महिला आशिया कप रायझिंग स्टार्स २०२६ चे वेळापत्रक जाहीर(फोटो-सोशक मीडिया)
Women’s Asia Cup Rising Stars 2026 Schedule : पुरुषांच्या आशिया कप रायझिंग स्टार्सनंतर, आशियाई क्रिकेट परिषदेने महिला आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे. महिला आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धा १३ ते २२ फेब्रुवारी दरम्यान बँकॉकमध्ये खेळवण्यात येणार आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने (एसीसी) सोमवारी सोशल मीडियाद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
महिला आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी होणार आहेत. टी-२० स्वरूपात खेळवण्यात येणाऱ्या या स्पर्धेत पूर्ण सदस्य देशांच्या ‘अ’ संघांमधून आणि आशियाई क्षेत्रातील चार अव्वल असोसिएट संघांमधून उदयोन्मुख महिला क्रिकेट प्रतिभा शोधण्याचा उद्देश असणार आहे. पूर्ण सदस्य देशांमध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका या संघांचा समावेश असेल, तर युएई, नेपाळ, मलेशिया आणि थायलंडमधील असोसिएट संघ समाविष्ट असणार आहे.
हेही वाचा : GG vs RCB, WPL 2026 LIVE : GG विजयी रुळावर परतणार? TOSS जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय; RCB करणार फलंदाजी
एसीसीकडून जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार, गट अ मध्ये भारत ‘अ’, पाकिस्तान ‘अ’, युएई आणि नेपाळ या संघाचा समावेश आहे. दरम्यान, गट ब मध्ये बांगलादेश अ, श्रीलंका अ, मलेशिया आणि थायलंड संघ आहेत. प्रत्येक संघ तीन साखळी सामने खेळणार आहेत. दोन्ही गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहेत.
१३ फेब्रुवारी रोजी युएई विरुद्ध भारतीय संघ पहिला सामना खेळणार आहे. त्यानंतर १५ फेब्रुवारी रोजी भारत अ आणि पाकिस्तान अ यांच्यात हाय-व्होल्टेज सामना खेळवला जाणार आहे. १७ फेब्रुवारी रोजी भारत नेपाळशी भिडणार आहे. प्रत्येक गटातील दोन संघ उपांत्य फेरीत पोहचणार आहेत. हे सामने २० फेब्रुवारी रोजी खेळवले जातील. २२ फेब्रुवारी रोजी दोन्ही उपांत्य फेरीतील विजेत्यांमध्ये जेतेपदाचा सामना होणार आहे.
𝟐𝟎𝟐𝟔 𝐢𝐬 𝐭𝐡𝐞 𝐲𝐞𝐚𝐫 𝐨𝐟 𝐰𝐨𝐦𝐞𝐧’𝐬 𝐜𝐫𝐢𝐜𝐤𝐞𝐭 ~ 𝐚𝐧𝐝 𝐢𝐭 𝐛𝐞𝐠𝐢𝐧𝐬 𝐰𝐢𝐭𝐡 𝐭𝐡𝐞 𝐧𝐞𝐱𝐭 𝐠𝐞𝐧𝐞𝐫𝐚𝐭𝐢𝐨𝐧 🌟 The #DPWorldWomensAsiaCupRisingStars2026 is set to bring bold performances, big moments and the future of Asian cricket to the forefront. pic.twitter.com/Vt4FgRy14A — AsianCricketCouncil (@ACCMedia1) January 19, 2026
एक गोष्ट इथे लक्ष्यात घ्यायला हवी की, महिला आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेचा पहिला हंगाम २०२३ मध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी स्पर्धेचे सर्व सामने हाँगकाँगच्या कोवलून येथील मिशन रोड मैदानावर खेळले गेले होते. व्हिसा समस्यांमुळे थायलंड अ संघाला स्पर्धा सुरू होण्याच्या काही काळापूर्वीच माघार घ्यावी लागली होती. त्यांच्या जागी नेपाळ संघाचा स्पर्धेत समावेश करण्यात आला होता. मुसळधार पावसामुळे मोठ्या समस्या निर्माण झाल्या होत्या, ज्यामुळे पहिल्या फेरीतील १२ पैकी ७ सामने रद्द करण्यात आले होते. एक उपांत्य सामना देखील पावसामुळे रद्द करण्यात आला होता. अंतिम सामन्यात भारत अ संघाने बांगलादेश अ संघाचा ३१ धावांनी पराभव केला.






