मुंबई : ड्वेन ब्राव्होच्या नावावर आयपीएलमध्ये १७१ विकेट आहेत. त्याने मलिंगाच्या १७० बळींचा विक्रम मोडीत काढला आहे. आयपीएलमध्ये गुरुवारी झालेल्या सामन्यात ड्वेन ब्राव्हो आपला संघ चेन्नई सुपर किंग्जला जिंकून देऊ शकला नाही, पण या सामन्यात त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. लखनऊ सुपर जायंट्सच्या दीपक हुडाची विकेट घेताच तो आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला. त्याच्या नावावर आता १७१ विकेट्स आहेत. या सामन्यापूर्वी श्रीलंकेचा लसिथ मलिंगा या स्थानावर विराजमान होता. आयपीएलमध्ये त्याच्या नावावर १७० विकेट्स आहेत.
लखनऊ सुपर जायंट्सच्या डावातील १८व्या षटकात ब्राव्होने ही कामगिरी केली. या सामन्यातील ब्राव्होचे हे शेवटचे षटकही होते. त्याच्या शेवटच्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर, ब्राव्होने लेग साइडमध्ये दीपक हुडाकडे कमी फुल टॉस स्लो बॉल टाकला. या चेंडूवर हुडाने मोठा फटका खेळला, चेंडू बराच वेळ हवेत राहिला आणि रवींद्र जडेजाने त्याचा झेल घेतला. या झेलसह ब्राव्हो आयपीएलचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला.
ब्राव्होने आतापर्यंत एकूण १५३ आयपीएल सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने २४.०७ च्या गोलंदाजीची सरासरी आणि ८.३४ च्या इकॉनॉमी रेटने एकूण १७१ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने दोनदा आयपीएलमध्ये ४-४ विकेट घेतल्या आहेत. ब्राव्होने आयपीएलमध्येही बॅटने खूप धावा केल्या आहेत. या १५३ सामन्यांमध्ये त्याने १५३८ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची फलंदाजीची सरासरी २२.९६ आणि स्ट्राइक रेट १३०.२३ होता. ब्राव्होने आयपीएलमध्ये आतापर्यंत ५ अर्धशतकेही झळकावली आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या ७० आहे.
या सामन्यात लखनऊने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजी करताना रॉबिन उथप्पा (५०), मोईन अली (३५), शिवम दुबे (४९) आणि अंबाती रायडू (२७) यांच्या सुरेख खेळीमुळे चेन्नईने निर्धारित २० षटकांत ७ गडी गमावून २१० धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनौ सुपर जायंट्सनेही दमदार सुरुवात केली. संघाची सलामी जोडी केएल राहुल (४०) आणि क्विंटन डी कॉक (६१) यांनी पहिल्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी केली. त्यानंतर एविन लुईस (५५) आणि आयुष बडोनी (१९) यांनी दमदार फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला.