दीप्ती शर्मा(फोटो-सोशल मीडिया)
ICC Women’s T20 Rankings : आयसीसीने महिला टी२० आंतरराष्ट्रीय रँकिंग जाहीर केली आहे. भारतीय फिरकी गोलंदाज दीप्ती शर्माने आयसीसी महिला टी२० आंतरराष्ट्रीय रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे आणि त्यामुळे ती आता तिच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच नंबर वन गोलंदाज बनण्याच्या दिशेने निघाली आहे. दीप्ती शर्मा तिच्या सातत्यपूर्वक कामगिरीने ती गेल्या सहा वर्षांत बहुतेक वेळा टी२० गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये टॉप १० मध्ये राहिली आहे, परंतु सातत्याने चांगली कामगिरी करून देखील तिला अव्वल नंबरवर विराजमान होता आलेले नाही.
हेही वाचा : IND VS ENG :लॉर्ड्स कसोटीत विराट कोहलीची एंट्री? ‘त्या’ एका निर्णयाने चाहत्यांच्या आशा वाढल्या..
टी२० आंतरराष्ट्रीय रँकिंगच्या ताज्या माहितीमध्ये, दीप्तीला एका स्थानाचा फायदा झाला आहे. या दरम्यान तिने ऑस्ट्रेलियाची वेगवान गोलंदाज अॅनाबेल सदरलँडला मागे टाकून दुसरे स्थान पटकावले आहे. शर्मा ही आता रँकिंगमध्ये अव्वल असलेल्या पाकिस्तानच्या सादिया इक्बालपेक्षा फक्त आठ रेटिंग गुणांनी पिछाडीवर आहे. दीप्तीचे ७३८ रेटिंग गुण जमा आहेत तर सादिया इक्बालच्या नावावर ७४६ रेटिंग गुण आहेत.
इंग्लंड आणि भारताच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यात शर्माने तीन विकेट घेतल्यानंतर तिच्या नवीनतम क्रमवारीत चांगली सुधारणा झाली आहे. राहिलेल्या दोन सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करून ही ऑफ-स्पिनर तिच्या पाकिस्तानी प्रतिस्पर्ध्याकडून अव्वल स्थान हिसकावून घेऊ शकते.
भारताची वेगवान गोलंदाज अरुंधती रेड्डीने देखील मोठी झेप घेतली आहे. ओव्हल येथे झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील अलिकडच्या सामन्यात रेड्डीने तीन विकेट घेतल्यानंतर टी-२० गोलंदाजांच्या यादीत ११ स्थानांनी मोठी झेप घेऊन ती ४३ व्या स्थानावर पोहोचली आहे. फलंदाजांमध्ये जेमिमा रॉड्रिग्जला दोन स्थानांचा फायदा होऊन ती १२ व्या स्थानावर पोहोचली आहे. ब्रिस्टलमध्ये झालेल्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात तिने शानदार अर्धशतक झळकावले होते. याशिवाय, टॉप-१० मध्ये कोणताही बदल झालेला नाही. ऑस्ट्रेलियन फलंदाज बेथ मूनी ७९४ रेटिंग गुणांसह पहिल्या स्थानावर विराजमान आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील एजबॅस्टन येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडवर ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. युवा कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने इंग्लंडचा ३३६ धावांनी पराभव केला. या विजयासह अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी मालिकेत १-१ बरोबरी केली आहे. आता भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा सामना लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर खेळवला जाणार होणार आहे. या सामन्यात इंग्लंडला जसप्रीत बूमराहच्या आक्रमनाचा सामना करावा लागेल. याबाबत इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांनी एक विधान केले आहे. आमचा संघ दुसऱ्या कसोटी सामन्यात पाचही दिवस भारताच्या मागे होता आणि लॉर्ड्समध्ये खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी त्यांना चांगली तयारी करावी लागेल असे मत इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांनी व्यक्त केले आहे.