अजमतुल्ला उमरझाई(फोटो-सोशल मीडिया)
Afghanistan vs Hong Kong : आशिया कप २०२५ स्पर्धेला कालपासून म्हणजेच ९ सप्टेंबर रोजी सुरवात झाली आहे. या स्पर्धेचा पहिलं सामना अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात अफगाणिस्तान संघाने हाँगकाँग संघाचा ९४ धावांनी पराभव करून स्पर्धेची विजयी सुरवात केली. या दरम्यान अफगाणिस्तानचा स्टार खेळाडू अजमतुल्ला उमरझाईने हाँगकाँग संघाची पुरती दशा करून ठेवली. उमरझाईच्या स्फोटक अर्धशतकाच्या जोरावर अफगाणिस्तानच्या संघाने हाँगकाँगसमोर १८८ धावांचे लक्ष्य ठेवले. उमरझाईने या कामगिरीसह क्रिकेट इतिहासातील एक कामगिरी देखील केली आहे.
या सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार रशीद खानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने शानदार फलंदाजी हाँगकाँगविरुद्ध १८८ धावा उभ्या केल्या. मोठी धावसंख्या उभारण्यात अफगाण फलंदाज अझमतुल्लाह उमरझाईने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याने सामन्यात २१ चेंडूंचा सामना करत स्फोटक अंदाजात ५३ धावांची महत्त्वाची खेळी साकारली. उमरझाईने आपल्या खेळीत ५ षटकार आणि २ चौकारांची आतिषबाजी केली. यापूर्वी त्याने फक्त २० चेंडूंकहा सामना करत अर्धशतक ठोकले. या खेळीसह यासह त्याने इतिहास रचला आहे. अजमतुल्लाह उमरझाई आता टी२० स्वरूपात अफगाणिस्तानकडून सर्वात जलद अर्धशतक करणारा फलंदाज ठरला आहे.
यापूर्वी हा विक्रम इतर अफगाण फलंदाज मोहम्मद नबी आणि गुलबदीन नायब या दोन खेळाडूंच्या नावे जमा होता. या दोन्ही फलंदाजांनी अफगाणिस्तानसाठी प्रत्येकी २१ चेंडूंमध्ये त्यांचे टी२० अर्धशतक झळकावले होते. आता उमरझाईने या दोन्ही फलंदाजांचा विक्रम मोडून त्यांना मागे टाकले आहे. जर आपण अफगाणिस्तान संघाचा वरिष्ठ खेळाडू मोहम्मद नबीबाबत बोललो तर त्याने २०१७ मध्ये आयर्लंडविरुद्ध हा विक्रम आपल्या नावे केला होता. तर २०२४ मध्ये गुलबदिन नायबने टीम इंडियाविरुद्ध अशी कामगिरी केली होती.
हेही वाचा : Asia cup 2025 : उपकर्णधार Shubman Gill चा ‘मित्र’ भारतावरच करणार पलटवार; UAE च्या भात्यात ‘तो’ एक खास शस्त्र
अझमतुल्ला उमरझाईने सामन्यात स्फोटक फलंदाजी कौशल्य दाखवून दिले. त्याने १९ व्या षटकात आपला जबरदस्त फॉर्म दाखवून दिला. या षटकात उमरझाईने लागोपाठ तीन षटकार ठोकले. त्यानंतर त्याने आपले अर्धशतक देखील पूर्ण केले. तर गोलंदाजीत त्याने हाँगकाँगच्या एका फलंदाजाला माघारी देखील पाठवले.