FIFA World Cup 2026: तोंड झाकलं तर खेळ संपला! 5 सेकंदांचा नियम अन्…; आता मैदानावर चालणार नाही हुज्जत; FIFA चे नवे नियम काय?
FIFA World Cup 2026 New Rules: फीफा वर्ल्ड कप २०२६ सुरु होण्यापूर्वी खेळाडूंना शिस्त लावण्यासाठी आणि वेळेचा अपव्यय रोखण्यासाठी फिफाने या अनेक नवीन नियम लागू केले आहेत.
जगातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा, फीफा वर्ल्ड कप (FIFA World Cup 2026) शुक्रवार, ११ जून रोजी (भारतात १२ जूनच्या मध्यरात्री) सुरू होणार आहे. या स्पर्धेचे सह-आयोजन अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको हे तीन देश मिळून करत आहेत. यावर्षी प्रथमच ४८ संघ या स्पर्धेत सहभाग घेणार आहेत. यामुळे सामन्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. FIFA World Cup 2026 पूर्वी फुटबॉलच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय फुटबॉल असोसिएशन बोर्ड (IFAB) आणि FIFA यांनी मिळून खेळ अधिक वेगवान, शिस्तबद्ध आणि पारदर्शक करण्यासाठी अनेक नवे नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे सर्व नियम आगामी विश्वचषकात पहिल्यांदाच लागू केले जाणार आहेत.
विश्वचषकासाठीच्या नवीन नियमांमधील सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे खेळाडूंना हाताने तोंड झाकून बोलण्यावर घातलेली बंदी. एखादा खेळाडू प्रतिस्पर्धी, पंच किंवा अधिकाऱ्यांसोबत वाद घालताना हात, जर्सी किंवा इतर कोणत्याही प्रकारे तोंड झाकत असल्यास त्याला थेट रेड कार्ड दाखवले जाईल. भेदभावपूर्ण किंवा अपमानास्पद वक्तव्ये लपवण्यासाठी खेळाडू असे करत असल्याचे FIFAचे म्हटले आहे.
जर पंचांनी चुकीचा कॉर्नर किक, चुकीचे दुसरे यलो कार्ड दिला तर VAR च्या हस्तक्षेपाने तो निर्णय बदलला जाऊ शकतो. यामुळे सामन्यातील पंचांचे चुकीचे निर्णय त्वरित दुरुस्त करण्यास मदत होणार आहे. कॉर्नर किक, पेनल्टी किंवा थ्रो-इन दरम्यान एखादा खेळाडू जमिनीवर पडण्यापूर्वी फाऊल करतो का, हे देखील VAR तपासू शकते.
थ्रो-इन किंवा गोल झाल्यावर गोलरकीपर किंवा खेळाडू अतिरिक्त वेळ घेतात, पण आता यामध्ये काउंटडाउनचाही समावेश असेल. वेळेची मर्यादा ५ सेकंद आहे आणि ती ओलांडल्यास, विरोधी संघाला कॉर्नर किक किंवा थ्रो-इन मिळेल. वेळेत खेळ सुरू न केल्यास प्रतिस्पर्धी संघाला थेट फायदा दिला जाईल.
तसेच बदली खेळाडूंची यादी (सबस्टिट्यूशन बोर्ड) दाखवल्यावर १० सेकंदांच्या आत मैदान सोडाने लागणार. जर बदली होणारा खेळाडू १० सेकंदांच्या आत मैदानाबाहेर गेला नाही तर बदली खेळाडू एक मिनिटासाठी मैदानाबाहेर जाईल.
सामन्यादरम्यान एखादा खेळाडू जखमी झाल्यास, त्याला मैदानात परतण्यापूर्वी एक मिनिट मैदानाबाहेर थांबावे लागेल. त्यानंतरच तो बरा होऊन परत येऊ शकेल. यामध्ये मात्र, गोलकीपर आणि गंभीर दुखापतींना मात्र सूट देण्यात आली आहे. याशिवाय प्रत्येक हाफमध्ये सुमारे २२ व्या मिनिटाला तीन मिनिटांचा हायड्रेशन ब्रेकही अनिवार्य करण्यात आला आहे.
जर एखादा खेळाडू पंचांच्या निर्णयाच्या रागावून किंवा इतर कोणत्याही कारणास्तव मैदान सोडतो, तर शिक्षा म्हणून संपूर्ण संघाला लाल कार्ड दाखवले जाऊ शकते.
याशिवाय, जर गोलकीपर जखमी झाला आणि मेडिकल टीम त्याची तपासणी करत असेल, तर अशा परिस्थितीत कोणत्याही संघाच्या खेळाडू डगआउटमध्ये जाऊन प्रशिक्षण कर्मचाऱ्यांशी बोलू शकत नाही.
FIFAच्या या नव्या नियमांमुळे World Cup 2026 अधिक वेगवान, शिस्तबद्ध आणि वादमुक्त करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.