमीने खळबळ उडाली. यानंतर, बीसीसीआय आणि अजित आगरकर यांच्यात बिनसल्याची चर्चा सुरु झाली.
बीसीसीआयच्या वार्षिक सभेनंतर, बोर्ड सचिव देवजित सैकिया यांनी सांगितले की, भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांना पदावर कायम ठेवायचे की हटवायचे, यावर लवकरच निर्णय घेतला जाईल. ते म्हणाले की, त्यांच्या कार्यकाळाला अजून १५ दिवस शिल्लक आहेत आणि क्रिकेटमध्ये १५ दिवस हा खूप मोठा कालावधी असतो, त्यामुळे बोर्ड योग्य वेळी आपला निर्णय जाहीर करेल. सैकिया यांनी हेही स्पष्ट केले की, या बैठकीत कोणत्याही विशिष्ट व्यक्तीवर चर्चा झाली नाही. या बैठकीनंतर, सैकिया यांनी आशिया कपच्या दोन्ही ट्रॉफी बीसीसीआय कार्यालयात आणण्याबद्दलही सांगितले .
बीसीसीआय लवकरच आपल्या सिनियर सिलेक्शन कमिटीसाठी नवीन अध्यक्ष शोधण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे. याव्यतिरिक्त, बीसीसीआय ज्यूनियर सिलेक्शन कमिटीमधील सर्व पाच पदांसाठी निवडकर्त्यांच्या शोधात आहे. देवजित सैकिया यांनी सांगितले की, त्यांना ज्यूनियर सिलेक्शन कमिटीसाठी मोठ्या संख्येने अर्ज प्राप्त झाले असून, ही प्रक्रिया पुढील दोन आठवड्यांत पूर्ण केली जाईल.
२०२३ मध्ये अजित आगरकर यांची भारतीय वरिष्ठ संघाच्या मुख्य निवडकर्तापदी नियुक्ती झाली होती. त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ आता संपत आला आहे. आगरकर यांची जागा कोण घेणार, हा प्रश्न सर्वांनाच आहे. वृत्तानुसार, माजी भारतीय क्रिकेटपटू पार्थिव पटेल या शर्यतीत आघाडीवर आहेत.






