पिंपरी-चिंचवडमध्ये हॉकी स्पर्धा (फोटो- सोशल मिडिया )
पिंपरी-चिंचवडमध्ये सुरू आहे हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा
नेहरूनगरमधील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर सुरू होते सामने
‘बी’ आणि ‘सी’ या दोन विभागांमध्ये खेळवले जात आहे स्पर्धा
पुणे: पिंपरी-चिंचवड येथील नेहरूनगरमधील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर सुरू असलेल्या १६व्या हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये गुरुवारी हॉकी आंध्र प्रदेश, आसाम हॉकी, हॉकी कर्नाटक आणि ले पुडुचेरी हॉकी यांनी आपापल्या पूलमधील सामन्यांत शानदार विजय नोंदवत पूर्ण गुणांची कमाई केली. हॉकी महाराष्ट्राच्या यजमानपदाखाली आयोजित करण्यात आलेल्या या राष्ट्रीय स्पर्धेतील सामने ‘बी’ आणि ‘सी’ या दोन विभागांमध्ये खेळवले जात आहेत.
‘बी’ विभागातील पूल ‘अ’मधील सामन्यात हॉकी आंध्र प्रदेशने दिल्ली हॉकीवर २-१ असा निसटता विजय मिळवला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला. आंध्र प्रदेशकडून राजेश्वरी व्यदादी साई धनाने १३व्या मिनिटाला पहिला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली.
त्यानंतर अंकिता बोम्मूने ३०व्या मिनिटाला गोल नोंदवत आंध्र प्रदेशची आघाडी भक्कम केली. दिल्ली हॉकीकडून मेहतो निशाने ३३व्या मिनिटाला गोल करत सामन्यात रंगत निर्माण केली. मात्र, त्यानंतर दिल्लीला बरोबरीचा गोल करता आला नाही आणि आंध्र प्रदेशने २-१ असा विजय मिळवत महत्त्वाचे पूर्ण गुण आपल्या खात्यात जमा केले.
कर्नाटकचा तमिळनाडूवर ५-१ असा दणदणीत विजय
‘बी’ विभागातील पूल ‘ब’मध्ये हॉकी कर्नाटकने हॉकी युनिट ऑफ तमिळनाडूचा ५-१ असा एकतर्फी पराभव केला. कर्नाटककडून लक्ष्मीने तिसऱ्या मिनिटाला गोल करत संघाचे खाते उघडले. त्यानंतर मनीष पोन्नम्मा सीडीने नवव्या मिनिटाला गोल नोंदवून आघाडी वाढवली. या सामन्यात व्यष्णवी अरुल हिने अप्रतिम कामगिरी करत शानदार हॅट्ट्रिक नोंदवली. तिने १८व्या, ३१व्या आणि ३६व्या मिनिटाला गोल करत कर्नाटकच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तमिळनाडूकडून प्रियदर्शिनी के हिने चौथ्या मिनिटाला एकमेव गोल केला. मात्र, त्यानंतर कर्नाटकच्या आक्रमक खेळासमोर तमिळनाडूचा बचाव टिकू शकला नाही.
आसामचा केरळवर ४-२ असा विजय
‘बी’ विभागातील पूल ‘अ’मध्ये आसाम हॉकीने केरळ हॉकीवर ४-२ असा विजय मिळवला. आसामच्या विजयाची प्रमुख शिल्पकार चौरसिया तान्या ठरली. तिने १७व्या, ४१व्या आणि ४४व्या मिनिटाला गोल करत आसामच्या आक्रमणाला धार दिली आणि संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. केरळकडून ज्योती झाक्सा हिने ४२व्या आणि ५१व्या मिनिटाला गोल करत संघाचा प्रतिकार कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आसामने सामन्यावर नियंत्रण राखत ४-२ असा विजय आपल्या नावावर केला.
Nagpur : १३ ऑगस्टला हॉकीचे अस्तित्व संपणार ; भवितव्यावर प्रश्नचिन्ह
दोन सामने वॉकओव्हरने निकाली
‘सी’ विभागातील दोन सामने वॉकओव्हरने निकाली काढण्यात आले. पूल ‘अ’मध्ये दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव हॉकीला त्रिपुरा ऑलिम्पिक असोसिएशनविरुद्ध ५-० असा विजय बहाल करण्यात आला. त्रिपुरा संघ सामना खेळण्यासाठी उपस्थित न राहिल्याने हा निर्णय घेण्यात आला.तसेच, पूल ‘ब’मध्ये हॉकी गुजरातलाही तेलंगणा हॉकीविरुद्ध ५-० असा वॉकओव्हरचा विजय देण्यात आला.

