 
        
        महमुदुल्लाहची तब्बेत अचानक बिघडली(फोटो-सोशल मीडिया)
Mahmudullah admitted to hospital: बांगलादेशचा अनुभवी क्रिकेटर महमुदुल्लाह रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. डेंग्यूच्या तापाने त्याला गंभीरपणे ग्रासले असून त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले गेले आहे. महमुदुल्लाहची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे वृत्त आले आहे. महमुदुल्लाहची तब्बेत अचानक बिघडल्यामुळे त्याची पत्नी जनतुल कौसर चिंतेत आहे. तिच्याकडून सोशल मीडिया पोस्टद्वारे लोकांना महमुदुल्लाहच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महमुदुल्लाहवर ढाका येथील एव्हरकेअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बांगलादेश क्रिकेट बोर्डकडून महमुदुल्लाहच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष देण्यात येत आहे. बीसीबीचे मुख्य चिकित्सक डॉ. देबाशिष चौधरी यांनी सांगितले की, “महमुदुल्लाह हा रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी अनेक दिवसांपासून आजारी होता. अनेक चाचण्यांनंतर त्यांना डेंग्यू झाल्याचे आढळून आले.” याबरोबर आता बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या वैद्यकीय पथकानुसार, महमुदुल्लाह आता बरा होत आहे.
महमुदुल्लाहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तथापि, तो देशांतर्गत क्रिकेट खेळत आहे. तो बांगलादेशमध्ये खेळल्या जाणाऱ्या एनसीएल टी-२० मध्ये ढाका मेट्रो संघाकडून मैदानात सक्रिय आहे. त्याने दोन सामन्यांमध्ये ४७ धावा फटकावल्या आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला, एप्रिलमध्ये, तो ढाका प्रीमियर लीगमध्ये देखील खेळताना दिसला होता. तो बांगलादेश प्रीमियर लीगच्या आगामी नवीन हंगामात देखील खेळताना दिसणार आहे.
हेही वाचा : भारताची धाकड फलंदाज अडकणार लग्नबंधनात! स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल करणार आयुष्याची नवी सुरुवात
महमुदुल्लाहच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल सांगायचे झाल्यास तर, त्याने बांगलादेशसाठी एकूण ४३० सामने खेळलेले आहेत. यामध्ये ५० कसोटी, २३९ एकदिवसीय आणि १४१ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश आहे. एकत्रितपणे, महमुदुल्लाहच्या कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १०,००० पेक्षा जास्त धावा फटकावल्या आहेत. त्याने कसोटी सामन्यात २,९१४, एकदिवसीय सामन्यात ५,६८९ आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात २,४४४ धावा काढल्या आहेत. या वर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान महमुदुल्लाहची आंतरराष्ट्रीय कारकीर्द अंतिम टप्प्यात होती.






